वाहतूक खाते गंभीर : शनिवारी, रविवारी होणार अल्कोमीटरद्वारे मद्यपान चाचणी

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : राज्यात अपघात आणि अपघाती मृत्यूंचे प्रमाण वाढत असताना आता १ जुलैपासून एआय (कृत्रिम बुद्धिमत्ता) कॅमेऱ्यांच्या आधारे वाहतूक नियम मोडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक सप्ताहअखेरीस, म्हणजे शनिवारी आणि रविवारी अल्कोमीटरच्या माध्यमातून वाहनचालकांची मद्यपानासाठी तपासणी केली जाणार आहे. अपघातांची मालिका पुन्हा सुरू झाल्याने वाहतूक खाते आणि पोलिसांनी वाहतूक व्यवस्थापनावर अधिक भर देण्याचा निर्णय घेतला आहे.
रविवारी झालेल्या अपघातानंतर सोमवारीही अपघात होऊन धारगळ येथील दाम्पत्याचा मृत्यू झाला. जून महिन्यातील अवघ्या १५ दिवसांत विविध अपघातांत १४ जणांचा मृत्यू झाला आहे. अपघातांवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रमुख रस्ते आणि चौकांवर एआय कॅमेरे बसविण्याची योजना राबविण्यात येत आहे. सध्या मेरशी, मडगाव, नुवे, पेडे, वेर्णा यांसह २६ ठिकाणी एआय कॅमेरे बसविण्यात आले आहेत. सुरुवातीचे १५ दिवस जनजागृतीसाठी ठेवण्यात आले असून १ जुलैपासून या कॅमेऱ्यांच्या आधारे वाहतूक नियमभंग करणाऱ्यांवर दंड आकारला जाईल. सप्टेंबरपर्यंत आणखी काही ठिकाणी एआय कॅमेरे बसविले जाणार आहेत. टप्प्याटप्प्याने या यंत्रणेचा विस्तार करण्यात येईल, अशी माहिती वाहतूक संचालक अरविंद खुटकर यांनी दिली.
हेल्मेट आणि सीट बेल्टचा वापर, तसेच इतर वाहतूक नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन आणि चालकांचा बेफिकीरपणा ही अपघातांची प्रमुख कारणे असल्याचे त्यांनी सांगितले. साहाय्यक वाहतूक संचालक (एडीटी) आणि मोटार वाहन निरीक्षक (एमव्हीआय) यांना अचानक तपासण्या करून वाहतुकीवर लक्ष ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नियमभंग करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करून नियमांची काटेकोर अंमलबजावणी केली जाईल, असे खुटकर यांनी स्पष्ट केले.
रविवारी झालेल्या चार अपघातांपैकी दोन अपघात हे स्वयंअपघात होते. वाहतूक पोलिसांकडूनही आता वाहतुकीवर लक्ष ठेवण्यासाठी विशेष मोहीम सुरू करण्यात येणार आहे. प्रत्येक सप्ताहअखेरीस वाहनचालकांची अल्कोमीटरद्वारे मद्यपानासाठी तपासणी केली जाईल. मद्यपान चाचणीसाठी पोलिसांकडे २०० अल्कोमीटर उपलब्ध असून ही तपासणी नियमितपणे सुरू राहणार आहे. वाहतूक नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे, अशी माहिती वाहतूक पोलीस अधीक्षक प्रबोध शिरवईकर यांनी दिली.
काही दिवसांपूर्वी ठरावीक ठिकाणी वाहनांची तपासणी केली जात होती. मात्र, पोलीस वाहनचालकांना त्रास देत असल्याच्या तक्रारी आल्याने तपासणीचे प्रमाण कमी करण्यात आले होते, असेही शिरवईकर यांनी सांगितले. हेल्मेट आणि सीट बेल्टबाबतच्या नियमांसह इतर वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवरही कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
१ जुलैपासून २६ ठिकाणांवरील एआय कॅमेऱ्यांच्या माध्यमातून वाहतुकीवर लक्ष ठेवून नियमभंग करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाईल. वाहतूक निरीक्षक आणि अधिकाऱ्यांना विशेष निर्देश देण्यात आले आहेत.
— अरविंद खुटकर, वाहतूक संचालक
प्रत्येक सप्ताहअखेरीस म्हणजे शनिवारी आणि रविवारी अल्कोमीटरद्वारे वाहनचालकांची मद्यपान चाचणी केली जाणार आहे. वाहतूक नियमांच्या काटेकोर अंमलबजावणीसाठी विशेष मोहीम सुरू करण्यात येणार आहे.
— प्रबोध शिरवईकर, वाहतूक पोलीस अधीक्षक