३ वर्षांत ३२ हजारांपेक्षा जास्त कॉल्स

पणजी: आरोग्य संचालनालयाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या टेली मानस हेल्पलाइन सेवेला गोव्यातून मोठा प्रतिसाद मिळत आहे. या हेल्पलाइनवर सध्या दिवसाला सरासरी ५० ते ६० कॉल्स येत आहेत. मे २०२३ मध्ये सुरू झालेल्या या सेवेअंतर्गत गेल्या ३ वर्षांत ३२ हजारांपेक्षा जास्त कॉल्स आले असून, त्या माध्यमातून गरजूंना योग्य समुपदेशन करण्यात आले आहे, अशी माहिती टेलीमानस सेवेच्या वरिष्ठ सल्लागार डॉ. स्नेहा पोकळे यांनी दिली.
मानसिक ताणतणाव, कौटुंबिक समस्या, अभ्यासाचा ताण तसेच नैराश्यामुळे अनेकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. या मानसिक त्रासाला कंटाळून काही जण आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलण्याचाही विचार करतात. अशा सर्व व्यक्तींना मानसिक आधार देणे, त्यांचे समुपदेशन करणे आणि त्यांना योग्य वैद्यकीय सल्ला देणे या उद्देशाने सरकारने ही मोफत टेलीमानस सेवा सुरू केली आहे.
मानसिक दडपणाखाली असलेल्या किंवा समुपदेशनाची गरज असलेल्या व्यक्तींनी १८००-८९१-४४१६ किंवा १४४१६ या टोल फ्री क्रमांकांवर कॉल करणे आवश्यक आहे. या क्रमांकावर संपर्क साधल्यानंतर समुपदेशक, अनुभवी डॉक्टर आणि मानसोपचारतज्ज्ञ संबंधितांशी संवाद साधून त्यांना आवश्यक तो सल्ला व मार्गदर्शन करतात.
डॉ. स्नेहा पोकळे यांनी पुढे माहिती देताना सांगितले की, "सुरुवातीच्या काळात प्रामुख्याने शैक्षणिक ताणतणाव, परीक्षांची भीती आणि नैराश्या संदर्भात अधिक कॉल्स येत होते. मात्र, आता जनजागृती झाल्यामुळे आत्महत्येचे विचार मनात येणारे किंवा तीव्र मानसिक त्रासातून जाणारे लोकही थेट फोन करून मदत मागत आहेत." ही सेवा मानसिक आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरत असल्याचे त्यांनी नमूद केले.