१०० दिवसांहून अधिक काळ सुरू असलेल्या संघर्षाला पूर्णविराम मिळण्याची शक्यता

वॉशिंग्टन/तेहरान : गेल्या शंभरहून अधिक दिवसांपासून सुरू असलेल्या अमेरिका-इराण संघर्षाच्या पार्श्वभूमीवर मोठी घडामोड घडली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी अमेरिका आणि इराण यांच्यात शांतता करार अंतिम झाल्याची घोषणा केली आहे. या करारावर येत्या शुक्रवारी अधिकृत स्वाक्षरी होणार असल्याचे सांगितले आहे.
चर्चेनंतर दोन्ही देशांनी सर्व आघाड्यांवरील लष्करी कारवाया कायमस्वरूपी थांबवण्यास तत्त्वतः सहमती दर्शवल्याचे त्यांनी म्हटले आहे.
इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून संघर्ष विरामाची पुष्टी
इराणच्या परराष्ट्र मंत्रालयानेही संघर्षविरामाची पुष्टी केली असून, लवकरच युद्ध समाप्तीची औपचारिक घोषणा करण्यात येणार असल्याचे संकेत दिले आहेत. इराणचे उपपरराष्ट्र मंत्री काझीम घरीबाबादी (Kazem Gharibabadi) यांनी सांगितले की, अमेरिका आपल्या आश्वासनांची अंमलबजावणी करत असल्याची खात्री झाल्यानंतर अंतिम कराराच्या दिशेने पुढील चर्चा सुरू होतील.
करारातील महत्त्वाचे मुद्दे
माध्यमांमध्ये समोर आलेल्या माहितीनुसार करारात खालील मुद्द्यांचा समावेश असू शकतो
: सर्व आघाड्यांवरील लष्करी कारवाया तात्काळ आणि कायमस्वरूपी थांबवणे
होर्मुझ सामुद्रधुनी (Strait of Hormuz) सर्व जहाजांसाठी पुन्हा खुली करणे
अमेरिकेची नौदल नाकेबंदी हटवणे
इराणवरील काही आर्थिक निर्बंध शिथिल करणे
गोठवलेल्या इराणी निधीपैकी सुमारे २४ अब्ज डॉलर्सची टप्प्याटप्प्याने मुक्तता
अणु कार्यक्रमासंदर्भातील अंतिम करारासाठी ६० दिवसांच्या चर्चेला सुरुवात
मात्र, या कराराच्या मसुद्यातील सर्व बाबींची स्वतंत्रपणे अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही.
स्विझरलॅंडमध्ये होणार अंतिम स्वाक्षरी
मिळालेल्या माहितीनुसार, शांतता करारावर १९ जून रोजी स्विझरलॅंड ( Switzerland ) येथे अधिकृत स्वाक्षरी होणार आहे. त्याआधी तांत्रिक आणि राजनैतिक पातळीवरील बैठका सुरू राहणार आहेत.
या करारामुळे मध्यपूर्वेतील तणाव कमी होण्यास मदत होईल आणि जागतिक तेल व्यापारासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या होर्मुझ सामुद्रधुनीतील वाहतूक पुन्हा सुरळीत होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.