आरोग्यमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : दोना पावला येथील समुद्रकिनाऱ्यावर बुधवारी सायंकाळी इंटर्न डॉक्टर गौरी नारायण (२३) हिचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळून आला. पणजी पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तो शवविच्छेदनासाठी गोवा वैद्यकीय महाविद्यालय (जीएमसी) रुग्णालयात पाठवला आहे. शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. दरम्यान, आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. पोलिसांनी याची अनैसर्गिक मृत्यू म्हणून नोंद केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत युवती मूळची केरळ येथील असून ती गोवा वैद्यकीय महाविद्यालयात इंटर्नशिप करत होती. समुद्रकिनाऱ्यावर युवतीचा मृतदेह पडला असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. मृतदेहावर जीएमसी इंटर्नचा गणवेशही असल्याने मृत्यूबाबत संशय निर्माण झाला आहे. तिने आत्महत्या केली की तिचा खून झाला, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. पोलिसांचा तपास सुरू असतानाच आरोग्यमंत्र्यांनी स्वतंत्र चौकशीचे आदेश दिले आहेत.
दरम्यान, पोलिसांना घटनास्थळी इंजेक्शन आणि विषाची बाटली सापडली. त्यामुळे विषारी इंजेक्शन टोचल्याने तिचा मृत्यू झाला असावा असा संशय आहे. काही महिन्यांपूर्वी तिने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.
पोलिसांकडून सर्व शक्यता गृहित धरून तपास
युवती समुद्रकिनाऱ्यावर एकटी आली होती की इतर कोणासोबत आली होती, ती कोणत्या वाहनाने घटनास्थळी पोहोचली, याचाही तपास सुरू आहे. तसेच पोलिसांकडून समुद्रकिनाऱ्याच्या परिसरात तिच्या सामानाचा शोध घेतला जात आहे. पोलिसांकडून सर्व शक्यता लक्षात घेऊन सर्व बाजूंनी तपास केला जात आहे, अशी माहिती मिळाली आहे.