गोव्याच्या वारशाशी प्रतारणा: तुम्हाला हा अधिकार कोणी दिला?

होय, हे खरं आहे की परकीय राजवटीत सोसावं लागलं. मंदिरं पाडली गेली, विस्थापन झालं, वेगवेगळ्या परिस्थितींमध्ये धर्मांतरं झाली. पण गोव्याचं वेगळेपण केवळ या जुन्या जखमांमध्ये नाही, तर त्या सगळ्या पडझडीनंतर जी एक नवी, सुंदर संस्कृती आकाराला आली, त्यामध्ये आहे.

Story: मन गोवेकरांचे |
13th June, 11:55 pm
गोव्याच्या  वारशाशी प्रतारणा:  तुम्हाला हा अधिकार कोणी दिला?

पूर्व आफ्रिका सोडण्यापूर्वी माझ्या सुगरण आईने मॅकिंटॉश चॉकलेटच्या मोठ्या डब्यांमध्ये केक भरून ठेवले होते. गोव्यातल्या सुरुवातीच्या अनिश्चित दिवसांत याने आमचं पोट भरेल, एका अनोळखी आयुष्यात पाऊल ठेवताना, ओळखीच्या चवीची थोडीतरी सोबत राहावी म्हणून. पण कुठ्ठाळीत जाऊन जेव्हा आम्ही तो पहिला डबा उघडला, तेव्हा त्यावर बुरशी आली होती. लांब प्रवासात ते केक गोव्याच्या दमट हवेमुळे खराब झाले होते. आफ्रिकेतून परतलेल्या अनेक कुटुंबांच्या वाट्याला आधीपेक्षा खूप कठीण दिवस आले. घरात नळाचं पाणी नव्हतं, आजूबाजूच्या विहिरींवरून ते आणावं लागायचं. वीज नव्हती, चुलीच्या धुराने स्वयंपाकघरं काळीकुट्ट पडायची. घासलेटच्या दिव्याच्या अंधुक पिवळ्या ज्योतीभोवती कीटक घिरट्या घालत असताना मुलं अभ्यास करायची.

परतलेल्या लोकांच्या भविष्याबद्दल मोठी अनिश्चितता होती. परदेशात चांगल्या हुद्द्यावर असणारी माणसं गावात बेरोजगार झाली होती. माझ्या वडिलांची परिस्थितीही वेगळी नव्हती. त्यामुळे रोज सकाळी ते इंग्रजी वर्तमानपत्राची वाट पाहायचे. सुरुवातीला कुठ्ठाळीतल्या आमच्या गॅलरीत काही मोजकेच शेजारी जमायचे: केळोशीचे दादी, सांकवाळचे बाप्पा आणि आमचे जुने मित्र रामचंद्रन. कोणालाच अस्खलित इंग्रजी यायचं नाही, त्यामुळे माझे वडील जगाच्या घडामोडींचा कोकणीत अनुवाद करून सांगायचे. हळूहळू या कोंडाळ्यात कोळी, शेतकरी आणि मजूरही येऊ लागले. कोणतीही पूर्वयोजना नसताना माझ्या बेरोजगार वडिलांनी एक ‘रीडिंग क्लब’ तयार केला होता.

माझ्या आईला त्या सकाळच्या वेळा फार आवडायच्या. मडगावच्या ‘टी कॉर्नर’चा फक्कड चहा ती सगळ्यांना सारखी ओतून द्यायची. गप्पा मारता मारता कधी जेवणाची वेळ व्हायची, ते कळायचंच नाही. दादी ताजे मासे आणायचे, तर बाप्पा घरून भाजी किंवा चिकन शागोती घेऊन यायचे. तिथल्या माणसांना जात-धर्मापेक्षा जगणं जास्त मोठं वाटायचं, त्यामुळे त्या बैठकीत धर्माचा विषय कधी निघायचाच नाही. आमचा संसार मोठ्या भावंडांनी परदेशातून गुपचूप पाठवलेल्या पैशांवर आणि जुन्या बचतीवर चाललाय, हे आम्हा मुलांना समजत नव्हतं. पण तरीहीमै त्री, जेवण आणि एकमेकांची साथ याभोवती आमचं जगणं सुखा-समाधानाने चाललं होतं. 

हलाखीचे दिवस असूनही आमच्यात एक भावनिक श्रीमंती होती. घरांची दारं उघडी असायची, जेवणाची ताटं सहज शेअर व्हायची आणि रात्री उशिरापर्यंत गप्पांचे फड रंगायचे. पैसा कमी होता, पण माणसं मनातून जोडलेली होती. हिंदू-कॅथलिकांच्या काही घरांत तर ख्रिस्ताची मूर्ती आणि हिंदू देवांचे फोटो देव्हाऱ्यात शेजारी शेजारी असायचे, याचं कोणालाच काही वावगं वाटायचं नाही.

चर्चमध्ये आम्हाला धर्म शिकवला गेला तो एकच देव, एकच मार्ग! पण बाहेर मात्र गोव्याचं जगणं वेगळ्याच नियमांनी चालायचं. सरकारी कचेऱ्या, बसचे डॅशबोर्ड किंवा वडाची झाडं... प्रत्येक ठिकाणी क्रॉस आणि शांतादुर्गा, मंगेशी किंवा गणपतीचे फोटो एकत्र दिसायचे; जणू इतिहासानेच आपापसात शांततेचा करार करून घेतला होता.

