गोवा पोलीस : शिस्तीसोबत संवेदनशीलतेची गरज

Story: अंतरंग - गोवा |
4 hours ago
गोवा पोलीस : शिस्तीसोबत संवेदनशीलतेची गरज

गोव्याची ओळख आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळ, तसेच शांत आणि निसर्गसंपन्न राज्य अशी आहे. मात्र, मागील दोन आठवड्यांत पोलीस दलाशी निगडित काही धक्कादायक घटना समोर आल्या आहेत. त्यात मायणा-कुडतरी पोलीस स्थानकातील नागरिकांना झालेली मारहाण आणि लैंगिक छळ प्रकरण, म्हापशातील तरुणाची आत्महत्या आणि मोले महामार्गावरील पोलिसांकडून कथित लाचखोरी, या तीन घटनांमुळे गोवा पोलीस पुन्हा चर्चेत आले आहेत. त्यामुळे कायद्याचे रक्षकच जर जनतेशी अरेरावी करू लागले, तर सामान्य माणसाने आधार कोणाचा घ्यावा, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

सगळ्यात संवेदनशील घटना म्हापसा पोलीस स्थानकाच्या हद्दीत घडली. म्हापसा परिसरात ३ जून रोजी सार्वजनिक ठिकाणी रस्त्याच्या बाजूला कचरा टाकतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्याची दखल घेऊन म्हापसा पोलिसांनी सॅम्युअल ब्रागांझा या २२ वर्षीय महाविद्यालयीन तरुणाला चौकशीसाठी बोलावून घेऊन त्याच्यावर गुन्हा नोंद केला आणि त्याला कायदेशीर नोटीस देऊन सोडण्यात आले होते. मात्र पोलीस स्थानकातील चौकशीचा ताण आणि सोशल मीडियावरील ट्रोलिंगमुळे तो प्रचंड खचला. या दोन्ही घटनांमुळे झालेल्या बदनामीच्या मानसिक तणावातून त्याने स्वत:वर पिस्तुलाची गोळी झाडून घेऊन आत्महत्या केली. या दुर्दैवी घटनेनंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी चौकशीचे आदेश दिल्यानंतर गोवा पोलिसांनी खात्याअंतर्गत चौकशी सुरू केली आहे.

याच दरम्यान रामनगरी-नेसाय येथे ६ जून रोजी रात्री दोन गटांत वाद झाला होता. त्यावेळी मायणा-कुडतरी पोलिसांनी एका अल्पवयीन मुलासह पाच युवकांना ताब्यात घेतले होते. त्यांना रात्रभर पोलीस रेस्ट रूममध्ये ठेवले. त्यावेळी त्यांचे कपडे उतरवून अमानुष मारहाण केली होती. पोलिसांकडून त्यांचा लैंगिक छळही झाल्याचा आरोप करण्यात आला. याची दखल घेऊन गोवा पोलीस खात्याने उपनिरीक्षक संकेत नाईक, गौरव नाईक यांच्यासह हवालदार समीर सुधीर, कॉन्स्टेबल चेतन कोळी आणि प्रतीक पुंडलिक या पाच जणांना निलंबित करून कारवाई केली.

याच दरम्यान मोले चेकपोस्टवरून जाणाऱ्या वाहनचालकांकडून पोलीस पैसे मागत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या प्रकाराची दखल घेऊन दक्षिण गोव्याच्या पोलीस अधीक्षकांनी चौकशी सुरू करण्याचे आदेश दिले आहेत.

पोलीस दल हे केवळ गुन्हेगारांवर वचक ठेवण्यासाठी नसून, सामान्य जनतेला सुरक्षितता प्रदान करण्यासाठी आहे, याचे भान पोलीस कर्मचाऱ्यांनी ठेवण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे वरील घटनेची दखल घेतल्यास गोवा पोलिसांना केवळ 'शिस्त' शिकवून चालणार नाही, तर त्यांना मानसिक संवेदनशीलता आणि सहानुभूतीचे प्रशिक्षण देणे काळाची गरज बनली आहे. पोलिसांनी चौकशी दरम्यान गुन्हेगार आणि सामान्य नागरिक यातील फरक ओळखला पाहिजे. त्यामुळे पोलीस खात्यात शिस्तीसोबत संवेदनशीलताही आवश्यक आहे. त्यासाठी पोलीस खात्याने तत्काळ उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे.

- प्रसाद शेट काणकोणकर