मानसिक आरोग्य आणि योग

योगामध्ये अशा अनेक पद्धती आहेत, ज्यांच्या साहाय्याने तुम्ही स्वतःच्या आतमध्ये योग्य प्रकारचे रसायन निर्माण करू शकता, ज्यामुळे शांत आणि आनंदी असणे तुमच्यासाठी अगदी स्वाभाविक बनते. यात काहीही शंका नाही की, लाखो लोकांना याचा लाभ झालेला आहे.

Story: विचारचक्र |
4 hours ago
मानसिक आरोग्य आणि योग

सद्गुरू : दरवर्षी, या जगात सुमारे ८,००,००० लोक आत्महत्या करतात. हे प्रमाण गुन्हेगारीमुळे होणारे खून आणि युद्धांमुळे होणारे मृत्यू यांच्या एकत्रित संख्येपेक्षा खूप जास्त आहे. याचा अर्थ, दर ४० सेकंदांनी एक व्यक्ती स्वतःचे जीवन संपवत आहे. आपल्याला परिचित असलेली एखादी व्यक्ती किंवा समाजात प्रसिद्ध व्यक्ती किंवा महत्त्वाची मानली जाणारी एखादी व्यक्ती मृत्युमुखी पडली, तरच सर्वजण त्याची दखल घेतात.

आत्महत्येचे विचार का येतात?

एखाद्या व्यक्तीला स्वतःचे जीवन संपवावे असे का वाटते? काही जण त्यांच्या जीवनातील परिस्थितींमुळे आत्महत्या करत असतील; पण मोठ्या प्रमाणात लोक त्यांच्या मानसिक अवस्थांमुळे आत्महत्या करत आहेत.

आपल्या शिक्षण व्यवस्थेत आपण असे काहीही रुजवलेले नाही, ज्यामुळे आपली शारीरिक रचना आणि मानसिक रचना हे दोन्ही कसे हाताळले पाहिजे हे शिकवले जाईल. बहुतेक मानवांना स्वतःची बुद्धिमत्ता कशी हाताळावी हे कधीच शिकवले गेलेले नाही. सध्या तुमच्याकडे असलेल्या मेंदूचा अर्धाच मेंदू जर तुमच्याकडे असता, तर तुम्हाला कोणत्याही प्रकारचे मानसिक विकार झाले नसते. आता, तुमच्याकडे एका ठराविक पातळीची बुद्धिमत्ता आहे; पण तिचा उपयोग स्वतःच्या कल्याणासाठी कसा करायचा, याचे तुम्ही कोणतेही प्रशिक्षण घेतलेले नाही किंवा तुम्ही अशा सामाजिक वातावरणात देखील राहात नाही जिथे हे शिकवले जात आहे. त्यामुळे, तुमची स्वतःची बुद्धिमत्ता तुमच्याच विरोधात काम करत आहे. हे इतके निराशाजनक आहे की, असे वाटते की यातून बाहेर पडण्याचा कोणताही मार्गच नाही. या कारणामुळे लोक आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलतात.

हे अगदी सहजपणे थांबवता येऊ शकते, जर अशी सुयोग्य व्यवस्था निर्माण झाली की, जिथे लहानपणापासूनच प्रत्येकाला अशा काही प्रक्रिया शिकवल्या जातील जेणेकरून ते स्वतःच्याच स्वभावामुळे आनंदी असतील आणि त्यांचा जीवनाचा अनुभव स्वाभाविकपणे सुखद असेल. जेव्हा एखादी व्यक्ती स्वतःच्याच स्वभावामुळे आनंदी असते, तेव्हा ती व्यक्ती स्वतःचे जीवन का बरे संपवेल? ती व्यक्ती नैराश्यात का बरे जाईल?

नैराश्यातून बाहेर पडणे

"नैराश्य" या शब्दाचा अर्थ केवळ वैद्यकीयदृष्ट्या निदान झालेले नैराश्य एवढाच नाही. आज तुमच्या जीवनात दोन गोष्टी जरी बिघडल्या, तरी तुम्ही सौम्य स्वरूपाच्या नैराश्यात जाऊ शकता. माझ्या मते, बहुतेक लोकांनी स्वतःच्या जीवनातील कोणत्या ना कोणत्या परिस्थितीमुळे कधीतरी नैराश्याचा अनुभव घेतलेला असतो. परंतु काही तासांतच ते स्वतःशी संवाद साधून स्वतःला त्यातून बाहेर काढतात. ते एखाद्या प्रेरणेचा आधार घेतील - एखाद्या व्यक्तीवरील त्यांचे प्रेम, स्वतःच्या देशाबद्दलची भावना किंवा त्यांच्या जीवनातील एखादी महत्त्वाची गोष्ट - आणि अशा गोष्टींच्या साहाय्याने ते स्वतःला त्यातून बाहेर काढतात. एकतर तुम्ही स्वतःशी संवाद साधून त्या गोष्टीतून बाहेर पडाल, किंवा तुमचे मित्र किंवा तुमच्या कुटुंबातील सदस्यांशी बोलाल आणि ते तुम्हाला त्या गोष्टीतून बाहेर पडण्यास मदत करतील; नाहीतर तुम्ही व्यावसायिक मदत घ्याल.

