गोवा फॉरवर्डशी आघाडीबाबत काँग्रेसची चाचपणी

युती वा विलिनीकरणाचा पर्याय खुला; सरदेसाईंशी लवकरच चर्चा


2 hours ago
गोवा फॉरवर्डशी आघाडीबाबत काँग्रेसची चाचपणी

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोवा फॉरवर्ड पक्षासोबत युती अथवा पक्षविलिनीकरणाच्या प्रस्तावावर काँग्रेस पक्ष गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांच्याशी चर्चा करणार आहे. यासाठी प्रदेश काँग्रेसमधील काही पदाधिकाऱ्यांना जबाबदारी देण्यात आली आहे, अशी माहिती काँग्रेसचे प्रभारी माणिकराव ठाकरे यांनी दिली.
सोमवारी प्रदेश काँग्रेसची बैठक पार पडली. या बैठकीनंतर माणिकराव ठाकरे यांनी सांगितले की, विजय सरदेसाई हे महत्त्वाचे नेते आहेत. काँग्रेस आणि गोवा फॉरवर्ड यांच्यात सध्या आघाडी आहे. आगामी निवडणुकीत कोणत्या पक्षांसोबत युती करायची, याबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. योग्य वेळी चर्चा करून निर्णय घेतला जाईल. गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांच्याशी चर्चा करण्यात येणार असून, युतीबाबत त्यांची भूमिका जाणून घेतली जाईल. गोवा फॉरवर्ड पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करण्याचा प्रस्ताव असल्यास त्यावरही विचार केला जाईल. त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर पक्ष योग्य निर्णय घेईल.

२०२७ मध्ये काँग्रेसचे सरकार हेच लक्ष्य : युरी आलेमाव
यापूर्वी २०१७ मध्ये भाजपने कोणासोबत युती केली आणि २०२२ च्या निवडणुकीनंतर काय घडले, याकडे माझे लक्ष नाही. भाजपचा पराभव करण्यासाठी विरोधी पक्षांनी एकत्र येण्याची गरज आहे. २०२७ मध्ये काँग्रेसचे सरकार स्थापन करण्यावर आमचे लक्ष केंद्रित आहे, असे काँग्रेसचे नेते युरी आलेमाव यांनी सांगितले.

शमिला सिद्दिकीमनीषा उसगावकर निलंबित

पक्षविरोधी कारवायांमुळे मनीषा उसगावकर आणि सोशल मीडिया समन्वयक शमिला सिद्दिकी यांना पक्षातून निलंबित करण्यात आले आहे. पक्षाच्या बैठकीत चर्चा करून हा निर्णय घेण्यात आला आहे. बैठकीत पक्षशिस्त आणि पक्षविरोधी वर्तन करणाऱ्यांवर कारवाई करण्याबाबत चर्चा झाली. दोघांची चौकशी सुरू असून त्यांना त्यांची बाजू मांडण्याची संधी देण्यात आली आहे, अशी माहिती काँग्रेसचे नेते अमरनाथ पणजीकर यांनी दिली.

बैठकीला अमित पाटकर अनुपस्थित
काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर हे बैठकीला अनुपस्थित होते. बैठकीबाबत आपल्याला कोणतीही माहिती नव्हती, असे त्यांनी सांगितले. याबाबत माणिकराव ठाकरे म्हणाले की, अमित पाटकर हे काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत आणि ते गोवा तसेच पक्षासाठी सातत्याने कार्य करत राहतील.