तरुणाईची बेजबाबदार वृत्ती, मद्यप्राशन, सुरक्षेचा अभाव कारणीभूत

‘चर्चेची वार्ता’मध्ये नागरिकांचे मत : पोहण्याचे प्रशिक्षण अनिवार्य करा!

Story: न्यूज डेस्क । गोवन वार्ता |
2 hours ago
तरुणाईची बेजबाबदार वृत्ती, मद्यप्राशन, सुरक्षेचा अभाव कारणीभूत

पणजी : राज्यात सध्या समुद्रकिनारे, धबधबे, नद्या आणि चिरेखाणींच्या उघड्या खंदकांमध्ये बुडून मृत्यू पावणाऱ्यांच्या संख्येत चिंताजनक वाढ झाली आहे. सुरक्षेचे नियम धाब्यावर बसवणे, धोक्याचा अंदाज न येणे आणि अतिउत्साह यांमुळे अनेक निष्पाप पर्यटकांना आणि स्थानिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. या वाढत्या दुर्घटनांना आळा घालण्यासाठी आणि मौल्यवान मानवी जीव वाचवण्यासाठी सरकारने तसेच प्रशासनाने काय उपाययोजना केल्या पाहिजेत? असा प्रश्न ‘गोवन वार्ता’ने आपल्या 'चर्चेची वार्ता' या सदराअंतर्गत वाचकांना विचारला होता. यावर नागरिकांनी स्वयंशिस्तीचा सल्ला देत आणि महत्त्वाच्या उपाययोजना सुचवत आपल्या प्रतिक्रिया मांडल्या आहेत:


आपल्याकडील जुनी-जाणती आणि अनुभवी माणसे नेहमीच एक मोलाचा सल्ला देत आलेली आहेत की, पाण्याकडे आणि आगीकडे कधीही मस्करी करू नये. पाण्याचा अंदाज कधीच कोणाला येत नाही, त्यामुळे कोणत्याही जलस्रोताजवळ जाताना प्रत्येकाने पूर्ण खबरदारी घेतली पाहिजे आणि पाण्याचा आदर केला पाहिजे.
समीर प्रभू


ज्याला स्वतःच्या जीवाची पर्वा नाही आणि ज्याला मृत्यूच्या दाढेत जायचेच आहे, त्याला कोणीही रोखू शकत नाही.
संतोष जाधव


आजकालच्या तरुणाईने आपला अतिउत्साह आणि पाण्याचा मोह आवरला पाहिजे. ज्या ठिकाणी प्रशासनाने धोक्याचे फलक लावले आहेत किंवा जिथे खोल पाणी आहे, अशा धोकादायक ठिकाणी मुळात जाणेच टाळले पाहिजे. पाशवी आनंद मिळवण्यासाठी किंवा सोशल मीडियावर दाखवण्यासाठी पाड्यात कोणताही जीवघेणा थरार करू नये.
प्रताप उगवेकर



केवळ गोव्यातच नव्हे तर संपूर्ण देशात या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची गरज आहे. परदेशातील शिक्षण पद्धतीप्रमाणे आपल्याकडेही शालेय स्तरापासूनच मुलांना पोहण्याचे रीतसर शिक्षण देणे आणि ते अभ्यासक्रमात अनिवार्य करणे अत्यंत गरजेचे आहे. यामुळे अशा दुर्घटना बऱ्याच अंशी कमी होतील.
सुनील मातोंडकर


मानवाकडून निसर्गाची जी हानी सुरू आहे, त्याचाच हा परिणाम असून बहुदा निसर्गाकडून हा एक प्रकारे बदला घेतला जात आहे.
प्रतिभा उसपकर


समुद्रकिनाऱ्यांवर होणाऱ्या बहुतांश दुर्घटना या मद्यधुंद अवस्थेमुळे होत असतात. त्यामुळे सरकारने सर्व समुद्रकिनाऱ्यांवर कडक दारूबंदी लागू केली पाहिजे, तरच अशा मृत्यूंना आळा बसेल.
जयप्रकाश सव्यानवर


ज्याचा मृत्यू ज्या ठिकाणी आणि ज्या वेळी लिहिलेला आहे, तो तसाच होणार आहे. या गोष्टी टाळणे मानवाच्या हातात नाही.
शंतन पावसे 

हेही वाचा