गोव्यात रस्ता अपघातांत साडेपाच महिन्यांत १२२ जणांचा मृत्यू

राज्यात दिवसाला सरासरी ७ अपघात; ३२ तासांत सरासरी एकाचा अपघातीमृत्यू


38 mins ago
गोव्यात रस्ता अपघातांत साडेपाच महिन्यांत १२२ जणांचा मृत्यू

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : राज्यात दोन दिवसांत पाच अपघाती मृत्यू झाले आहेत. वाहतूक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, यंदा १ जानेवारी ते १३ जून या साडेपाच महिन्यांत (१६४ दिवसांत) १,१९४ अपघात झाले. त्यात १२२ जणांचा मृत्यू झाला. गेल्या वर्षीच्या तुलनेत ८९ अपघात (८.०५ टक्के) वाढले आहेत. मृत्यूंमध्ये मात्र चारने (३.०१७ टक्के) घट झाली आहे. गंभीर जखमी आणि किरकोळ जखमींची संख्या वाढली आहे. राज्यात दिवसाला सरासरी ७ अपघात आणि ३२ तासांत सरासरी एकाचा अपघातीमृत्यू होतो.
वाहतूक विभागाच्या आकडेवारीनुसार, २०२५ मध्ये १ जानेवारी ते १३ जून या कालावधीत १,१०५ अपघात झाले होते. यंदा १,१९४ अपघात झाले आहेत. त्यामुळे गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा ८९ अपघात अधिक झाले आहेत. गेल्या वर्षी १२६ अपघाती मृत्यू झाले होते, यंदा १२२ झाले आहेत. यंदा १६४ दिवसांत ११६ अपघातांत १४८ जणांना गंभीर दुखापत झाली, तर २६७ किरकोळ अपघातांत ४२० जणांना किरकोळ दुखापती झाल्या. शिवाय ६९४ वाहनांचे मोठे नुकसान झाले. राज्यात वरील कालावधीत २०२५ मध्ये १०३ अपघातांत १२४ जणांना गंभीर, तर २२५ अपघातांत ३५० जणांना किरकोळ दुखापती झाल्या होत्या. शिवाय ६५४ वाहनांचे मोठे नुकसान झाले होते.
यंदा रस्ता सुरक्षा उपाय आणि आपत्कालीन वैद्यकीय मदतीमुळे जीव वाचण्याचे प्रमाण वाढले आहे. मात्र, वाहतूक नियमांचे उल्लंघन, वेगमर्यादा आणि विनाहेल्मेट तसेच सीटबेल्टचा वापर केला जात नसल्यामुळे अपघातांत वाढ होत आहे. वाहन चालकांनी नियमांचे पालन करण्याची आवश्यकता आहे.
एकाच​ दिवसात चौघांचा मृत्यू
रविवार, १४ जून रोजी चौघांचा अपघाती मृत्यू झाला. यामुळे १ जानेवारी ते १४ जून २०२६ या १६५ दिवसांत १२६ जणांचा मृत्यू झाल्याचे समाेर आले आहे.