पावसाची दडी, राज्यातील धरणांतील पाणीसाठ्यांत घट

४५ टक्के पावसाची तूट : सहापैकी चार धरणांची पातळी घसरली

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
13th June, 10:21 pm
पावसाची दडी, राज्यातील धरणांतील पाणीसाठ्यांत घट

राज्यात ५ जून रोजी मान्सून दाखल झाला असला तरी अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाही. यंदा पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा ४५ टक्क्यांनी कमी असल्याने धरण क्षेत्रासह राज्यातील विविध भागांमध्ये पाण्याची आवक घटली आहे. परिणामी, मागील आठ दिवसांत राज्यातील सहापैकी चार प्रमुख धरणांतील पाणीसाठ्यात एक ते दोन टक्क्यांनी घट नोंदवण्यात आली आहे.

चार धरणांतील पाणीसाठ्यात घट

मिळालेल्या माहितीनुसार, ३ जून अखेरीस अंजुणे धरणात १३.८ टक्के पाणीसाठा शिल्लक होता. ११ जून अखेरीस तो घटून ११ टक्क्यांवर आला. दक्षिण गोव्याला पाणीपुरवठा करणाऱ्या साळावली धरणातील पाणीसाठा २९.३ टक्क्यांवरून २८ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे.

पंचवाडी धरणातील पाणीसाठाही २३ टक्क्यांवरून २१ टक्क्यांपर्यंत घसरला आहे. आमठाणे धरणात सध्या सर्वाधिक ५२ टक्के पाणीसाठा उपलब्ध असला, तरी आठ दिवसांपूर्वी तो ५४ टक्के होता. तिलारी धरणातील पाणीसाठाही ३२.३ टक्क्यांवरून ३१ टक्क्यांपर्यंत कमी झाला आहे.

धरणांतील सध्याचा पाणीसाठाआमठाणे – ५२%
गावणे – ४४%
चापोली – ४१%
तिलारी – ३१%
साळावली – २८%
पंचवाडी – २१%
अंजुणे – ११%

काणकोणमध्ये सर्वाधिक पाऊस

१ ते १३ जून या कालावधीत राज्यात काणकोण तालुक्यात सर्वाधिक १५.१९ इंच पावसाची नोंद झाली आहे. यामुळे चापोली धरणातील पाणीसाठ्यात किरकोळ वाढ झाली असून ३ जून रोजी ४०.४ टक्के असलेला साठा ११ जून अखेरीस ४१ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे.

तर गावणे धरणात ३ जून आणि ११ जून या दोन्ही दिवशी समान म्हणजे ४४ टक्के पाणीसाठा नोंदवण्यात आला. त्यामुळे काही धरणांमध्ये स्थिती स्थिर असली, तरी बहुतेक जलसाठ्यांमध्ये घट दिसून येत आहे.

राज्यात पाणीटंचाई भासू देणार नाही!

पुढील एक महिना जरी पाऊस पडला नाही, तरी राज्यात पाणीटंचाई निर्माण होऊ देणार नाही, असे जलस्रोत खात्याने स्पष्ट केले आहे. गरज भासल्यास प्रक्रिया न केलेल्या पाण्याचा वापर, अतिरिक्त पाणी उपसा तसेच धरणांमधून होणारा विसर्ग कमी करणे अशा उपाययोजना करण्यात येणार आहेत.

मान्सून कमकुवत का?

हवामान खात्याच्या माहितीनुसार, प्रशांत महासागरातील ‘अल निनो’ वातावरणीय प्रणालीच्या प्रभावामुळे यंदा मान्सूनची तीव्रता कमी राहिली आहे. त्यामुळे राज्यातील अनेक भागांत अपेक्षेइतका पाऊस पडलेला नाही आणि धरणांमध्ये पाण्याची आवकही मर्यादित राहिली आहे.

ठळक मुद्दे
  • राज्यात मान्सून असूनही पावसाची ४५ टक्के तूट.
  • सहापैकी चार धरणांतील पाणीसाठ्यात घट.
  • अंजुणे धरणातील पाणीसाठा १३.८ टक्क्यांवरून ११ टक्क्यांवर.
  • साळावली धरणातील साठा २९.३ टक्क्यांवरून २८ टक्क्यांवर.
  • काणकोणमध्ये १५.१९ इंच पावसाची नोंद.
  • जलस्रोत खात्याचा दावा – राज्यात पाणीटंचाई होऊ देणार नाही.
हेही वाचा