आमदार वीरेश बोरकरांकडून बंडाचे संकेत

फेसबुकवरील पोस्टमुळे चर्चा रंगली


10th June, 11:54 pm
आमदार वीरेश बोरकरांकडून बंडाचे संकेत

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : आरजीचे आमदार वीरेश बोरकर यांनी क्रांतिदिन, १८ जून रोजी महत्त्वाचा निर्णय घेण्याचे संकेत देत फेसबुकद्वारे दिले आहे. बोरकर यांनी फेसबुकवर ‘18 June, Revolution Day, Let’s Revolt’ अशी पोस्ट केली. या पोस्टनंतर त्यांनी पक्षाविरोधात बंडाचे संकेत दिल्याची चर्चा रंगू लागली आहे.
पक्षविरोधी कारवायांबद्दल पक्षाने त्यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली असून, त्यानंतर पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसोबत त्यांची बैठकही झाली. आरजीचे पदाधिकारी अजय खोलकर यांनी बोरकर यांच्या महिला कर्मचाऱ्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. आपल्या अश्लील छायाचित्रांचे मॉर्फिंग करून ते सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले आणि त्यामुळे आपली बदनामी झाल्याचा आरोप त्यांनी तक्रारीत केला आहे. तक्रारीची प्रत अनुसूचित जमाती (एसटी) आयोगालाही पाठवण्यात आली आहे.
या तक्रारीनंतर आमदार वीरेश बोरकर यांनी फेसबुक पोस्ट करत बंडाचे संकेत दिले. त्यामुळे आरजी पक्ष आणि बोरकर यांच्यातील संबंध पुन्हा ताणले गेल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.