अमेरिका-इराण शांतता कराराचा परिणाम; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण

होर्मुझ सामुद्रधुनी खुली होण्याच्या आशेने जागतिक बाजाराला दिलासा

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
43 mins ago
अमेरिका-इराण शांतता कराराचा परिणाम; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण

वॉशिंग्टन : अमेरिका आणि इराण यांच्यात शांतता करारावर एकमत झाल्याची घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प ( Donald Trump)  यांनी केल्यानंतर जागतिक तेलबाजारात मोठी घसरण नोंदवली गेली आहे.  ब्रेंट क्रूडच्या किमतीत ३.९ टक्क्यांची घसरण होऊन दर प्रति बॅरल ८४ डॉलरपर्यंत आले.  तर अमेरिकन क्रूडचे दर ४.८ टक्क्यांनी घसरून ८१ डॉलर प्रति बॅरलवर पोहोचले.

फेब्रुवारी अखेरीस अमेरिका आणि इस्रायलने इराणवर कारवाई सुरू केल्यानंतर तेलाच्या किमतींमध्ये मोठी वाढ झाली होती. मात्र, संभाव्य शांतता कराराच्या पार्श्वभूमीवर गेल्या आठवड्यापासून बाजारात सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून; शुक्रवारी तेलाचे दर ९० डॉलरच्या खाली आले होते.

ट्रम्प यांनी सोशल मीडियावर "इराणसोबतचा करार पूर्ण झाला असून; अधिकृत स्वाक्षरी येत्या शुक्रवारी स्वित्झर्लंडमध्ये होणार आहे," अशी घोषणा केली. इराणनेही या कराराच्या मसुद्याला अंतिम स्वरूप देण्यात आल्याची पुष्टी केली आहे.

करारानुसार इराणच्या बंदरांवरील अमेरिकेची नौदल नाकेबंदी हटवली जाणार असून; जागतिक तेलवाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाची असलेली होर्मुझ सामुद्रधुनी (Strait of Hormuz) पुन्हा पूर्णपणे खुली करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. युद्धकाळात या मार्गात पेरण्यात आलेले सागरी अडथळे  हटविण्याचे कामही हाती घेतले जाणार आहे.

तथापि, तज्ज्ञांच्या मते तेलबाजार पूर्वपदावर येण्यासाठी अजून बराच काळ लागेल. मध्यपूर्वेतील अनेक तेलविहिरी युद्धामुळे बंद ठेवण्यात आल्या होत्या. उत्पादन पुन्हा सुरू करण्यासाठी काही आठवडे लागू शकतात. तसेच युद्धादरम्यान नुकसान झालेल्या ऊर्जा प्रकल्पांच्या दुरुस्तीचे कामही करावे लागणार आहे.

ऊर्जा विश्लेषकांचे मत आहे की सध्याची घसरण तात्पुरती ठरू शकते. जागतिक मागणी वाढल्यानंतर आणि आपत्कालीन तेलसाठे पुन्हा भरले जाऊ लागल्यानंतर तेलाच्या किमती पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. काही तज्ज्ञांनी तर उन्हाळ्याच्या अखेरीस कच्च्या तेलाचे दर पुन्हा १०० डॉलरच्या पुढे जाऊ शकतात, असा इशाराही दिला आहे.

दरम्यान, शांतता कराराच्या बातमीमुळे अमेरिकन शेअर बाजारातील वायदे व्यवहारातही तेजी दिसून आली. डाऊ जोन्स, एसअँडपी ५०० आणि नॅस्डॅक निर्देशांकांच्या फ्युचर्समध्ये वाढ नोंदवली गेली असून;  गुंतवणूकदारांमध्ये आशादायी वातावरण निर्माण झाले आहे.

हेही वाचा