सॅम्युअलच्या आई - बहिणीचा जबाब नोंद

पोलिसांच्या कारवाईवर आमदार कार्लुस फेरेरांचा तीव्र आक्षेप

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
23 mins ago
सॅम्युअलच्या आई - बहिणीचा जबाब नोंद

म्हापसा : गावसावाडा-म्हापसा येथील सॅम्युअल ब्रागांझा (२२) याच्या आत्महत्या प्रकरणी चौकशी अधिकारी पोलीस अधीक्षक विश्वेश कर्पे यांनी मृताच्या निवासस्थानी भेट देऊन त्याची आई आणि बहीण यांचा जबाब नोंदवून घेतला. यावेळी हळदोणाचे आमदार अॅड. कार्लुस फेरेरा हे उपस्थित होते. मात्र, आमदार फेरेरा यांनी पोलिसांच्या कारवाईवर तीव्र आक्षेप घेतला.

मुलाच्या मृत्यू प्रकरणी सॅम्युअलच्या आईने पोलीस महासंचालकांकडे लेखी तक्रार दाखल केली होती. या तक्रारीच्या आधारे पोलीस अधीक्षक कर्पे यांच्यामार्फत स्वतंत्र व सखोल तपास सुरू आहे. या चौकशीचा भाग म्हणून अधीक्षक कर्पे यांनी सॅम्युअलची आई व बहिणीचा जबाब नोंदवून घेतला.

जबाब नोंदवल्यानंतर अधीक्षक कर्पे यांनी सांगितले की, सॅम्युअलच्या आईने दिलेल्या तक्रारीच्या आधारे मी तपास करत आहे. या तक्रारीमध्ये प्रामुख्याने पोलिसांची कार्यपद्धती, सॅम्युअलचा व्हिडिओ व्हायरल करणारी व्यक्ती आणि सोशल मीडिया या तीन प्रमुख घटकांचा समावेश आहे. लवकरच मी माझा तपास अहवाल उत्तर गोवा पोलीस अधीक्षक हरिश्चंद्र मडकईकर यांच्याकडे सुपूर्द करणार आहे.

आमदार कार्लुस फेरेरा यांनी पोलिसांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले. सॅम्युअलच्या कथित व्हायरल व्हिडिओमध्ये कोणतीही व्यक्ती प्रत्यक्ष कचरा फेकताना दिसत नाही. या व्हिडिओमध्ये नेमका कोणता कचरा फेकला गेला, हेही स्पष्ट होत नाही. केवळ दोन व्यक्तींमधील संभाषण ऐकू येते. तरीही पोलिसांनी नेमक्या कोणत्या पुराव्यांच्या आधारे गुन्हा नोंदवला, हेच समजत नाही.

या प्रकरणात दाखल करण्यात आलेला गुन्हा हा पूर्णपणे पूर्वग्रहदूषित असून जाणीवपूर्वक सॅम्युअलच्या कुटुंबियांना त्रास देण्याच्या हेतूने करण्यात आल्याचा दावा आमदारांनी केला. मृत सॅम्युअलवर बेकायदेशीर शस्त्र बाळगल्याचा आरोप करत पोलिसांनी मृत व्यक्तीविरुद्ध आणखी एक गुन्हा नोंदवला आहे. हा अत्यंत गंभीर प्रकार असून, संबंधित व्यक्तीची सामाजिक प्रतिमा जाणीवपूर्वक मलिन करण्याचा हा प्रयत्न आहे. माणसाचा मृत्यूही सन्मानजनक असायला हवा, असे सांगून आमदार फेरेरा यांनी म्हापसा पोलिसांच्या हेतूवर प्रश्न उपस्थित केला. 

हेही वाचा