अवैध पिस्तूल बाळगल्याप्रकरणी सॅम्युअलवर गुन्हा नोंद

आत्महत्येसाठी वापरलेल्या देशी कट्ट्याला परवाना नसल्याचे उघड

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
15th June, 11:56 pm
अवैध पिस्तूल बाळगल्याप्रकरणी सॅम्युअलवर गुन्हा नोंद

म्हापसा : अवैध पिस्तूलाच्या सहाय्याने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केलेल्या गावसावाडा-म्हापसा येथील सॅम्युअल गार्विन दी ब्रागांझा (वय २२) याच्याविरुद्ध म्हापसा पोलिसांनी शस्त्रास्त्र कायद्यान्वये (आर्म्स अॅक्ट) गुन्हा दाखल केला आहे. आत्महत्येसाठी वापरण्यात आलेले देशी बनावटीचे पिस्तूल (देशी कट्टा) बेकायदेशीररीत्या बाळगल्याचे पोलीस चौकशीत स्पष्ट झाल्यानंतर ही कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.
हा धक्कादायक प्रकार ४ जूनच्या मध्यरात्री ते ५ जूनच्या पहाटे १२.३० वाजण्याच्या सुमारास घडला होता. घटनेची माहिती मिळताच म्हापसा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी केलेल्या घटनास्थळाच्या पंचनाम्यादरम्यान एक देशी कट्टा पिस्तूल आणि रिकामे काडतूस जप्त करण्यात आले होते. तपासादरम्यान सॅम्युअलने याच शस्त्राच्या सहाय्याने स्वतःवर गोळी झाडल्याचे समोर आले.
शस्त्राचा कोणताही वैध परवाना नाही
सॅम्युअलने आत्महत्येसाठी वापरलेल्या या अग्निशस्त्राचा शोध घेतला असता, त्याचा कोणताही वैध परवाना नसल्याचे उघड झाले. हे शस्त्र त्याने पूर्णपणे बेकायदेशीररीत्या स्वतःकडे बाळगले होते. सॅम्युअल आता या जगात नसला तरी, बेकायदेशीर शस्त्र बाळगल्याप्रकरणी पोलिसांनी त्याच्याविरुद्ध शस्त्रास्त्र कायद्याच्या विविध कलमांखाली गुन्हा नोंदवून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू केली आहे.
व्हिडिओ व्हायरल झाल्याने होता मानसिक तणावात
तपासादरम्यान सॅम्युअलने हे टोकाचे पाऊल का उचलले, याबाबत एक महत्त्वाची माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे. ३ जून रोजी गावसावाडा परिसरात रस्त्याकडेला कार्डबोर्डचा कचरा टाकताना एका युवकाने सॅम्युअलचा मोबाईलवर व्हिडिओ चित्रीत केला होता. हा व्हिडिओ ४ जून रोजी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला.
या व्हिडिओची दखल घेत म्हापसा पोलिसांनी त्याच दिवशी (४ जून) सॅम्युअलविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. पोलीस कारवाई आणि सोशल मीडियावरील बदनामीमुळे तो प्रचंड मानसिक तणावाखाली होता, आणि याच तणावातून त्याने स्वतःचा जीव घेतल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
पिस्तूल कुठून आले, याचा तपास सुरू
सॅम्युअलने आत्महत्येसाठी वापरलेले पिस्तूल त्याच्याकडे नेमके कुठून आणि कसे आले, याचा उलगडा करण्यात पोलिसांना अद्याप यश आलेले नाही. पोलिसांनी या संदर्भात त्याच्या कुटुंबीयांचे जबाब नोंदवून घेतले आहेत. मात्र, मृताची आई आणि बहिणीने या पिस्तूलाबाबत आपल्याला कोणतीही माहिती नसल्याचे पोलिसांना सांगितले. सॅम्युअलकडे हे घातक शस्त्र कधीपासून होते आणि ते पुरवणारा मुख्य सूत्रधार कोण, याचा शोध घेणे आता म्हापसा पोलिसांसमोर एक मोठे आव्हान ठरले आहे. 

हेही वाचा