केंद्रीय गृहनिर्माण तसेच खाणमंत्र्यांची घेतली भेट

केंद्रीय गृहनिर्माण व ऊर्जा मंत्री मनोहरलाल खट्टर यांच्याशी हस्तांदोलन करताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत.
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : राज्यातील शहरी विकास आणि गृहनिर्माण क्षेत्राशी संबंधित विविध प्रकल्पांसाठी केंद्र सरकारने आर्थिक सहकार्य करावे, अशी मागणी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केंद्रीय गृहनिर्माण व ऊर्जा मंत्री मनोहरलाल खट्टर यांच्याकडे केली. केंद्रीय कोळसा व खाण मंत्री किशन रेड्डी गंगापूरम यांची भेट घेऊन खाण व्यवसायाशी संबंधित विषयांवर चर्चा केली.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत सध्या नवी दिल्ली येथे असून बुधवारी त्यांनी एनडीए परिषदेतील सहभागाबरोबरच विविध केंद्रीय मंत्र्यांच्या भेटी घेतल्या. गुरुवारी ते निती आयोगाच्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. एनडीए परिषदेपूर्वी मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय मंत्री मनोहरलाल खट्टर यांची भेट घेतली. यावेळी ‘अर्बन चॅलेंज फंड’ योजनेअंतर्गत गोवा सरकारने सादर केलेल्या प्रस्तावांना मंजुरी देण्याची मागणी करण्यात आली. या योजनेअंतर्गत देशभरात सुमारे १ लाख कोटी रुपयांच्या शहरी विकास प्रकल्पांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. शहरांमध्ये मूलभूत सुविधा उभारण्यासाठी ही योजना महत्त्वाची मानली जाते. गोव्यात सुरू असलेल्या वीज वितरण प्रकल्पांच्या प्रगतीचाही आढावा बैठकीत घेण्यात आला.
गेल्या काही दिवसांतील मुख्यमंत्र्यांची ही चौथी दिल्ली भेट आहे. २७ मे रोजी त्यांनी कुटुंबासह पंतप्रधान मोदींची भेट घेतली होती. त्यावेळी केंद्रीय कामगार मंत्री मनसुख मांडवीय आणि केंद्रीय बंदरे, जहाजवाहतूक व जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्याशीही विविध विषयांवर चर्चा केली होती. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव, जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील, गृहमंत्री अमित शहा तसेच शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांची भेट घेतली होती. सध्या एनडीए परिषद आणि निती आयोगाच्या बैठकीच्या निमित्ताने मुख्यमंत्री दिल्ली दौऱ्यावर आहेत.
केंद्रीय खाणमंत्र्यांशी भविष्यातील धोरणांवर चर्चा
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केंद्रीय कोळसा व खाण मंत्री किशन रेड्डी गंगापूरम यांची भेट घेतली. राज्यात पुन्हा सुरू झालेल्या खाण व्यवसायासंदर्भातील सुधारणा आणि भविष्यातील धोरणांवर चर्चा झाल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.