वाहतूक नियमांचे उल्लंघन : ७,६५३ वाहन परवाने निलंबित करण्याची शिफारस

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : राज्यात १ जानेवारी २०२६ ते ३१ मार्च २०२६ या तीन महिन्यांच्या कालावधीत विविध वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यामुळे गोवा पोलिसांच्या वाहतूक विभागाने ४५,१६७ वाहन चालकांवर कारवाई केली आहे. यात सर्वाधिक २९,९०२ जणांना हेल्मेट परिधान केले नव्हते, तर ९०५ जणांना मद्यप्राशन करून वाहन चालवले होते. वरील कालावधीत ७,६५३ वाहन परवाने निलंबित करण्यासाठी वाहतूक पोलिसांनी वाहतूक खात्याकडे शिफारस केली आहे. त्यात ५,८३९ विनाहेल्मेट दुचाकी चालकांचा आणि ७६३ मद्यपी चालकांचा समावेश आहे.
देशात वाढते रस्ता अपघात आणि त्यात होणाऱ्या मृत्यूंची संख्या वाढत असल्याची दखल घेऊन सर्वोच्च न्यायालयाने ‘रस्ता सुरक्षा समिती’ स्थापन केली होती. न्यायमूर्ती अभय मनोहर सर्पे यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या समितीत संजय बंडोपाध्याय आणि डाॅ. निशी मित्तल सदस्य आहेत. या समितीने वाहतूक नियम न पाळणाऱ्यांचे परवाने तीन महिन्यांसाठी निलंबित करण्याची शिफारस केली आहे. मोटार वाहन कायदा १९८८ च्या कलम १९ आणि केंद्रीय मोटार वाहन नियम १९८९ च्या कलम २१ नुसार वाहन परवाना निलंबित करण्याची तरतूद आहे. या कारवाईची अंमलबजावणी करण्याचे निर्देश समितीने सर्व राज्यांना आणि संघ प्रदेशांना दिले होते.
त्यानुसार, वाहतूक विभागाने वरील कालावधीत ४५,१६७ चालकांवर कारवाई केली. त्यात सर्वाधिक हेल्मेट परिधान न केल्यामुळे २९,९०२ जणांवर कारवाई केली. त्यानंतर ११,९०१ जणांवर अतिवेगाने वाहन चालविल्यामुळे, तर वाहन चालवताना मोबाईलचा वापर केल्यामुळे १,११९, दारू पिऊन वाहन चालविल्यामुळे ९०५, वाहतूक सिग्नलचे पालन न केल्यामुळे ४५, मालवाहू वाहनातून प्रवाशांची वाहतूक केल्यामुळे १३७, दुचाकीवर चालकाच्या मागे दोन किंवा त्याहून जास्त जणांची वाहतूक केल्यामुळे १,१५८ दुचाकी चालकांवर कारवाई केली आहे.
परवाने रद्द होणाऱ्यांमध्ये हेल्मेट न घालणारे अधिक
वरील कालावधीत वाहतूक विभागाने ७,६५३ चालकांचे परवाने तीन महिन्यांसाठी निलंबित करण्यासाठी वाहतूक खात्याला पाठविले आहेत. त्यात ५,८३९ दुचाकी चालकाचे परवाने विनाहेल्मेट दुचाकी चालविल्यामुळे, ७६३ मद्यपी वाहन चालकांचे, वाहन चालवताना मोबाईलचा वापर केल्यामुळे ५६३, मालवाहू वाहनातून प्रवाशांची वाहतूक केल्यामुळे ९१, दुचाकीवर चालकाच्यामागे दोनपेक्षा जास्त जणांची वाहतूक केल्यामुळे ३८२, अतिवेगाने वाहन चालविल्यामुळे १०, वाहतूक सिग्नलचे पालन न केल्यामुळे ५ यांचा समावेश आहे.
मद्यपींचे परवाने निलंबित करण्याचा अधिकार प्रथमवर्ग न्यायालयाला
सर्वोच्च न्यायालयाच्या रस्ता सुरक्षा समितीच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार दारू पिऊन गाडी चालविल्या प्रकरणी चालकाचा परवाना निलंबित करण्याचा अधिकार प्रथमवर्ग न्यायालयाला दिला आहे. वरील इतर नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल संबंधित वाहतूक खात्याला अधिकार दिले आहेत. अहवाल मिळाल्यानंतर संबंधित वाहन चालकाला न्यायालयात किंवा वाहतूक खात्यात हजर राहण्यास समन्स काढले जातात. रीतसर सुनावणी घेऊन नंतर दोषी आढळल्यास त्याचे परवाने तीन महिन्यांसाठी निलंबित केले जाते.