मायणा कुडतरी पोलीस ठाण्यातील मारहाण प्रकरणात आतापर्यंत पाचजण निलंबित

प्रतिनिधी। गोवन वार्ता
मडगाव : मायणा-कुडतरी पोलीस मारहाण प्रकरणाची गंभीर दखल घेऊन यापूर्वी एक हवालदार व दोन कॉन्स्टेबलांचे निलंबन केले होते. मारहाणीसह लैंगिक छळ झाल्याची माहिती समोर येताच पोलीस महासंचालकांकडून संकेत नाईक आणि गौरव नाईक या उपनिरीक्षकांचे निलंबन करण्यात आले आहे.
रामनगरी-नेसाय येथे ६ जून रोजी रात्री दोन गटांतील वादानंतर पोलिसांनी पाच युवकांना ताब्यात घेतले होते. त्यांना रात्रभर पोलिसांच्या रेस्ट रूममध्ये ठेवून कपडे उतरवून अमानुष मारहाण केल्याचा आरोप आहे. प्राथमिक चौकशीनंतर शिपाई चेतन कोळी याला निलंबित करण्यात आले होते. ‘मारहाणीत केवळ एक शिपाई नसून एकूण पाच कर्मचारी सहभागी होते. त्यात उपनिरीक्षक संकेत नाईक आणि गौरव नाईक, हवालदार समीर सुधीर आणि शिपाई प्रतीक पुंडलिक यांचाही समावेश होता. मारहाण करताना ते मद्यधुंद अवस्थेत होते’, असा दावा पीडित युवकांच्या वकील अॅड. लिओना बार्रेटो यांनी केला होता. या घटनेत सहभागी सर्व पोलिसांना निलंबित करून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी केली होती.
पोलिसांची चौकशी पूर्ण झाल्यानंतर पीडितांनी पत्रकारांना झाल्या प्रकाराची माहिती दिली होती. याची दखल घेऊन गुरुवारी सायंकाळी पोलीस अधीक्षक शेखर प्रभुदेसाई यांनी आणखी दोन कर्मचार्यांना निलंबित केले. यात हवालदार समीर सुधीर व कॉन्स्टेबल प्रतीक पुंडलिक यांचा समावेश होता. दोन उपनिरीक्षकांचा सहभाग असल्याचे सुरुवातीपासून चर्चिले जात होते. त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत वरिष्ठ अधिकार्यांकडे अहवाल सादर झाला होता. पोलिसांकडून झालेल्या मारहाणीसह इतर अत्याचाराचा अहवाल अधीक्षकांनी महासंचालकांना सादर केला होता. त्यानुसार पणजी येथे वरिष्ठ पोलीस अधिकार्यांच्या बैठकीतही या विषयावर चर्चा झाली. सायंकाळी उशिरा दोघा उपनिरीक्षकांचे निलंबन करण्यात आले.
या प्रकरणात यापूर्वी कॉन्स्टेबल चेतन कोळी याला निलंबित केले होते. खात्याअंतर्गत नियमांचे उल्लंघन आणि कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवून अधीक्षकांनी हवालदार समीर सुधीर व कॉन्स्टेबल प्रतीक पुंडलिक यांना निलंबित केले होते. आता चौकशीचा अहवाल सादर झाल्यानंतर महासंचालकांनी उपनिरीक्षक संकेत नाईक आणि गौरव नाईक यांचे निलंबन केले आहे.
मानवी हक्क आयोगाकडून स्वेच्छा दखल
मायणा-कुडतरी पोलीस ठाण्यात अल्पवयीन मुलासह पाच युवकांना झालेल्या अमानुष मारहाणीची गोवा राज्य मानवी हक्क आयोगाने स्वेच्छा दखल घेतली आहे. आयोगाने पोलीस अधीक्षक आणि मायणा कुडतरी पोलीस निरीक्षकांना नोटीस बजावली आहे. १७ जून रोजी पणजी येथील कार्यालयात हजर राहून स्पष्टीकरण देण्याचे निर्देश दिले आहेत.
मारहाण, लैंगिक छळ, पैसे मागितल्याचा पोलिसांवर आरोप
पीडितांनी दिलेल्या माहितीनुसार, मारहाण करणारे पोलीस गणवेशात नव्हते. त्यांनी फुटबॉल जर्सी घातली होती. रेस्ट रूममध्ये पाचही पीडितांना नग्न केले. त्यांच्याशी आक्षेपार्ह कृत्ये केली. त्यांच्या कुटुंबीयांबद्दल अपशब्द वापरले. पीडितांना मारहाण केली. चघळलेल्या तंबाखूचा वास घेण्यास भाग पाडले. रात्री १० पासून पहाटे ३ पर्यंत मारहाण केली, खायला दिले नाही. सकाळी सोडण्यासाठी पैशांची मागणी केली. पैसे न दिल्यास खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिली, असे आरोप पीडितांनी पोलिसांवर केले आहेत.