रस्ते बनले मृत्यूचा सापळा!

बंद पथदीप, धोकादायक वळणे, अति वेग, मोकाट गुरे कारणीभूत

Story: न्यूज डेस्क । गोवन वार्ता |
15th June, 11:32 pm
रस्ते बनले मृत्यूचा सापळा!

पणजी : गेल्या साडेपाच महिन्यांत रस्ते अपघातात १२८ जणांचा बळी गेला आहे. गोव्यातील अंतर्गत आणि मुख्य राष्ट्रीय महामार्गांवर सध्या अपघातांची भीषण मालिका सुरू असून, अनेक रस्ते वाहनधारकांसाठी मृत्यूचे सापळे बनले आहेत. रस्त्यांवरील अपुरी प्रकाशव्यवस्था (बंद पथदीप), तीव्र धोकादायक वळणे, अरुंद रस्ते आणि महामार्गावर ठाण मांडून बसणारी मोकाट गुरे ही या वाढत्या अपघातांची मुख्य कारणे ठरत आहेत. याशिवाय, वाहनचालकांचे वेगावरील सुटलेले नियंत्रण, मद्यधुंद अवस्थेत गाड्या चालवणे आणि पर्यटकांकडून होणारे वाहतूक नियमांचे उल्लंघन यामुळे राज्यातील रस्ते सुरक्षेचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला आहे.

पणजीतील स्थिती

पणजी : जुन्या मांडवी पुलावर अधून मधून अपघात होत असतात. विशेषत: पर्वरीकडील बाजूच्या दिशेने येणाऱ्या वाहनचालकांना जास्त धोका असतो. पणजीहून जाणारे वाहनचालक लेन सोडून विरुद्ध दिशेने वाहने घुसवत असल्याने वाहने धडकून अनेक जण जायबंदी​ झाले आहेत. पर्यटकांना या पुलावरील वाहतुकीचा अंदाज येत नसल्याने बहुतांश पर्यटक विरुद्ध दिशेने वाहने चालवितात. या ठिकाणी वाहतूक पोलीस असून नसल्यासारखी स्थिती असल्याचे दिसून येते.  

म्हापसा येथील स्थिती

म्हापसा : बार्देश तालुक्यातील पेडे-म्हापसा जंक्शन अपघातप्रवण क्षेत्र बनले आहे. या ठिकाणी अनेक अपघात होत असतात. वाहतूक सिग्नल कार्यान्वित करूनसुद्धा वाहनांच्या गर्दीमुळे अपघात घडत आहेत. या जंक्शनवर सध्या उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. हे उड्डाणपूल पूर्ण होताच अपघातांना लगाम बसेल, अशी अपेक्षा आहे.

तालुक्यातील कोलवाळ ते करासवाडा राष्ट्रीय महामार्ग, गिरी, बागा, हडफडे, आसगाव, शिवोली, थिवी ते अस्नोडा, चोगम रस्ता हे मार्ग अपघाताची केंद्रे ठरत आहेत. किनारी भागात पर्यटकांची ये-जा याच रस्त्यांवरून होत असल्यामुळे वाहनांची प्रचंड संख्या दिसून येते. मद्यपी, बेशिस्त वाहनचालकांमुळे अपघात घडतात. चोगम रस्त्यालगत होणाऱ्या दुतर्फा पार्किंगमुळे वाहनांच्या रांगा लागतात. वाहने पुढे काढण्याच्या गडबडीत अनेक वेळा अपघात होतात. लेन सोडून वाहने घुसविण्याच्या प्रकारामुळे वाहतूक मंदावते. या भागात वाहतूक पोलीस तैनात करून बेशिस्त वाहनचालकांना दंड ठोठविण्याची गरज आहे.

काणकोण तालुक्यातील स्थिती

पैंगीण : काणकोण तालुक्यातील ‘दुमाणे-आगोंद’ आणि ‘चार रस्ता ते माशे’ (मनोहर पर्रीकर बायपास) हे दोन रस्ते सध्या वाहनचालकांसाठी मृत्यूचा सापळा बनले आहेत. या मार्गांवर नियमितपणे होणारे अपघात, नागरिकांचे जाणारे बळी आणि जखमी होणाऱ्या मुक्या प्राण्यांमुळे परिसरात तीव्र चिंता व्यक्त होत आहे. संबंधित अधिकारी या अपघातांची कारणे शोधून रस्त्यांची दुरुस्ती करण्यात पूर्णपणे अपयशी ठरल्याचा आरोप श्रीस्थळ ग्रामपंचायतीचे सरपंच शिवराज देशमुख व स्थानिकांनी केला आहे.

...आणि रस्ता रक्ताने माखला!

मार्च २०२६: राजबागजवळ झालेल्या भीषण अपघातात दुचाकी दुभाजकाला धडकून कर्नाटकातील एका २३ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा गंभीर जखमी झाला.

एप्रिल २०२६: एका स्वयंअपघातात ४ वर्षांच्या बालकासह आणि एका ज्येष्ठ नागरिकासह एकूण तीन जण गंभीर जखमी झाले.

जून २०२५: रात्रीच्या वेळी महामार्गावर एका अवजड वाहनाने जनावरांच्या कळपाला चिरडले, ज्यामध्ये पाच जनावरांचा जागीच मृत्यू झाला होता. 

