इंद्रधनुष्यासारख्या विविध रंगांची उधळण करणारा खंड्या पक्षी हा शुद्ध जलस्रोत आणि निरोगी पर्यावरणाचा संकेत आहे. पश्चिम घाटात त्याच्या आठ प्रजाती आढळत असून, त्याची शिकार करण्याची पद्धत विलक्षण आणि वेगवान असते.

निरोगी पर्यावरणाचा दूत: रंगबेरंगी खंड्यापरवा संध्याकाळी पणजीहून घरी येताना माडापै-गवंडाळी पुलाच्या दोन्ही बाजूंना व्यापलेले इंद्रधनुष्य पाहिले. रंगबेरंगी छटा असलेले, नजर पोहोचेल तिथपर्यंत पसरलेले लांबच लांब इंद्रधनुष्य. ते पाहताच नजरेसमोर आला एक लहानसा पक्षी – खंड्या. निळा, हिरवा, पांढरा, गुलाबी, काळा, लाल, नारिंगी, पिवळा अशा कितीतरी रंगांच्या छटा असलेला, आखूड शेपूट आणि निमुळती चोच असलेला रंगबेरंगी खंड्या. एखाद्या परिसरात खंड्या दिसला म्हणजे समजायचं की आसपास कुठेतरी स्वच्छ पाण्याचा स्रोत किंवा जलाशय आहे. आकाशातील इंद्रधनुष्य आणि खंड्या पक्षी हे दोन्ही निरोगी पर्यावरणाचे संकेत आहेत. कारण इंद्रधनुष्य पाण्याच्या सूक्ष्म थेंबांमुळे दिसते, तर खंड्या पक्षी स्वच्छ जलस्रोतांमुळे पाहायला मिळतो.
पश्चिम घाटात खंड्याच्या आठ प्रजाती आढळतात. व्हाइट थ्रोटेड किंगफिशर (व्हाइट-ब्रेस्टेड किंगफिशर), कॉमन किंगफिशर, पाइड किंगफिशर, ओरिएंटल ड्वार्फ किंगफिशर, ब्ल्यू-इयर्ड किंगफिशर, कॉलर्ड किंगफिशर, स्टॉर्क-बिल्ड किंगफिशर आणि ब्लॅक-कॅप्ड किंगफिशर. यांपैकी कॉलर्ड किंगफिशर आणि ब्लॅक-कॅप्ड किंगफिशर या दोन प्रजाती कांदळवनात आढळतात.
कॉलर्ड किंगफिशर हा पक्षी प्रामुख्याने खाडी, कांदळवन आणि चिखलाच्या किनाऱ्यांवर दिसून येतो. याचा रंग निळसर-हिरवा असून मानेभोवती पांढरा पट्टा (कॉलर) असतो. ब्लॅक-कॅप्ड किंगफिशरच्या डोक्यावर गडद काळी ‘टोपी’ असते आणि पंख गडद निळ्या रंगाचे असतात. हे पक्षी किनारपट्टीवर आणि कांदळवनांत दिसून येतात.
पटकन ओळखता येण्यासारखा खंड्या म्हणजे पाइड किंगफिशर. पांढऱ्या व काळ्या पिसांच्या ठिपक्यांचे आणि पट्ट्यांचे अंग असलेल्या या पक्ष्याची मादी व नर जवळजवळ सारखेच दिसतात. नर पक्ष्याच्या मानेभोवती दोन काळे पट्टे, तर मादीच्या मानेभोवती एक काळा पट्टा असतो; इतकाच त्यांच्यातील फरक.
पांढऱ्या छातीचा खंड्या (व्हाइट थ्रोटेड/व्हाइट-ब्रेस्टेड किंगफिशर) आपल्या उदरनिर्वाहासाठी इतर अनेक खंड्या प्रजातींप्रमाणे केवळ जलाशयातील मासे आणि किटकांवर अवलंबून राहत नाही. हा पक्षी प्रामुख्याने भूमीवरील किटक खाऊन आपला उदरनिर्वाह करतो. या पक्षाचे डोके, मान आणि खालचा भाग गर्द तपकिरी रंगाचा असतो. तांबड्या रंगाची चोच लांब, जड आणि टोकदार असते. पांढऱ्या रंगाचा छातीचा भाग उडताना स्पष्ट दिसतो, म्हणून याला पांढऱ्या छातीचा खंड्या असे म्हणतात.
खंड्या पक्षी नदी, ओढा, तलाव आणि इतर जलाशयांच्या आसपास आढळतो. माशांव्यतिरिक्त हा पक्षी लहान किटक, बेडकाची पिल्ले आणि अळ्याही खातो. हा पक्षी आपले घरटे ओढ्याच्या किंवा जलाशयाच्या किनारी बांधतो. घरटे बांधण्यासाठी तो एखाद्या पाणथळ खड्ड्याचाही वापर करू शकतो.
खंड्याचे घरटे म्हणजे एक ते दोन मीटर लांबीचा आडवा खणलेला बोगदा. घरट्याच्या शेवटच्या टोकाचा भाग अंड्यांसाठी रुंद केलेला असतो. खंड्याच्या घरट्यात बहुधा किड्यांचे पंख आणि माशांची हाडे आढळून येतात. हा पक्षी एका वेळी तकतकीत पांढऱ्या रंगाची लंबगोल पाच ते सात अंडी घालतो.
उडताना हा पक्षी ‘ची-ची, ची-ची’ असा तीव्र आवाज काढतो. खंड्या चिमणीपेक्षा आकाराने मोठा असतो. खडकावर बसून हा पक्षी आपले शेपूट हलवीत आणि मान इकडे-तिकडे फिरवीत बसलेला दिसतो.
शिकार करण्यासाठी हा पक्षी विलक्षण पद्धत वापरतो. पाण्यावरून उडत असताना त्याची नजर पृष्ठभागावर येणाऱ्या माशांच्या हालचालींवर असते. हालचाल दिसताच हा पक्षी उडताना एकदम थांबतो आणि पंखांची उघडझाप करीत हवेत लोंबकळत राहतो. भक्ष्य दिसले आणि ते आपल्या पकडीत येईल याची खात्री झाली की हा पक्षी विजेच्या गतीने पाण्यात झेप घेतो व भक्ष्याला चोचीत पकडून पाण्याबाहेर येतो. अंग झटकत तो लगेच भक्ष्याला घेऊन जवळच्या फांदीवर बसतो आणि ते फांदीवर आपटून पटकन खाऊन टाकतो.

- स्त्रिग्धरा नाईक
(लेखिका इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर आहे)