ट्रेन उशिरा आली म्हणून परिक्षेला जाणारे हजारो विद्यार्थ्यांचे मध्यरात्री आंदोलन

पटणा, बिहार येथील घटना.

Story: वेब डेस्क| गोवन वार्ता |
44 mins ago
ट्रेन उशिरा आली म्हणून परिक्षेला जाणारे हजारो विद्यार्थ्यांचे मध्यरात्री आंदोलन

पटणा : बिहार पोलीस विभागात भरती परीक्षेसाठी आलेल्या हजारो विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाटण्यातील पाटलीपुत्र रेल्वे स्थानकावर हिंसक वळण लागले. रेल्वे गाड्यांची अपुरी संख्या आणि विलंबाने संतप्त झालेल्या उमेदवारांनी रेल्वे रुळांवर ठिय्या मांडत गाड्या रोखल्या.

student protest at patliputra station in bihar turns violent: train blockade, stone-pelting - video

केंद्रीय निवड मंडळाद्वारे (कॉन्स्टेबल भरती) ४,१२८ पदांसाठी १४ ते १७ जून दरम्यान ही परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. परीक्षेसाठी हजारो विद्यार्थी स्थानकावर जमा झाले होते, मात्र गर्दीच्या तुलनेत रेल्वे गाड्या कमी असल्याने अनेक विद्यार्थ्यांना डब्यात प्रवेश मिळाला नाही. यामुळे संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी रेल्वे प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू केली. काही समाजकंटकांनी वारंवार गाड्यांची साखळी ओढून (चेन पुलिंग करून) गाड्या रोखून धरल्या. तसेच स्थानकावरील स्टॉल्स आणि रेल्वे मालमत्तेची मोठ्या प्रमाणावर तोडफोड केली. एका प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार, विद्यार्थ्यांनी रेल्वे इंजिनसमोर उभे राहून थेट गाड्यांवर दगडफेक सुरू केली.



स्थानकावरील एका महिला उमेदवाराने सांगितले की, ज्या विद्यार्थ्यांना गर्दीमुळे गाडीत चढता आले नाही, त्यांनी इतरांनाही जाण्यापासून रोखले. आपली परीक्षा चुकणार या भीतीने, 'आपल्याला जमले नाही तर इतरांनाही परीक्षा देता येऊ नये आणि परीक्षा रद्द व्हावी,' या हेतूने काही जणांनी दगडफेक केल्याचा दावा तिने केला.



घटनेची माहिती मिळताच पाटण्याचे जिल्हा दंडाधिकारी मोठा पोलीस फौजफाटासह घटनास्थळी दाखल झाले. प्रशासनाने उमेदवारांना शांततेचे आवाहन केले आणि विद्यार्थ्यांसाठी दोन विशेष गाड्यांची सोय करण्यात आल्याचे सांगितले. परंतु, आंदोलनकर्ते मागे हटले नाहीत. मध्यरात्रीच्या सुमारास परिस्थिती हाताबाहेर गेल्याने पोलिसांना शेवटी सौम्य लाठीमार करावा लागला.

सध्या पाटलीपुत्र स्थानकावर कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे. परीक्षार्थींना घेऊन जाणाऱ्या रेल्वे गाड्या रवाना झाल्या असून रेल्वे वाहतूक पूर्ववत सुरू झाली आहे. 

हेही वाचा