प्रश्नपत्रिका गळती रोखण्यासाठी केंद्राचा निर्णय

नवी दिल्ली : नीट-यूजी २०२६ पुनर्परीक्षेपूर्वी प्रश्नपत्रिका (NEET-UG 2026 re-examination scheduled for June 21) गळती, अफवा आणि परीक्षा फसवणूक रोखण्यासाठी केंद्र सरकारने भारतात टेलिग्रामवर तात्पुरते निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.
राष्ट्रीय परीक्षा संस्थेने (NTA एनटीए) या निर्णयाचे स्वागत करत तो विद्यार्थ्यांच्या हितासाठी आवश्यक असल्याचे म्हटले आहे. एनटीएच्या माहितीनुसार, २१ जून रोजी होणाऱ्या नीट-यूजी २०२६ पुनर्परीक्षेच्या पार्श्वभूमीवर इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने टेलिग्रामवरील प्रवेश २२ जूनपर्यंत मर्यादित करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच, टेलिग्रामचे मेसेज एडिट (संपादन) फीचर ३० जूनपर्यंत भारतात निष्क्रिय ठेवण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
एनटीएने स्पष्ट केले की, काही संघटित गट टेलिग्रामचा वापर करून प्रश्नपत्रिका फुटल्याच्या खोट्या अफवा पसरवत विद्यार्थ्यांची फसवणूक करत होते. त्यामुळे परीक्षेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत होते.
मेसेज एडिट फीचर का ठरले वादग्रस्त?
एनटीएच्या तपासात असे आढळून आले की, काही टेलिग्राम चॅनेल प्रशासक जुन्या पोस्टमध्ये नंतर बदल करून त्यामध्ये परीक्षेनंतर प्रश्नपत्रिका अपलोड करत होते. पोस्टचा मूळ वेळ (टाइमस्टॅम्प) कायम राहिल्याने संबंधित प्रश्नपत्रिका परीक्षा होण्यापूर्वीच उपलब्ध होती, असा खोटा आभास निर्माण केला जात होता. याच आधारे प्रश्नपत्रिका गळतीचे कथित पुरावे सोशल मीडियावर व्हायरल केले जात होते.
विद्यार्थ्यांना अफवांपासून सावध राहण्याचे आवाहन
एनटीएने विद्यार्थी आणि पालकांना सोशल मीडियावरील अप्रमाणित माहितीवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. अधिकृत माहिती केवळ एनटीएच्या अधिकृत माध्यमांतूनच तपासावी, असेही संस्थेने म्हटले आहे. या निर्णयामुळे नीट-यूजी पुनर्परीक्षा अधिक पारदर्शक आणि गैरप्रकारमुक्त वातावरणात पार पडण्यास मदत होईल, असा विश्वास एनटीएने व्यक्त केला आहे.