गोव्यात पाणी टंचाईचे संकेत

पाऊस गायब झाल्याने परिस्थिती गंभीर

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
33 mins ago
गोव्यात पाणी टंचाईचे संकेत

पणजी : गोव्यात (Goa) (१ ते १६ जून दरम्यान सरासरी ६.५२ इंच पावसाची नोंद झाली आहे. यंदा मान्सूनच्या पावसाचे प्रमाण ५९.१ टक्क्यांनी कमी आहे. पाऊस नसल्याने धरणातील पाणीसाठा झपाट्याने कमी होत आहे. हवामान खात्याने याआधीच ‘अल निनो’ वातावरणीय प्रणाली सक्रीय झाल्याचे स्पष्ट केले आहे. ‘अल निनो’मुळे मान्सूनचे प्रमाण कमी होते. त्यामुळे गोव्यात पाणी टंचाईचे संकेत मिळत आहेत. 

‘अल निनो’मुळे (El Nino) मान्सूनचे प्रमाण कमी होत असल्याने;  पुढील काही दिवसांत पाऊस सक्रीय झाला नाही तर राज्यात पिण्याच्या पाण्याचे संकट निर्माण होण्याची शक्यता आहे. पाणी टंचाई होऊ नये यासाठी सरकारने आतापासूनच उपाययोजना सुरू केल्या आहेत. 

यंदा राज्यात ५ जून रोजी मान्सून दाखल झाला. मात्र अनुकूल वातावरण नसल्याने मागील पाच दिवस पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार राज्यातील सहा पैकी पाच धरणात गतवर्षीपेक्षा कमी पाणीसाठा शिल्लक आहे. जलस्त्रोत खात्यातर्फे खाणींच्या खंदकांतून पाणी उपसा करून ते जलशुद्धीकरण प्रकल्पांत नेण्याची योजना आखण्यात आली आहे. तसेच पेयजल खात्यातर्फे प्रक्रिया केलेले शुद्ध पाणी पिण्यासाठी वगळता शेती व अन्य कारणासाठी वापरले जाऊ नये यासाठी आदेश काढण्यात येणार आहेत. 

साळावली, पंचवाडी धरणातील पाणी साठा 

सध्या साळावली, पंचवाडी धरणात पुढील एक ते दीड महिना पुरेल एवढा पाणीसाठा शिल्लक आहे. अंजुणे धरणातील पाणीसाठा मात्र झपाट्याने कमी होत आहे. यामुळे या धरणातून शेतीसाठी होणारा पाणी पुरवठा बंद करण्यात आला आहे. येथील पाणी केवळ पिण्यासाठी वापरले जात आहे. यामुळे येथील पाणीसाठा पुढील वीस दिवस पुरेसा ठरणार आहे.

तसेच या धरणातील पाणी कमी पडल्यास पिसुर्ले खाण खंदकातील पाणी उपसा करून पडोशे येथील जल प्रकल्पात आणले जाणार आहे. याचे काम येत्या गुरुवार पासून सुरू होणार आहे. 

पुढील १५ दिवस पाऊस पडला नाही तर तिलारी कालव्यातील पाणी पडोशे येथे आणण्याचा विचार खात्यातर्फे सुरू आहे. याशिवाय गरज असेल तिथे प्रक्रिया न केलेले पिण्याचे पाणी पुरवणे, काही ठिकाणी पाणी उपसा करणे, धरणातून होणारा विसर्ग कमी करणे अशा विविध उपायोजना करण्यात येणार आहेत. 

चार वर्षांतील सर्वात कमी पाणीसाठा

१५ जून २०२६ अखेरीस साळावलीमध्ये २७.६ टक्के पाणी साठा शिल्लक आहे. हा २०२२ पासूनचा सर्वात कमी पाणीसाठा आहे. सध्या चापोलीमध्ये मागील चार वर्षांतील सर्वात कमी म्हणजेच ४०.५ टक्के पाणी शिल्लक आहे. 

दोन वर्षांतील १५ जून अखेरचा पाणी साठा

( टक्क्यात) 

धरण /२०२५/२०२६

अंजुणे / ११.२९/ ९.९

पंचवाडी /५६.६५/१९.३८

साळावली / ६५.०३/ २७.६४

तिळारी / २६.९३/३०.१२

चापोली/ ६०.८४/ ४०.४

गावणे / ८४.३७/४४.११

आमठाणे / २७.९०/५१.८६


हेही वाचा