आमच्यातले महिलामंडळ देवीच्या दर्शनाची आतुरतेने वाट पाहत होते. सोबत ओटी घेतलेली होतीच. देवीच्या मुख दर्शनाच्या ठिकाणी पोहचल्यावर देवीचे मनोभावे दर्शन घेतले. पण तिथंही अनपेक्षित वाढून ठेवलेलं होतंच.

अधिक महिना..! या महिन्यात विशेषकरून आपण देव दर्शनाला प्राधान्य देतो. मग काय भक्तीभावाच्या वातावरणात घरच्यांचे सहलीचे आयोजन झाले. पंढरपूर, अक्कलकोट दर्शन झाले आणि तुळजापूरला आई भवानीचे दर्शन घेण्यासाठी आम्ही पोचलो.
अपेक्षेपेक्षा परिसर थोडा वेगळा दिसल्यामुळे काहीशी निराशा झाली. आजूबाजूचा परिसर अस्वच्छ. जी प्रसन्नता असायला हवी ती जाणवली नाही. मग पुढे रांग सुरू झाली आणि दोन तीन तास गेले. आमच्यातले महिलामंडळ देवीच्या दर्शनाची आतुरतेने वाट पाहत होते. सोबत ओटी घेतलेली होतीच. देवीच्या मुख दर्शनाच्या ठिकाणी पोहचल्यावर देवीचे मनोभावे दर्शन घेतले. पण तिथंही अनपेक्षित वाढून ठेवलेलं होतंच. समोर असणाऱ्या त्या कर्मचाऱ्याने अक्षरशः देवीसाठी दिलेली ओटी घेतली आणि बाजूला भिरकावली. तिथेच ओटी फेकून दिल्याचा ढीग साठलेला होता. एखादा कचरा फेकावा अशी ओटी आमच्या समोरच फेकली गेली.
हे पाहताच, बहुदा शांत असणाऱ्या आमच्या सौ. अचानक भडकल्या आणि बोलल्या,
“एवढा वेळ रांगेत उभं राहून देवीच्या दर्शनासाठी वाट पाहतायत सगळे आणि देवीसाठी आणलेल्या ओटीच्या साड्या अशा फेकून देता होय..? किती श्रद्धेने आणलेलं असतंय हे सगळं?”
पण समोरचाही सवयीने निर्ढावलेला लोकांच्या श्रद्धेशी काही देणं घेणं नसलेला आणि खरंतर देवीच्या पैशांवर माजलेला इतरांशी वागत असेल असाच परतून बोलला,
“अजून पैसे लागतील, मग देवीच्या पायाशी साडी पोचवतो..!” त्याच्या आवाजातला निर्लज्जपणा स्पष्ट जाणवला.
हे ऐकताच सौ उत्तरल्या,
“लोकांच्या श्रद्धेचा बाजार मांडलाय तुम्ही, देवी तूच बघून घे यांना.”
काहीसा खजिल झालेला तो व्यक्ती या अशा अनपेक्षित प्रतिसादने आता मात्र नजरा टाळत होता.
असं घडल्यावर नक्की कुणीही दुखावणारच. एवढ्या लांब येऊन आपल्या भावनांचा, श्रद्धेचा अपमान होणार असेल तर मग इकडे यावं की नको असा विचार येऊन जाणं साहजिकच नाही का..?
मग प्रश्न पडतो अशा मंदिरात खरंच देवी, देव असतात की त्या देवांवर मालकी सांगणारे मुजोर, नालायला लोक..? ज्यांनी लोकांच्या श्रद्धेवर आपलं दुकान थाटलंय. जिथं देवांचं दर्शन विकलं जातंय आणि भक्त आपल्या श्रद्धेपायी लुटाला जातोय.
मग मीही सांगून टाकलं, “पुन्हा कधी दर्शनाला आलोच तर देवीला फक्त नमस्कार करू, नंतर देवीच्या नावाने कुणाचीही ओटी भर.” कदाचित या प्रसंगातून देवीलाही आपल्याला हेच सुचवायचं असेल.
देवीची मूर्ती यांनी इथे बंदिस्त केली आहे पण देवी तर सर्वत्र वास करते. मग काय हरकत आहे थोडा वेगळा विचार करायला...!
कदाचित आमच्यापेक्षाही भयानक, विचित्र अनुभव इतरांना आले असतील, प्रसंग उद्भवलेले असतील. पण एवढं नक्की, देवळात देवाच्या नावावर दुसऱ्याचं पोट चालतंय आणि कदाचित ते लोकांच्या श्रद्धेची पिळवणूक करून भरलं जातंय. आपल्या श्रद्धेची लाज आपणच राखायची. देवीला मनोभावे नमस्कार करायचा. तिच्यापर्यंत तो पोहचेलच की...!
आई तुळजाभवानी, तुझा उदो उदो...!

प्रा.सागर डवरी, हरमल