बोरी पंचायत क्षेत्रातील नागरिकांना दिलासा

बोरी पंचायत क्षेत्रात जलवाहिनीच्या कामाला झालेली सुरुवात.
फोंडा : बोरी पंचायत क्षेत्रातील डब, करसंगे, उड्डगाळ आणि आफरामेत-शिरशिरे गावांतील नागरिकांनी विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा इशारा दिल्यानंतर सार्वजनिक बांधकाम खात्याने नवीन पाणीवाहिनी टाकण्याच्या कामाला सुरुवात केली आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण असून पुढील एक-दोन दिवसांत सुरळीत पाणीपुरवठा सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
गेल्या वर्षभरापासून या भागातील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत होता. पूर्वापार या गावांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना नियमित पाणीपुरवठा होत नसताना नव्या फ्लॅटधारकांना मात्र सुरळीत पाणी मिळत असल्याच्या आरोपामुळे स्थानिकांमध्ये नाराजी वाढली होती. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी पुढील १५ दिवसांत प्रश्न न सुटल्यास विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा इशारा दिला होता.
नागरिकांच्या इशाऱ्यानंतर सार्वजनिक बांधकाम खात्याने तातडीने हालचाल करत नवीन वाहिनी घालण्याचे काम सुरू केले आहे. गेल्या काही महिन्यांपासून या भागात टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत होता.
नागरिकांनी एकत्र येऊन प्रशासनाला १५ दिवसांची मुदत दिली होती. त्यानंतर खात्याने मागणीची दखल घेत काम सुरू केले. एक-दोन दिवसांत हे काम पूर्ण होऊन बहुतांश भागातील पाणीपुरवठा सुरळीत होण्याची अपेक्षा आहे. मात्र, डब आणि करसंगे गावांतील काही समस्या अद्याप प्रलंबित असून त्या सोडविण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
- प्रदीप गावडे, स्थानिक नेते