भारताने जगाच्या एक पाऊल पुढे राहिले पाहिजे : पंतपधान

एनडीएच्या बैठकीत मार्गदर्शन : सर्वाधिक काळ पदावर राहिल्याबद्दल अभिनंदन


10th June, 11:57 pm
भारताने जगाच्या एक पाऊल पुढे राहिले पाहिजे : पंतपधान

न्यूज डेस्क। गोवन वार्ता
नवी दिल्ली : आमच्यासाठी पक्षापेक्षा राष्ट्र नेहमीच महत्त्वाचे राहिले आहे. भारताने जगाच्या बरोबरीने चालून चालणार नाही, तर एक पाऊल पुढे राहिले पाहिजे. तो दिवस दूर नाही जेव्हा आपण ‘मेड इन इंडिया’ विमानांचीही निर्मिती करू, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
मोदी हे भारतातील सर्वाधिक काळ पदावर राहिलेले निवडून आलेले पंतप्रधान बनले आहेत. येथील ‘भारत मंडपम’ येथे आयोजित राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) बैठकीत पदावरील ४,३९९ दिवसांचा कार्यकाळ पूर्ण केल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. या बैठकीला भाजपाध्यक्ष नितीन नबीन, केंद्रीय मंत्रिमंडळातील सदस्य, भाजपचे पदाधिकारी, भाजप-एनडीएची सत्ता असलेल्या २२ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि इतर नेते उपस्थित होते. बैठकीत पंतप्रधानांच्या अभिनंदनाचा ठराव आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी मांडला आणि नागालँडचे मुख्यमंत्री नेफियू रिओ यांनी त्याला अनुमोदन दिले. तत्पूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीतही मंत्र्यांनी उभे राहून टाळ्यांच्या कडकडाटात अभिनंदन ठराव मंजूर केला.


बैठकीत पंतप्रधान मोदी म्हणाले...
गेल्या १२ वर्षांत हरित ऊर्जा क्षेत्रात लक्षणीय प्रगती झाली आहे. आता ५०० गिगावॅट नवीकरणीय आणि अणुऊर्जेची उद्दिष्टे वेगाने साध्य करण्यावर भर दिला जात आहे. स्वच्छता मोहिमा आणि डिजिटल पेमेंटपासून ते कोविड-१९ महामारीच्या काळातील प्रतिसादापर्यंतच्या प्रत्येक उपक्रमाला नागरिकांनी पाठिंबा दिला आणि देशाला निराश होऊ दिले नाही. जागतिक अस्थिरतेच्या काळातही भारताने २०२५-२६ मध्ये ७.७ टक्के विकासदर गाठला.
२०१४ मध्ये ७४ विमानतळ होते, आता त्यांची संख्या १६० हून अधिक आहे. या काळात द्रुतगती मार्गांचे जाळे १,००० किमीवरून ६,७०० किमीपर्यंत विस्तारले. पूर्वी केवळ पाच शहरांमध्ये असलेल्या मेट्रो सेवांचा विस्तार आता २० शहरांपर्यंत झाला आहे. संरक्षण क्षेत्रातील निर्यातीचे मूल्य २०१४ मधील ७०० कोटी रुपयांवरून २३,००० कोटी रुपयांपर्यंत वाढले आहे. १२ वर्षांत इतकी प्रगती होऊ शकली, तर त्याआधीच्या दशकांमध्ये ती का झाली नाही?
काँग्रेसने देशाला असहाय आणि कंगाल बनवले होते. काँग्रेसने अशी धारणा रुजवली होती की, भारतातील विकास हा मुळातच संथ असतो आणि त्याला त्यांनी ‘हिंदू विकास दर’ असे नाव दिले होते. कार्यपद्धती, जबाबदारी आणि अपयश काँग्रेसचे होते, तरीही त्याचे कलंक हिंदू लोकसंख्येच्या माथी मारले गेले.
इतक्या दीर्घकाळापर्यंत भारतमातेची सेवा करण्याचे भाग्य केवळ ईश्वराच्या विशेष कृपेनेच लाभू शकते. माझ्यासाठी जनता हेच ईश्वराचे रूप आहे; म्हणूनच मी सेवेकडे आध्यात्मिक साधना म्हणून पाहिले आहे. ही सेवा वैयक्तिक प्रयत्न नव्हता, तर सामूहिक प्रयत्न-एक यज्ञ होता.
मोदींनी मोडला पं. नेहरूंचा विक्रम
१५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पं. जवाहरलाल नेहरू यांची पंतप्रधानपदी नियुक्ती झाली. त्यांनी १५ ऑगस्ट १९४७ ते १३ मे १९५२ पर्यंत एकूण १,७३२ दिवस पंतप्रधान म्हणून कार्यभार सांभाळला. १९५२ मध्ये देशाच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या. काँग्रेस सत्तेवर आली. या संसदीय पक्षाने नेहरूंना नेता म्हणून निवडले. त्यानंतर नेहरूंनी १३ मे १९५२ ते २७ मे १९६४ पर्यंत सलग तीन वेळा पंतप्रधान म्हणून काम पाहिले. हा कार्यकाळ ४,३९८ दिवसांचा होता. मोदींनी सर्वाधिक वेळा निवडून आलेले पंतप्रधान म्हणून आता पं. नेहरूंना मागे टाकले.

विदेशातील नेत्यांनीही केले मोदींचे अभिनंदन
इस्रायल, इथिओपिया आणि दक्षिण कोरियासह अनेक देशांच्या नेत्यांनी, सर्वाधिक काळ सलग निवडून आलेले पंतप्रधान बनल्याबद्दल पंतप्रधान मोदींचे अभिनंदन केले. इस्रायलने म्हटले आहे की, भारत आणि इस्रायल यांच्यातील अद्वितीय मैत्री दरवर्षी अधिक दृढ होत आहे. मोदींच्या नेतृत्वाखाली दोन्ही देश आपली भागीदारी आणखी दृढ करण्याची आशा बाळगतात.