शेतकऱ्याच्या मुलीला घरात जपूनही, ती नजर चुकवून नदीवर जाते. तिथे एका कमळाच्या मोहाने ती खोल पाण्यात ओढली जाते आणि बेडूक जुन्या अटीनुसार तिचे अपहरण करतो.

बघता बघता शेतकऱ्याची मुलगी पाण्याच्या मध्यभागी पोहोचली. नदीच्या किनाऱ्यावर उभी असलेली तिची आई जीवाच्या आकांताने मुलीला मागे परतण्यासाठी विनवीत होती. पण तिला परतीची वाट सापडत नव्हती. ती पाण्यात अजून खोल गेली आणि बघता बघता दिसेनाशी झाली. शेवटी बेडकाने आपला हट्ट पूर्ण केला होता. शेतकऱ्याच्या मुलीशी लग्न करण्याचा त्याचा मनसुबा पूर्ण झाला होता.
मुलगी बघता बघता पाण्याच्या आत गेली. तिला पाण्याच्या आत तिच्या पायाला पायऱ्या लागल्या. अंदाजाने ती पायऱ्या उतरू लागली. पायऱ्या संपताच तिला पाण्याखाली एक मोठी गुहा दिसली. ती तिथे पोहोचताच गुहेला असलेले दात आपोआप उघडले गेले. बुडत्याला काठीचा आधार, त्याप्रमाणे त्या मुलीला खोल पाण्यामध्ये ती गुहा आधारासारखी दिसली. मुलगी पटकन गुहेच्या आत शिरली. ती गुहेच्या आत जाताच बाहेरून गुहा बंद झाली.
गुहेच्या आतमध्ये बघते तर ती गुहा नसून एक प्रशस्त महाल होता. त्या महालामध्ये सर्व अत्याधुनिक सुविधा होत्या. दास-दासींचा वावर होता. सगळी सुखे तिच्यासमोर हात जोडून उभी होती. कोणत्या गोष्टीची कमतरता होती तर ती एकाच गोष्टीची, तिच्या आई-वडिलांची, आपल्या माणसांची. सोन्या-चांदीच्या वस्तू, दागदागिने, रेशमी कपडे या कोणाचाही मोह तिला झाला नाही. तिला आपल्या आई-वडिलांची आठवण येऊ लागली. महालातील एक कोपरा धरून ती रडू लागली. एवढ्यात तिला एक प्रेमळ आवाज ऐकू आला, “हे बघ, तू रडू नकोस, मीच तुला इथे आणले आहे. तुला इथे जरा सुद्धा त्रास होणार नाही.”
मुलीने दचकून समोर पाहिले. बघते तर काय, एक भला मोठा बेडूक डोळे बाहेर काढून तिच्यासमोर बसला होता.
“तू कोण आहेस? मला येथे का आणले आहेस?” शेतकऱ्याच्या मुलीने घाबरत घाबरत विचारले.
तिच्या जन्मापूर्वीची सारी हकीकत तिला सांगत बेडूक म्हणाला, “तुझ्या बापाने मला तुझ्याशी लग्न करून देण्याचे वचन दिले होते. पण तुझा जन्म झाल्यावर तो वचन सोयीस्करपणे विसरला. त्यामुळे मला अशा प्रकारे तुला इथवर आणावे लागले.”
“अच्छा! म्हणून मला माझे आई-वडील घराबाहेर पाठवत नव्हते.” मुलीला राहून राहून पश्चाताप होत होता की, आपण का आईचे ऐकले नाही? का आपण तिच्या मागे मागे नदीपाशी आलो? जर आपण त्या नदीकाठी येण्याचा हट्ट केला नसता, तर आज आपल्यावर ही वेळ आली नसती. पण आता पश्चात्ताप करून काहीही उपयोग नव्हता, कारण जे घडायचे ते घडून गेले होते. ती बेडकाच्या घरात येऊन पोहोचली होती, तीही स्वतःच्या पायाने.
इकडे शेतकऱ्याची बायको घरी परतली. सोबत जाताना तिची मुलगी तिच्यासोबत होती, येताना मात्र ती पूर्ण एकाकी होती, अगदी हताश झाली होती. घरी येताच आपल्या नवऱ्याला सर्व हकीकत सांगून ती ओक्साबोक्सी रडू लागली.