सासष्टी तालुक्यातील स्थिती

मडगाव : सासष्टी तालुक्यातील वेर्णा ते लोटली मार्ग, सिर्ली-धर्मापूर तसेच कुंकळ्ळी परिसरातील रस्ते सध्या वाहनचालकांसाठी अत्यंत जीवघेणे ठरत आहेत. गेल्या काही महिन्यांत तालुक्यात रस्ते अपघातांच्या प्रमाणात कमालीची वाढ झाली आहे. मात्र, दिलासादायक बाब म्हणजे अपघाती मृत्यूदरात काहीशी घट नोंदवण्यात आली आहे. खराब रस्ते, रस्त्यांवरील अपुरी प्रकाशव्यवस्था आणि चालकांचे वेगावरील सुटलेले नियंत्रण यामुळे तालुक्यातील अनेक ठिकाणे आता ‘अपघातप्रवण क्षेत्र’ (ब्लॅक स्पॉट) म्हणून ओळखली जात आहेत.

तालुक्यातील प्रमुख अपघातप्रवण क्षेत्रे

वेर्णा आणि कुंकळ्ळी: हे दोन्ही भाग सर्वाधिक अपघात होणाऱ्या पहिल्या पाच प्रमुख ठिकाणांमध्ये समाविष्ट आहेत. महामार्गावरील वेर्णा परिसर आणि वेर्णाकडून लोटलीकडे येणाऱ्या रस्त्यावर सातत्याने अपघात घडत आहेत.

सिर्ली-धर्मापूर: येथे नुकताच एक धक्कादायक अपघात घडला. एका ‘रेंट अ कार’ चालकाने भरधाव वेगाने येत एका दुचाकीस्वार महिलेला जोरदार धडक दिली. या अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

राय, कामुर्ली आणि सेर्नाभाटी: राय परिसरात वाहनांच्या अतिवेगामुळे वारंवार अपघात होत आहेत. कामुर्ली आणि कोलवाच्या सेर्नाभाटी परिसरातील अरुंद रस्त्यांवर झालेल्या वेगवेगळ्या अपघातांत एका सायकलस्वाराला आणि दुचाकीचालकाला आपला जीव गमवावा लागला आहे. सारझोरा येथील अंतर्गत रस्तेही अपघातांना कारणीभूत ठरत आहेत.

मडगाव आणि फातोर्डा: या शहरी भागांमध्ये वाढती गर्दी आणि रस्त्यांच्या कडेला होणाऱ्या बेशिस्त पार्किंगमुळे छोटे-मोठे अपघात रोजचेच झाले आहेत.

बाळ्ळी महामार्ग: बाळ्ळी येथील महामार्गावरील अरुंद रस्ते आणि वाहनचालकांकडून वेगाची मर्यादा न पाळली गेल्याने हा भागही अत्यंत धोकादायक बनला आहे. 

डिचोली तालुक्यातील स्थिती

डिचोली : पेठवाडा-नानोडा येथील हाऊस ऑफ सेलिब्रेशन रेस्टॉरंट जवळील धोकादायक वळण सध्या वाहनधारकांसाठी अत्यंत जीवघेणे ठरत आहे. या धोकादायक वळणावर आतापर्यंत तीन जणांना आपला जीव गमवावा लागला आहे, तर अनेक जण अपघात होऊन गंभीर जखमी झाले आहेत. सरकारने या अपघातप्रवण क्षेत्राकडे गांभीर्याने लक्ष देऊन, संबंधित खात्यांमार्फत संयुक्त तपासणी करावी आणि तत्काळ ठोस उपाययोजना काढावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांमधून जोर धरू लागली आहे.

फोंडा, धारबांदोडा तालुक्यातील स्थिती 

फोंडा : फोंडा व धारबांदोडा तालुक्यात सध्या रस्ते अपघातांचे सत्र सुरू असून गेल्या काही दिवसांत झालेल्या वेगवेगळ्या भीषण अपघातांमध्ये तिघांना आपला जीव गमवावा लागला आहे, तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. रात्रीच्या वेळी रस्त्यावर ठिय्या मांडणारी मोकाट गुरे, बंद असलेले पथदीप, वाहनांचा अतिवेग, धोकादायक वळणे आणि अरुंद रस्ते ही या दोन्ही तालुक्यांमधील वाढत्या अपघातांची मुख्य कारणे ठरत असून, निष्पाप नागरिकांचे नाहक बळी जात आहेत. 

गेल्या ४-५ दिवसांतील अपघात

अनमोड घाट: अनमोड घाटात एक अवजड ट्रक थेट खोल दरीत कोसळल्याने चालकाचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.

धारबांदोडा: धारबांदोडा येथे दोन दुचाकींमध्ये झालेल्या समोरासमोरच्या भीषण धडकेत एका दुचाकी चालकाला आपला जीव गमवावा लागला.

केरये - खांडेपार: खांडेपार येथील केरये भागात रस्ता ओलांडणाऱ्या एका पादचाऱ्याला कारने जोरदार धडक दिली. या अपघातात पादचाऱ्याचा मृत्यू झाला. 


हेही वाचा