सोलापुरात मुख्याध्यापकाची पत्नी व दोन मुलांसह आत्महत्या

Story: वेब डेस्क| गोवन वार्ता |
46 mins ago
सोलापुरात मुख्याध्यापकाची पत्नी व दोन मुलांसह आत्महत्या

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील हत्तीज येथे एकाच कुटुंबातील चार जणांच्या दुर्दैवी मृत्यूमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. शेअर बाजारातील मोठ्या आर्थिक नुकसानीच्या तणावातून नंदूरबार येथील जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक योगेश बाळासाहेब पाटील (वय ४०) यांनी पत्नी व दोन लहान मुलांना विष देऊन स्वतः गळफास घेत जीवन संपवले.

या धक्कादायक घटनेत योगेश पाटील यांच्यासह त्यांची पत्नी माधुरी (वय ३७), मुलगा अथर्व (वय ११) आणि शिवांश (वय ९) या चार जणांचा मृत्यू झाला आहे. ही घटना गुरुवारी मध्यरात्री घडली असावी, असा अंदाज वैराग पोलिसांनी व्यक्त केला आहे.

योगेश पाटील हे नंदूरबार जिल्ह्यातील चौगाव येथील शाळेत कार्यरत होते. शालेय सुट्ट्यांमुळे ते हत्तीज येथे आले होते. शुक्रवारी सकाळी नेहमीप्रमाणे दूध विक्रेता घरी आला, मात्र दरवाजा वाजवूनही आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. शेजाऱ्यांनीही खिडकीतून पाहिले असता संशय बळावला. अखेर ग्रामस्थांच्या मदतीने दरवाजा तोडला असता, पत्नी व दोन्ही मुले खाटेवर मृतावस्थेत आढळली, तर योगेश यांनी गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आले.

पोलिसांना घटनास्थळावरून २६ पानांची सविस्तर सुसाईड नोट सापडली आहे. यामध्ये आर्थिक व्यवहार, शेअर बाजारातील नुकसान आणि मालमत्तेचा उल्लेख असून, आत्महत्येसाठी कोणालाही जबाबदार धरण्यात आलेले नाही. जग मला वाईट म्हणेल, पण मी बायको आणि मुलांना एकटे सोडून जाऊ शकत नव्हतो. माझ्या पश्चात त्यांचा सांभाळ कोण करणार? त्यांना आयुष्यभर दुःख सोसावे लागू नये, म्हणूनच मी हे पाऊल उचलत आहे, अशा भावनिक शब्दांत त्यांनी पत्रात आपल्या वेदना मांडल्या आहेत.

प्राथमिक तपासानुसार, योगेश यांनी पत्नी व मुलांना आईस्क्रीममधून विषारी द्रव दिले आणि नंतर स्वतः आत्महत्या केली. एका सुशिक्षित मुख्याध्यापकाने संपूर्ण कुटुंबासह आयुष्य संपवल्याने हत्तीज गावासह शैक्षणिक क्षेत्रात मोठी हळहळ व्यक्त होत आहे. वैराग पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

हेही वाचा