
‘मुले देवाघरची फुले' असे नेहमीच म्हटले जाते; कारण मुले निरागस, निष्पाप असतात. मोठेपणाचा अहंकार, मत्सर असे दुर्जन भाव त्यांच्या मनात नसतात. म्हणूनच मुलांवर नेहमी चांगले संस्कार करावेत असे आपली संस्कृती सांगते. लहानपणी मुलांची आकलनशक्ती अतिशय तल्लख असते. आपल्या सभोवतालचा बारीक-सारीक बदलही ती सूक्ष्मपणे टिपत असतात. अनेकदा असे प्रसंग येतात की, मुले खूप किचकट तत्त्वज्ञान निरागसपणे मांडून जातात आणि आपण थक्क होतो; याचे कारण त्यांच्या बालमनावर झालेल्या संस्कारांचा तो नमुना असतो.
पूर्वीच्या काळी मुलांना ठराविक गोष्टी बालपणीच घरी शिकवल्या जायच्या. संध्याकाळची प्रार्थना, मोठ्यांशी आदरार्थी बोलणे, तसेच त्याकाळी बहुतेकदा आई, आजी घरी असल्यामुळे जेवताना गोष्टी सांगितल्या जायच्या. या गोष्टी त्यांच्या वयाला शोभतील आणि त्यांना बोध उमगेल अशा स्वरूपाच्या असायच्या. यात काऊ, माऊ, परीराणी, राजा, राक्षस, राजकुमार, कोल्हेदादा, भुभूदादा अशा त्यांच्या बोलीतल्या पात्रांची ये-जा असायची आणि नकळत मुलांची जडणघडण होत जायची. मात्र आज खेदाने म्हणावेसे वाटते की, त्या गोष्टींची जागा वायरलेस चौकटीने घेतली आणि मुलांचे बालपणही त्यातच अडकले.
या पार्श्वभूमीवर कुमुद भिकू नायक या आपल्या मुलांना गोष्टी सांगता सांगता लिहित्या झाल्या आणि त्यांनी हा बालकथांचा खजिना 'कुमुदाल्यो काणयो' या पुस्तकातून मुलांच्या भेटीला आणला. या बालकथा संग्रहामध्ये एकूण अकरा छोट्या-मोठ्या कथा आहेत. प्रत्येक कथेतून मुलांच्या आजूबाजूला असणाऱ्या परिसराचे आणि पात्रांचे वर्णन लेखिकेने केले आहे. या कथांची भाषा प्रमाण कोंकणी असून सोप्या, प्रवाही पद्धतीने कथांची मांडणी केलेली आहे. पुस्तकाचे मुखपृष्ठ आतील कथांचे सुतोवाच करणारे आणि मुलांचे लक्ष वेधून घेणारे रंगीबेरंगी स्वरूपाचे आहे. या पुस्तकाला दामोदर मावजो यांची प्रस्तावना लाभलेली आहे.
कथासंग्रहातील पहिली कथा 'रमालो सुणो' अनोख्या पद्धतीने चोर पकडून देणाऱ्या कुत्र्याविषयी आहे. 'शेंवतूली माजरां' या कथेतून मांजरांना वैतागलेल्या शेंवतूचे वर्णन लेखिकेने केले आहे. 'प्रसाद' या कथेतून देवावर श्रद्धा जरूर असावी, मात्र तिचे रूपांतर अंधश्रद्धेत होऊ नये असा बोध लेखिकेने मुलांसमोर ठेवला आहे. 'बिलू' या कथेतून मुलांना मुक्या जनावरांच्या मालकांवर असलेल्या निस्सीम श्रद्धेची प्रचिती येते आणि त्यांच्याप्रती संवेदनशीलता वाढते. 'म्हातारेलो नातू' या कथेमध्ये त्रासात असलेल्या व्यक्तीला आपल्या परीने मदत केल्यास देव आपले कल्याण करतो असा संदेश लेखिका लहानग्यांना देते. 'आज्जेल्यो कोंबड्यो' या कथेतून कोल्हेमामाची फजिती मुलांचे मनोरंजन करते.
'राजालें सपन' या कथेतून आपल्या भीतीचा सामना करायला शिका ही शिकवण मुलांना मिळते. 'राकेस आनी म्होंवामूस' या कथेतून दोन मुलांनी युक्तीने गावाची राक्षसापासून केलेली सुटका अनुभवता येते. कष्ट आणि प्रामाणिकपणाचे फळ उशिराने का होईना पण नक्की मिळते, असा आशावाद मांडणारी कथा म्हणजे 'देमूक लागली सोर्त'. कठीण प्रसंगी गर्भगळीत न होता या विश्वासाने पुढे गेले पाहिजे म्हणजे यश आपल्या पदरात पडते, असे सांगणारी कथा म्हणजे 'धावेंची परीक्षा'. एखाद्याच्या बाह्य स्वरूपावरून आपण त्याच्याविषयी मत बनवतो, मुळात वास्तव वेगळे असू शकते हे सांगणारी कथा म्हणजे 'मारको बैल'.
या कथासंग्रहात करमळे, पणजी अशा गोमंतकीय शहरांचा उल्लेख आढळतो. लहान मुलांच्या विश्वात असणारे त्यांचे मुके मित्र कुत्रा, मांजर, कोंबड्या, कधीतरी गोष्टीतून कानावर पडणारा कोल्हा, तर काल्पनिक पात्रे राक्षस, राजा, राजकुमार, त्यांच्या घरातील नाती आजी, नातू, आई, मुलगा, बाबा असे सगळे या कथांमधून त्यांच्या भेटीला येतात. प्रत्येक कथा वेगळ्या विषयावर आधारित आहे, त्यामुळे लहान मुलांमध्ये कुतूहल जागृत करणारी आहे. या कथांचे वैशिष्ट्य म्हणजे यातील बोध जबरदस्तीने मुलांच्या माथी न मारता, ते तरलपणे त्यांच्या मनावर बिंबवण्याचे काम या कथा अलगदपणे करतात.
आज तंत्रज्ञानाच्या युगात कुटुंबातील संवाद हरवत आहे. यामुळे मुले एकलकोंडी, चिडचिडी होत आहेत. याची पालकांनी तक्रार करण्याऐवजी आपल्या कृतीमध्ये बदल करावा. आपल्या व्यस्त जीवनातून मुलांसाठी थोडा वेळ काढावा; कारण मुले महागड्या निर्जीव वस्तूंची नाही, तर आपल्या सहवासाची भुकेली असतात. त्या वेळात अशी पुस्तके त्यांना वाचायला द्यावीत, त्यांच्यासोबत वाचावीत, चित्रे रेखाटावीत, ती रंगवावीत. आपण एक पाऊल पुढे यावे; कारण मुले वारंवार सांगून नाही, तर आपल्या कृतीतून शिकत असतात. मुलांना वाचनाची गोडी निर्माण behavi यासाठी 'कुमुदाल्यो काणयो' हा बालकथा संग्रह नक्कीच त्यांना वाचायला द्यावा.
बालकथा संग्रह : कुमुदाल्यो काणयो (कोंकणी) लेखिका : कुमुद भिकू नायक

अनु देसाई, हळर्ण पेडणे-गोवा