जर नैराश्यातून बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग उपलब्ध नसता, तर मानसशास्त्रज्ञ तुमच्यासोबत तासंतास बसून संवाद का साधतील? अर्थातच, त्यांना हे माहीत असते की, संवादाच्या माध्यमातून ते तुम्हाला त्या गोष्टीतून बाहेर काढू शकतात. नाहीतर रासायनिक उपचार असतोच. रसायनशास्त्राचा विचार केला, तर मानवी शरीर ही या पृथ्वीवरील सर्वात प्रगत रासायनिक प्रयोगशाळा आहे. प्रश्न केवळ इतकाच आहे की, या रासायनिक प्रक्रियेचे तुम्ही अत्यंत कुशल व्यवस्थापक आहात की अत्यंत अकार्यक्षम व्यवस्थापक आहात. योग म्हणजे स्वतःच्या या रासायनिक प्रयोगशाळेचे अत्यंत कार्यक्षम पद्धतीने व्यवस्थापन करण्याची प्रक्रिया.

मानसिक आरोग्यासाठी योग

अमेरिकेसारख्या समृद्ध देशात, जिथे आहाराचे आणि जीवनशैलीचे असंख्य पर्याय उपलब्ध आहेत, असे सांगितले जाते की, तेथील ७० टक्के लोकसंख्या डॉक्टरांनी लिहून दिलेली कोणत्या ना कोणत्या प्रकारची औषधे घेत आहे. ते लोक स्वतःचे मानसिक संतुलन आणि आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी बाहेरून रसायने शरीरात घेत आहेत. पण बाहेरून या गुंतागुंतीच्या रासायनिक प्रयोगशाळेचे व्यवस्थापन करणे ही एक अत्यंत कठीण गोष्ट आहे. त्याचे व्यवस्थापन आतून करता येणे शक्य आहे; पण त्यासाठी तुमची पोहोच स्वतःच्या आंतरिकतेपर्यंत असली पाहिजे.

ज्याप्रमाणे तुम्ही बाह्य परिस्थिती घडवू शकता, त्याचप्रमाणे तुम्ही तुमची आंतरिकता देखील घडवू शकता. जसे बाह्य सुखसोयी आणि सुविधा निर्माण करण्यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान उपलब्ध आहे, त्याचप्रमाणे आंतरिक कल्याण निर्माण करण्यासाठी देखील एक संपूर्ण विज्ञान आणि तंत्रज्ञान उपलब्ध आहे. ‘तुम्ही कोण आहात’ याच्या मूलभूत रसायनशास्त्रात बदल घडवून आनंदाचे रसायन निर्माण करण्यासाठी काही निश्चित वैज्ञानिक पद्धती आहेत. एकदा का तुम्ही आनंदाचे हे रसायन निर्माण केले, की मग तुम्ही एखाद्या बाह्य कारणामुळे नव्हे, तर स्वतःच्याच स्वरूपामुळे आनंदी बनता. जेव्हा तुम्ही स्वतःच्या स्वरूपामुळेच आनंदी असता, तेव्हा तुमच्या जीवनाचा संपूर्ण आयाम, या जगाकडे पाहण्याची आणि स्वतःला व्यक्त करण्याची तुमची पद्धत पूर्णपणे बदलून जाते. तुम्ही ज्या प्रकारे जीवन अनुभवता ते देखील स्वाभाविकपणे बदलून जाते.

योगामध्ये अशा अनेक पद्धती आहेत, ज्यांच्या साहाय्याने तुम्ही स्वतःच्या आतमध्ये योग्य प्रकारचे रसायन निर्माण करू शकता, ज्यामुळे शांत आणि आनंदी असणे तुमच्यासाठी अगदी स्वाभाविक बनते. यात काहीही शंका नाही की, लाखो लोकांना याचा लाभ झालेला आहे. आमच्याकडे अनुभवावर आधारित इतका पुरावा उपलब्ध आहे की, हे खरोखर कार्य करते याची आम्हाला खात्री आहे. आता रक्तातील विविध जैविक निर्देशकांचा अभ्यास केला जात आहे आणि योगाभ्यासामुळे अनुवांशिक रचनांमध्ये देखील बदल होत असल्याचे दिसून येत आहे. हे स्पष्टपणे दर्शवते की, योग्य प्रकारचा योगाभ्यास करून तुम्ही मानसिक विकारांना केवळ प्रतिबंधच करू शकत नाही, तर योग्य प्रकारचे सराव करून यातून बाहेर देखील पडता येऊ शकते.


-सद्गुरू (ईशा फाऊंडेशन)