चर्चेची वार्तामधून नागरिकांचा सूर : वाहतूक पोलीस, आरटीओ यंत्रणेतील भ्रष्टाचारावर ओढले ताशेरे

पणजी : गोव्यात गेल्या साडेपाच महिन्यांत रस्ते अपघातांमध्ये तब्बल १२८ निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. हा आकडा अत्यंत चिंताजनक असूनही प्रशासनाकडून अपघात रोखण्यासाठी ठोस आणि प्रभावी उपाययोजना होताना दिसत नाहीत. या वाढत्या अपघातांना आळा घालण्यासाठी सरकारला काय सूचना कराल? असा प्रश्न ‘दै. गोवन वार्ता’ने आपल्या ‘चर्चेची वार्ता’ या सदराअंतर्गत गोमंतकीयांना विचारला होता. यावर गोव्यातील सजग नागरिकांनी प्रशासनातील त्रुटींवर बोट ठेवत आणि वाढत्या बेशिस्तीवर चिंता व्यक्त करत आपल्या रोखठोक प्रतिक्रिया व सूचना मांडल्या आहेत, त्या खालीलप्रमाणे:
आम्ही कितीही उपाय सुचवले तरी ते ऐकायला सरकारकडे वेळ कुठे आहे? वाहतूक खाते आणि पोलीस यंत्रणा सध्या रस्ते सुरक्षित करण्यात नाही, तर चेक पोस्ट नाक्यांवर हप्ते गोळा करण्यात आणि भ्रष्टाचारात व्यस्त आहे! आरटीओ नाक्यांवर जर ट्रक्सचे ओव्हरलोडिंग, त्यांचे निकृष्ट टायर आणि लायसन्स पैशांच्या जोरावर पास होणार असतील, तर अपघात कसे थांबणार? साडेपाच महिन्यांत १२८ बळी गेले तरी यंत्रणेचे डोळे उघडत नाहीत, कारण त्यांना सामान्यांच्या जीवापेक्षा ‘कमिशन’ महत्त्वाचे वाटते. जोपर्यंत नाक्यांवरचा हा हप्तेखोर कारभार थांबत नाही आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांवर थेट कारवाई होत नाही, तोपर्यंत गोव्यातील रस्ते असेच ‘डेथ ट्रॅप’ राहतील. सरकारने आधी स्वतःची यंत्रणा सुधारावी!
नीलेश नाईक
महामार्गांवर अपघात रोखण्यासाठी एक सोपा आणि प्रभावी उपाय करावा. हायवेवर एकेरी वाहतुकीच्या मार्गावर दुचाकी वाहनांसाठी डिव्हायडर लावून एक स्वतंत्र लेन तयार करण्यात यावी. यामुळे दुचाकी वाहनांचे अपघात मोठ्या प्रमाणात कमी होतील.
नीलेश मेढेकर
अपघात होऊन माणूस मरण पावल्यानंतर सरकार काहीच करू शकत नाही. त्यामुळे प्रत्येकाने स्वतः काळजी घेतली पाहिजे आणि आपला जीव स्वतःच सांभाळला पाहिजे.
गणेश गावडे
जर अपघात रोखण्यासाठीच्या उपाययोजना आणि सल्ले सर्वसामान्य नागरिकांनीच द्यायचे असतील, तर मग सरकारी अधिकारी आणि कर्मचारी कोणत्या गोष्टीसाठी पगार घेत आहेत?