माझ्या लहानपणी एका मित्राच्या नवीन गाडीला कुठ्ठाळीच्या चर्चमध्ये आशिर्वाद दिल्यावर आम्ही श्री मंगेशी मंदिरातही गेलो. तिथे पुजाऱ्याने 'कुठ्ठाळीचे कोणी आहे का?' विचारल्यावर लोकांनी मला पुढे केले; कारण शतकांपूर्वी माझेच पूर्वज या गावातून ख्रिस्ती झाले होते. तेव्हा मला समजले की, आपण परके नव्हतो, तर एकाच पूर्वजांची मुलं आहोत जी इतिहासाच्या वेगवेगळ्या वाटांवरून चालत राहिली. म्हणूनच गोव्यात धर्माच्या भिंती आजही लवचिक वाटतात. 

गोव्याचा इतिहास आम्हाला शिकवलेल्या चौकटींइतका सरळ कधीच नव्हता. आपण दोन वेगवेगळ्या संस्कृतींचे परके लोक नव्हतो; आपण बऱ्याच अंशी एकाच पूर्वजांची मुलं होतो, जी इतिहासाच्या वेगवेगळ्या वाटांवरून चालत राहिली. काहींनी जुन्या परंपरा जतन केल्या, काहींनी बदलत्या राजवटीनुसार स्वतःला बदललं. पण या सगळ्या बदलांच्या खाली पूर्वजांच्या स्मृतींचे धागे एकमेकांशी जोडलेलेच राहिले.

कदाचित म्हणूनच गोव्यातल्या वेगवेगळ्या धर्मांच्या भिंती अजूनही लवचिक वाटतात. म्हापशाची 'मिलाग्रीस सायबिण' आणि शिरगावची 'लईराई देवी' यांच्यातील दरवर्षीची देवाणघेवाण हे या सहअस्तित्वाचं सर्वात सुंदर उदाहरण आहे. मिलाग्रीस सायबिणीच्या सणावेळी लईराईच्या मंदिरातून पवित्र खोबरेल तेल पाठवलं जातं; तर शिरगावच्या जत्रेला ख्रिस्ती बांधव देवीच्या आवडीच्या मोगऱ्याच्या फुलांनी भरलेल्या टोपल्या घेऊन जातात. पर्यटकांना दाखवण्यासाठी केलेला हा देखावा नाही, तर पिढ्यानपिढ्या जिवंत ठेवलेली परंपरा आहे.

आजही रस्त्याकडच्या क्रूसांची पूजा करताना हिंदू आणि ख्रिस्ती पद्धतींचा सुंदर संगम दिसतो. देव्हाऱ्यांमध्ये गणपतीच्या शेजारीच सेंट अँथनीची मूर्ती दिसते. नवीन पिकाचं पहिलं धान्य जसं देवळात वाहिलं जातं, तसंच ते तितक्याच श्रद्धेने चर्चमध्येही आणलं जातं. आणि म्हणूनच, वेगळ्या पद्धतीने घडलेल्या या गोमंतकीय समाजात जेव्हा बाहेरून धार्मिक द्वेष आणि कट्टरता आणण्याचा प्रयत्न होतो, तेव्हा अनेक गोवेकरांचे मन अस्वस्थ होते.

होय, हे खरं आहे की परकीय राजवटीत सोसावं लागलं. मंदिरं पाडली गेली, विस्थापन झालं, वेगवेगळ्या परिस्थितींमध्ये धर्मांतरं झाली. पण गोव्याचं वेगळेपण केवळ या जुन्या जखमांमध्ये नाही, तर त्या सगळ्या पडझडीनंतर जी एक नवी, सुंदर संस्कृती आकाराला आली, त्यामध्ये आहे. आज इथे एकही पोर्तुगीज राज्यकर्ता उरलेला नाही. उरलेत ते फक्त आणि फक्त गोवेकर.

असं असताना, आज जे लोक धार्मिक भिंती उभारून समाजात विष कालवू पाहत आहेत, त्यांना नक्की काय मिळवायचं आहे? ज्या जखमा साध्या भोळ्या गावकऱ्यांनी शतकांपासून हळूहळू भरून काढल्या, त्या आज पुन्हा का उकरून काढायच्या? ज्या समाजाला खूप आधीच हे समजलं होतं की 'एकत्र राहणं' ही कमजोरी नसून जगण्याचा एकमेव आधार आहे, तिथे आज हा द्वेष कशासाठी?

गोव्याचं सर्वात मोठं यश हे कधीच एका धर्माने दुसऱ्या धर्मावर मिळवलेला विजय नव्हतं. ते यश होतं एकमेकांसोबत मिळूनमिसळून राहण्याचं. हे सहअस्तित्व कोणत्याही नेत्याने किंवा विचारवंताने नाही, तर कोळी बांधवांनी, मातांनी, चहाच्या टपरीवर गप्पा मारणाऱ्यांनी, गावच्या पाद्र्यांनी, मंदिराच्या पुजाऱ्यांनी आणि शेजाऱ्यांनी मिळून उभे केले होते; कारण पूर्वजांचा राग मनात धरून ठेवण्यापेक्षा एकमेकांशी माणुसकीने वागणं जास्त महत्त्वाचं असतं, हे त्यांना ठाऊक होतं. हाच वारसा आज गोव्याचं सगळ्यात नाजूक आणि तितकंच देखणं सत्य म्हणून जिवंत आहे.


ज्योकिम गोएस, (लेखक अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात प्राध्यापक असून, मूळचे कुठ्ठाळी-गोवा येथील आहेत. )