राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० शिक्षणाला नवी दिशा देत आहे. बहुविषयक दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांमध्ये सर्व विषयांविषयी आदर व समज निर्माण होते. इयत्ता ६ वीपासून व्यावसायिक शिक्षणाचा समावेश करून कौशल्यविकास, उद्योजकता आणि रोजगारक्षमतेला चालना दिली जाते.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० (NEP 2020) हे भारताच्या शिक्षण क्षेत्रातील एक महत्त्वपूर्ण परिवर्तनकारी पाऊल आहे. विद्यार्थीकेंद्रित, कौशल्याधारित आणि सर्वसमावेशक शिक्षण व्यवस्था निर्माण करणे हा या धोरणाचा मुख्य उद्देश आहे. गोवा राज्यात या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी होत असून त्याचे सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक क्षेत्रावर दूरगामी सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत. NEP 2020 मुळे शिक्षण अधिक समावेशक आणि सर्वांसाठी उपलब्ध होत आहे. गोव्यातील ग्रामीण, आदिवासी आणि दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या संधी उपलब्ध होत आहेत. बालकांच्या सर्वांगीण विकासावर भर दिल्यामुळे त्यांच्यात आत्मविश्वास, संवाद कौशल्ये, सहकार्य वृत्ती आणि सामाजिक जबाबदारी विकसित होत आहे.
स्थानिक भाषा आणि मातृभाषेतून शिक्षणाला प्राधान्य दिल्याने विद्यार्थ्यांचे शिकणे अधिक सुलभ झाले आहे. यामुळे शाळा सोडणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण कमी होण्यास मदत होत आहे. गोवा ही समृद्ध सांस्कृतिक परंपरा, लोककला, लोकसंगीत आणि बहुभाषिक वारसा लाभलेली भूमी आहे. NEP 2020 अंतर्गत स्थानिक कला, संस्कृती, लोकपरंपरा आणि भारतीय ज्ञान प्रणाली यांचा अभ्यासक्रमात समावेश करण्यावर भर देण्यात आला आहे.
यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आपल्या सांस्कृतिक वारशाबद्दल अभिमान निर्माण होत आहे. गोव्यातील फुगडी, धालो, मांडो, देखणी, लोकवाद्ये, लोककथा आणि पारंपरिक ज्ञान यांचा शैक्षणिक प्रक्रियेत समावेश केल्याने सांस्कृतिक जतन आणि संवर्धनाला चालना मिळत आहे.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० शिक्षणाला नवी दिशा देत आहे. बहुविषयक दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांमध्ये सर्व विषयांविषयी आदर व समज निर्माण होते. इयत्ता ६ वीपासून व्यावसायिक शिक्षणाचा समावेश करून कौशल्यविकास, उद्योजकता आणि रोजगारक्षमतेला चालना दिली जाते. अनुभवाधारित व कृतीप्रधान शिक्षणामुळे विद्यार्थ्यांची सर्जनशीलता, चिकित्सक विचारशक्ती, संवादकौशल्य आणि सहकार्यभाव विकसित होऊन ते २१ व्या शतकातील आव्हानांना समर्थपणे सामोरे जाण्यास सक्षम बनतात.
बहुभाषिक शिक्षणामुळे मराठी, कोकणी, हिंदी आणि इंग्रजी या भाषांबद्दल आदरभाव वाढत असून विविध संस्कृतींमधील परस्पर समन्वय अधिक मजबूत होत आहे. NEP 2020 मुळे पाठांतराधारित शिक्षणाऐवजी अनुभवाधारित, कृतीआधारित आणि कौशल्याधारित शिक्षणाला प्राधान्य मिळाले आहे. विद्यार्थ्यांची सर्जनशीलता, चिकित्सक विचार, समस्या सोडविण्याची क्षमता आणि नवोन्मेषी दृष्टिकोन विकसित होत आहेत.
कला, संगीत, क्रीडा, व्यावसायिक शिक्षण आणि तंत्रज्ञान यांचे मुख्य प्रवाहातील शिक्षणाशी एकत्रीकरण झाल्यामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साध्य होत आहे. डिजिटल शिक्षणाच्या वापरामुळे ज्ञानप्राप्तीच्या नवीन संधी निर्माण झाल्या आहेत.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामुळे विद्यार्थ्यांच्या व्यावसायिक विकासालाही चालना मिळाली आहे. सतत प्रशिक्षण, नव्या अध्यापन पद्धती आणि मूल्यमापनातील सुधारणा यामुळे शिक्षणाची गुणवत्ता उंचावत आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० अंतर्गत प्रत्येक शैक्षणिक टप्प्यासाठी (Foundational, Preparatory, Middle आणि Secondary Stage) स्वतंत्र अभ्यासक्रमीय उद्दिष्टे (Curricular Goals) आणि क्षमता (Competencies) निश्चित करण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांनी प्रत्येक टप्प्याच्या शेवटी अपेक्षित ज्ञान, कौशल्ये, मूल्ये आणि वृत्ती आत्मसात कराव्यात, या उद्देशाने गोव्यातील सर्व पाठ्यपुस्तकांची रचना करण्यात आली आहे.
गोवा राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (GSCERT) यांनी सुरू केलेली क्षमताधारित परीक्षा पद्धती (Competency-Based Assessment) ही शिक्षण क्षेत्रातील एक महत्त्वपूर्ण सुधारणा आहे. या मूल्यमापन पद्धतीमुळे विद्यार्थ्यांच्या केवळ पाठांतराचीच नव्हे, तर आकलन, विश्लेषण, समस्या निराकरण, सर्जनशीलता आणि प्रत्यक्ष जीवनातील उपयोगिता यांची चाचणी घेतली जाते. आगामी काळात या पद्धतीचा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर आणि शिक्षणाच्या स्तरावर अत्यंत सकारात्मक परिणाम होणार आहे.
याशिवाय पी.एम. ई-विद्या (PM e-Vidya) उपक्रमांतर्गत राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावर आधारित धडे, कृती आणि अध्ययन-अध्यापन साहित्याचे ध्वनिचित्रमुद्रण करून ते विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांसाठी उपलब्ध करून देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य सुरू करण्यात आले आहे. यामुळे गुणवत्तापूर्ण शिक्षण राज्यातील प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोहोचण्यास मदत होत आहे.
यासाठी गोव्यातील प्रत्येक तालुक्यात ब्लॉकस्तरावर शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केले. यासाठी विषयतज्ज्ञ साधनव्यक्ती (Resource Persons) तसेच जीएससीईआरटीचे अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली. या उपक्रमामुळे गोव्याच्या दुर्गम आणि अंतर्गत भागातील शिक्षकांपर्यंत प्रशिक्षण सहज पोहोचले असून, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीत त्यांना कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये याची विशेष काळजी घेण्यात आली.
गोव्यात शिक्षण क्षेत्रात होत असलेले हे सकारात्मक आणि परिवर्तनशील बदल शिक्षण सचिव श्री. प्रसाद लोलयेकर, संचालक (जीएससीईआरटी) डॉ. मेघना शेटगावकर, संचालक (प्रशासन) श्रीमती सरिता गाडगीळ यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभावीपणे राबविण्यात येत आहेत. तसेच गोव्याचे मुख्यमंत्री आणि शिक्षणमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वामुळे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची यशस्वी अंमलबजावणी होत असून गोव्याच्या शिक्षण क्षेत्रात नवे मानदंड निर्माण होत आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थीकेंद्रित, गुणवत्तापूर्ण आणि भविष्याभिमुख शिक्षणव्यवस्था घडविण्याचे कार्य सातत्याने सुरू आहे.

नारायण गावस