जयवंत जोसलकर
गोवा स्वतंत्र होण्यापूर्वी इथे पोर्तुगीज राजवट होती, तेव्हा आमचा गोवा अत्यंत शांत आणि ‘सुशेगाद’ होता. कोणत्याही प्रकारचे गुन्हे घडत नव्हते. परकीय आणि परप्रांतीय लोकांना सहसा गोव्यात प्रवेश मिळत नसे आणि चेक पोस्टवर कडक बंदोबस्त असे. मूळ रहिवासी असलेल्या गोवेकरांना ओळखपत्रे दिलेली होती. माझे वडील पोलीस खात्यात उच्च पदावर कार्यरत असल्याने मी १९५८ ते १९६६ सालापर्यंत वाळपई येथे राहत होतो. गोवा स्वतंत्र झाल्यानंतर बाहेरील लोक मोठ्या प्रमाणात आल्याने गोव्याचा ‘सुशेगादपणा’ नष्ट झाला. १९९० पर्यंत गोवा आर्थिक व सामाजिकदृष्ट्या खूप चांगला होता. मात्र, बाहेरील लोकांनी संस्कृती बदलून टाकली, ज्यामुळे अपघात आणि गुन्हेगारी वाढली. सिमेंटची जंगले उभी राहून पर्यावरण धोक्यात आले आणि भाषिक असमतोल निर्माण झाला. आता कोणीही गोव्यात येऊन व्यवसाय करतो, तिथेच स्थायिक होतो, स्थानिक ओळखपत्रे (जसे की निवडणूक कार्ड, रहिवासी पुरावे) तयार करतो आणि गोव्याचा नागरिक म्हणून बिनधास्त राहतो. यावर गोवा शासनाचा कडक वचक आणि नियंत्रण असणे अत्यंत आवश्यक आहे.
अल्बर्ट डिसोझा
वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांची रस्त्यावर अत्यंत कडक तपासणी करणे गरजेचे आहे.
मोहन पालेकर
गोव्यातील अतिप्रमाणात वाढलेले पर्यटन, चालकांचे वेगावर नियंत्रण नसणे आणि अत्यंत बेजबाबदार व बेदरकारपणे गाड्या चालवणे हीच अपघातांची मुख्य कारणे आहेत.
सतीश लोटलीकर
सरकारप्रमाणेच प्रत्येक नागरिकानेही वाहतुकीचे नियम पाळले पाहिजेत. अतिघाई महागात पडते, हे लक्षात ठेवावे. गाडी चालवताना मोबाईलचा वापर टाळावा आणि वेगावर नियंत्रण असावे. पालकांनी आपल्या अल्पवयीन मुलांना गाड्या चालवायला देऊ नयेत. अपघातग्रस्त आणि संवेदनशील जागांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत आणि आवश्यक तिथे स्पीड ब्रेकर घालावेत. पोलिसांनी विशेषतः रात्रीच्या वेळी गस्त वाढवली पाहिजे आणि अवजड वाहन चालकांची अल्कोहोल टेस्ट (मद्यप्राशन तपासणी) करावी. अपघात होण्यापूर्वीच स्वतः काळजी घेतली तर अपघात नक्कीच कमी होतील.
डॉ. अशोक कृ. प्रियोळकर
आम्ही सामान्य नागरिकांनी कितीही चांगल्या सूचना केल्या, तरी आमचे ऐकणार कोण? जसे काही आम्ही सूचना केल्यावर सरकार लगेच अंमलबजावणी करणार आहे!
विनोद परब
या वाढत्या अपघातांना सरकार जेवढे जबाबदार आहे, तेवढाच सामान्य नागरिकही जबाबदार आहे. आपण फक्त सरकारकडे बोट दाखवू शकत नाही. कोणत्याही ट्रॅफिक सिग्नलकडे बघा, कोण कुठल्या बाजूने येतंय हे समजतच नाही, एवढी बेशिस्त वाढली आहे. प्रत्येकाला आपल्या घराजवळ महामार्गाचा विभाजक (डिव्हायडर) नको असतो आणि तो असेल तर लोक तो स्वतः फोडून रस्ता करतात. काही वर्षांपूर्वी गोव्यामध्ये वाहतूक नियम पाळणारे सुजाण लोक मोठ्या प्रमाणात होते, मात्र आता परप्रांतीयांच्या वाढत्या संख्येमुळे नियम पाळणाऱ्यांची संख्या कमी झालेली दिसते.
शिवा किनाळेकर