आरएसएस प्रमुख म्हणतात, पाकिस्तानशी संवादाचे दरवाजे खुले ठेवा!

दत्तात्रेय होसबळे यांच्या वक्तव्याचे समर्थन

Story: न्यूज डेस्क । गाेवन वार्ता |
14th June, 09:36 pm
आरएसएस प्रमुख म्हणतात, पाकिस्तानशी संवादाचे दरवाजे खुले ठेवा!

तिरुवनंतपुरम : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी पाकिस्तानशी संवाद कायम ठेवण्याबाबत संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांनी केलेल्या वक्तव्याचे समर्थन केले आहे. पाकिस्तानबाबत बोलताना होसबळे हे तेथील जनतेविषयी बोलत होते, असे भागवत यांनी स्पष्ट केले.संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना भागवत म्हणाले, पाकिस्तानात असे अनेक लोक आहेत ज्यांना भारताची फाळणी ही चूक होती असे वाटते. तेथील काही पत्रकार संघाच्या कार्याचे कौतुक करतात. तसेच दोन राष्ट्रांच्या सिद्धांताला विरोध करणारा आणि एकत्र राहणे अधिक चांगले होते असे मानणारा एक प्रवाह पाकिस्तानात अस्तित्वात असल्याचा दावाही त्यांनी केला.
भागवत म्हणाले की, भविष्यात भारताने पाकिस्तानवर निर्णायक विजय मिळवला तरी तेथील जनतेला शांततेत जगण्याची संधी मिळाली पाहिजे. त्यासाठी संवादाचे काही मार्ग खुले ठेवणे आवश्यक आहे. आपण हिटलरसारखे नाही. अन्याय आणि अत्याचाराचा पराभव करणे गरजेचे आहे, पण जे चांगले आहे ते जपलेही पाहिजे, असे ते म्हणाले.भागवत यांनी स्पष्ट केले की, कोणत्याही देशाबाबत संघाची स्वतंत्र परराष्ट्रनीती नाही. पाकिस्तानसह सर्व देशांबाबत संघ केंद्र सरकारच्या भूमिकेचेच पालन करतो.
होसबळे काय म्हणाले होते?
एका मुलाखतीत दत्तात्रेय होसबळे यांनी म्हटले होते की, देशाची सुरक्षा आणि स्वाभिमान यांचे संरक्षण करणे हे सरकारचे कर्तव्य आहे. मात्र, त्याचवेळी संवादाचे दरवाजे पूर्णपणे बंद करू नयेत आणि आवश्यक तेव्हा चर्चेसाठी तयार राहिले पाहिजे. पाकिस्तानकडून सुरू असलेल्या दहशतवादाला भारताने कसे सामोरे जावे, या प्रश्नावर त्यांनी हे मत व्यक्त केले होते.       

हेही वाचा