पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हल्लेखोरांना बेदम चोपले

न्यूज डेस्क। गोवन वार्ता
जयपूर : जयपूरमध्ये दोन तरुणांनी ‘कॉकरोच जनता पार्टी’चे (सीजेपी) संस्थापक अभिजीत दीपके यांच्या कानशिलात लगावली. त्यानंतर पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हल्लेखोरांना पकडले आणि मारहाण केली. पोलिसांनी हल्लेखोरांना अटक केली आहे.
‘नीट’ परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटणे, शिक्षणव्यवस्था, बेरोजगारी आणि तरुणांशी संबंधित विविध मुद्द्यांवर आयोजित निदर्शनांमध्ये सहभागी होण्यासाठी अभिजीत दीपके सोमवारी जयपूरमध्ये आले होते. आंदोलनात सहभागी झालेल्या तरुणांनी तिरंगा आणि ‘माझ्या देशावर माझे प्रेम आहे; भ्रष्टाचार खपवून घेतला जाणार नाही’ तसेच ‘पेपरफुटी थांबवा’ अशा घोषणा लिहिलेले फलक हातात घेतले होते. काही महिलाही आपल्या लहान मुलांसह या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. निदर्शने सुरू होण्यापूर्वी कार्यकर्त्यांनी शहीद स्मारकाच्या प्रवेशद्वारावर झुरळाचे चित्र काढले आणि त्यावर ‘धर्मेंद्र प्रधान, राजीनामा द्या’ अशी घोषणा लिहिली.
निदर्शनांनंतर, सीजेपीचे संस्थापक अभिजीत दीपके शहीद स्मारकमधून बाहेर पडत असताना समर्थकांनी त्यांना वेढले आणि त्यांच्या वाहनापर्यंत पोहोचवले. यावेळी समर्थकांनी ‘वंदे मातरम’ आणि ‘भारत माता की जय’ अशा घोषणा दिल्या.
हुतात्मा स्मारकावर सीजेपीचे संस्थापक अभिजीत दीपके यांचे आगमन होताच काही तरुणांमध्ये झटापट झाली. दीपके यांना खांद्यावरून आत नेले जात असतानाच गर्दीतील दोन तरुणांनी त्यांना थप्पड मारली. सीजेपीच्या सदस्यांनीही संबंधित तरुणांना मारहाण केली. ज्यांनी थप्पड मारली होती, त्या व्यक्तींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
आंदोलनस्थळी अनेकांच्या मोबाईलची चोरी
अभिजीत यांच्या नेतृत्वाखाली शेकडो निदर्शक ‘शहीद स्मारक’ येथे केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत होते. निदर्शनादरम्यान घोषणाबाजीवरून काही तरुणांमध्ये वाद झाला आणि पोलिसांनी एका तरुणाला ताब्यात घेतले. आंदोलनाच्या ठिकाणी अनेक आंदोलकांचे मोबाईल फोनही चोरीला गेले.