धनगर समाजाचाही एसटीमध्ये समावेश व्हायला हवा

पणजी : येत्या विधानसभा निवडणुकीत एसटीला आरक्षण (Scheduled Tribes reservation in Goa) देणे शक्य आहे की नाही, याविषयी केंद्र सरकार १५ दिवसांत भूमिका स्पष्ट करणार. सॉलिसीटर जनरलाकडे चर्चा करून आपण मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना आरक्षणाच्या कार्यवाहीविषयी निर्णय कळवतो, असे गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितल्याचे आदिवासी कल्याण खात्याचे मंत्री रमेश तवडकर यांनी सांगितले. इतर समाजासारखाच धनगर समाजाचाही एसटीत समावेश होणे गरजेचे असल्याचे तवडकर म्हणाले.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्त्वाखाली ७ जून रोजी गोव्याच्या शिष्टमंडळाने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती. येत्या विधानसभेत एसटी आरक्षणाची कार्यवाही करण्याची मागणी शिष्टमंडळाने केली होती. याविषयी बोलताना मंत्री रमेश तवडकर यांनी ही माहिती दिली.
एसटी आरक्षणाचा कायदा संसदेत संमत झाला आहे. त्यामुळे इतर समाजाला पुढे काढून एसटी आरक्षणाला विरोध करणे अयोग्य आहे. कायदा झाल्याने एसटी आरक्षणाची कार्यवाही होणारच, असे तवडकर यांनी सांगितले.