कालांतराने काही दिवसांनी शेतकऱ्याची बायको पुन्हा गरोदर राहिली. महिने पूर्ण होताच तिने एका गोंडस मुलाला जन्म दिला. दिसामासाने तो मुलगा वाढू लागला. त्याचे शाळेत जाण्याचे वय झाले. तो शाळेतही जाऊ लागला व सर्व काही सुरळीत होते. पण मुलगा जसा शाळेत जाऊ लागला, तसे शाळेतील इतर मुले त्याला 'बेडकाचा मेव्हणा, बेडकाचा मेव्हणा' म्हणून चिडवू लागली. हे ऐकल्यावर शेतकऱ्याच्या मुलाला भयंकर राग येई. आपले सर्व वर्गमित्र आपल्याला बेडकाचा मेव्हणा का म्हणतात, हे त्याला कळत नसे. एके दिवशी तर त्याने रागाने एका मुलाच्या थोबाडीतच लगावली आणि ओरडून विचारले, “मला का म्हणून तुम्ही बेडकाचा मेव्हणा म्हणत आहात? मला तर बहीणही नाही.”
“अरे वा! तुला बहीण नाही ती कशी? तुला एक मोठी बहीण आहे आणि तिला नदीतील बेडकाने पळवून नेले आहे.”
“नाही, असे होऊ शकत नाही, मला कोणीच बहीण नाही.” मुलगा रडत रडत घरी आला.
रडून रडून त्याचे डोळे आणि गाल अगदी लाल लाल झाले होते. आल्या आल्या तो आईच्या कुशीत शिरून मोठमोठ्याने रडू लागला. रडत रडतच तो आईला विचारू लागला, “आई, मला मोठी बहीण आहे का?”
या प्रश्नाबरोबर आईच्या काळजात धस्स झाले. इतके दिवस मुलापासून लपवून ठेवलेली ही गोष्ट त्याला कशी बरी कळाली, हे तिला उमजेना.
“तुला कोणी सांगितले हे?”
“कोणी का सांगेना, खरं आहे का हे?” मुलगा पुन्हा पुन्हा आईला विचारू लागला. अनेक दिवस दाबून ठेवलेल्या जखमेवरची खपली मुलाने काढली होती. आपल्या मुलीच्या आठवणीने आईला रडू कोसळले. तिने आपल्या मुलाला पोटाशी धरले आणि सगळी हकीकत सांगितली, “बाळा, अशा प्रकारे तुझी बहीण त्या बेडकाच्या घरी गेली. ती कोणत्या अवस्थेत असेल देवाला ठाऊक.”
मनामधला भाऊ आता जागा झाला होता. “आई, तू काही चिंता करू नकोस. मी माझ्या बहिणीची खबरबात तुझ्यापर्यंत घेऊन येईन.” असे म्हणत आल्या पावली मुलगा नदीकाठी धावला. आपल्या एवढ्याशा दहा वर्षांच्या मुलाकडे आई बघतच राहिली. त्याला अडवण्यापूर्वीच तो पसार झाला. थेट नदीत उतरून नदीच्या पाण्यात दिसेनासा झाला.
बहिणीला ज्याप्रमाणे पायऱ्या लागल्या, त्याप्रमाणे मुलाच्या पायालाही पायऱ्या लागल्या. त्या पायऱ्या उतरून खाली जाताच तीच गुहा दिसली, जिचे दार मुलगा गुहेसमोर उभा राहताच उघडले. मुलाने गुहेत प्रवेश केल्यावर त्याला दिसला तो तोच सुशोभित महाल. दहा वर्षांचा तो अजाण मुलगा हे सगळं आपल्या डोळ्यांनी पाहत चकित होत विचार करत होता, “नदीच्या काठी हा कोणी बरे महाल बांधला असेल?”
अनोळखी मुलाला पाहून येथील द्वारपालाने त्याला आत जाण्यापासून अडवले.
“ए मुला, कोण आहेस तू? आणि इथवर कसा आलास?”
“मी तुमच्या महाराणीचा भाऊ आहे.” मुलाने सांगितले.
दोन्ही द्वारपाल एकमेकांच्या तोंडाकडे बघत राहिले. शेवटी त्यांनी महाराणीकडे निरोप पोहोचवला.
गेली अकरा वर्षे या महालात कुठल्याही अपरिचित माणसाने पाऊल सुद्धा ठेवले नव्हते, तो दहा वर्षांचा एक मुलगा इथवर येऊन आपल्याला 'माझा भाऊ' असल्याचे सांगत आहे; हा मुलगा कोण असावा? विचार करतच शेतकऱ्याची मुलगी बाहेर आली. तोच मुलाने धावत जाऊन बहिणीच्या पोटाला मिठी मारली. “ताई, ताई!” म्हणून तो रडू लागला. शेतकऱ्याच्या मुलीला कोणतेही स्पष्टीकरण मागायची गरज पडली नाही, कारण रक्ताच्या नात्याने एकमेकांना ओळखले होते.
हा भाऊ आपल्या बहिणीला बेडकाच्या तावडीतून सोडवतो का की स्वतः जाळ्यात अडकतो? पुढच्या भागात पाहूया॥ (क्रमश:)

गाैतमी चाेर्लेकर गावस