‘चर्चेची वार्ता’मध्ये वाचकांनी मांडले विचार : पर्यटकांच्या हुल्लडबाजीवर नियंत्रण हवे

पणजी : गोव्यात गेल्या काही काळापासून समुद्र, चिरेखाणींचे पाण्याचे खंदक, धबधबे आणि नद्यांमध्ये बुडून मृत्यू होणाऱ्यांच्या संख्येत चिंताजनक वाढ झाली आहे. दरवर्षी पावसाळ्यात आणि पर्यटनाच्या हंगामात अनेक तरुणांना आपले प्राण गमवावे लागतात. या वाढत्या दुर्घटनांवर नेमके काय उपाय करावेत? प्रशासन कुठे कमी पडत आहे की लोकांचा बेजबाबदारपणा याला कारणीभूत आहे? या अत्यंत गंभीर विषयावर ‘दै. गोवन वार्ता’ने आपल्या ‘चर्चेची वार्ता’ या उपक्रमांतर्गत वाचकांची मते जाणून घेण्याचा प्रयत्न केला. गोमंतकीय वाचकांनी यावर व्यक्त केलेल्या काही निवडक आणि रोखठोक प्रतिक्रिया पुढीलप्रमाणे.

सरकार आपल्या परीने खूप प्रयत्न करत आहे. परंतु, जर लोक आणि विशेषतः तरुण पिढी स्वतःहून योग्य ती खबरदारी घेण्यास तयार नसेल, तर सर्व उपाययोजना व्यर्थ ठरतील. अशा ठिकाणी फिरताना किंवा आनंद लुटताना प्रत्येकाने स्वतःची काळजी घेणे, हाच यावर एकमेव ठोस उपाय आहे.
-श्रीकांत कवळेकर
सध्या उघड्या पडलेल्या चिरेखाणी हा मोठा धोका बनला आहे. या खाणींचे खंदक बुजवण्यासाठी इमारतींच्या बांधकामाचा राडारोडा आणि टाकाऊ मातीचा वापर केला पाहिजे. यामुळे शहरांतील राडारोड्याची विल्हेवाट लावण्याचा प्रश्नही सुटेल आणि धोकादायक खाणीही बुजवल्या जातील.
-प्रदीप सावंत
नदीकाठी किंवा कोणत्याही पाण्याच्या ठिकाणी पोहण्याचा बेत असल्यास, प्रत्येकाने वैयक्तिक सुरक्षेची काळजी घेतली पाहिजे. आणीबाणीच्या प्रसंगी बचावासाठी सोबत सुरक्षा दोर बाळगणे अत्यंत आवश्यक आहे.
-अजिंक्य गावकर
लोक सहलीसाठी समुद्र किंवा नद्यांच्या धोकादायक ठिकाणी जातात. याऐवजी सरकारने विविध स्वयंसेवी संस्था आणि स्पोर्ट्स क्लबना अनुदान दिले पाहिजे, जेणेकरून ते लोकांना सुरक्षित अशा फार्म हाऊसवर सहलीसाठी नेण्यास प्रोत्साहित करतील.
-नारायण पार्सेकर
गोव्यात केवळ चिरेखाणीच नव्हे, तर मँगनीज आणि लोह खनिजाच्या खाणींचे खंदकही अत्यंत धोकादायक अवस्थेत उघडे ठेवण्यात आले आहेत. उद्योग आणि खाण विभागाच्या निष्काळजीपणामुळे तसेच त्यांच्या तपासणीच्या अपयशामुळे हे घडत आहे. अशा ठिकाणी सर्वसामान्यांना प्रवेश बंदी करण्यासाठी कुंपण घालणे आवश्यक आहे. शासकीय यंत्रणांमध्ये प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवताना दूरदृष्टीचा अभाव दिसून येतो, म्हणूनच पावसाळ्यात अशा दुर्घटना घडतात.
-नरेंद्र तळवलकरया प्रकरणात सरकार काहीही करू शकत नाही. जे काही करायचे आहे ते आपल्याला स्वतःलाच करावे लागेल आणि स्वतःहून शिस्त पाळावी लागेल.
-किशोर शेटकर
चिरेखाणी, समुद्र, नद्या आणि धबधब्यांच्या ठिकाणी कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करणे हाच यावर योग्य उपाय आहे.
-ज्योती नाईक
ही केवळ सरकारची जबाबदारी नाही. सरकारने अधिकृत पर्यटन स्थळांवर जीवरक्षक नेमले आहेत. तसेच धोकादायक ठिकाणी धोक्याचे फलक लावून जनजागृतीही केली आहे. आता जर कोणी अती शहाणपणा करून आपला जीव धोक्यात घालत असेल, तर काय करणार? अशा लोकांचा विचार सोडून दिला पाहिजे. अशा घटना घडतात तेव्हा वाईट वाटते, पण लोकांनी स्वतः शहाणे व्हायला हवे.
-पुरुषोत्तम वेर्लेकर

याला अनेक कारणे सांगता येतील. आई-वडिलांकडून मुलांना प्रमाणाबाहेर दिले गेलेले व्यक्तीस्वातंत्र्य हे यामागचे एक मुख्य कारण आहे. आजकालची मुले हौस-मजेपोटी पालकांना जुमानत नाहीत. तसेच तरुणांमधील व्यसनाधीनतेची वाढती प्रवृत्तीही या दुर्घटनांना कारणीभूत ठरत आहे.
-आनंद ताम्हणकर
राज्याची लोकसंख्या सातत्याने वाढत आहे. अशा दुर्घटनांमध्ये मरण पावणाऱ्यांच्या आडनावांवरून ते गोमंतकीय असल्याचे दिसत नाही. तसेच, हल्ली गोव्यात मद्यपानाचे प्रमाण प्रचंड वाढले आहे, हे नाकारता येत नाही. आजकाल तर वाढदिवस पिल्याशिवाय पूर्णच होत नाही, अशा व्यसनाधीनतेमुळे हे प्रकार घडत आहेत.
-श्रीकांत भोबे
मृत्यू हा शेवटी मृत्यूच असतो, तो ज्या पद्धतीने यायचा तसाच येणार, त्याला कोणीही रोखू शकत नाही! आज विविध माध्यमांतून लोकांना वारंवार सूचना आणि इशारे देऊनही लोक ऐकत नाहीत आणि त्यामुळेच अशा दुर्दैवी घटना वारंवार घडत आहेत.
-वासुदेव गावस