भारताचा पाकिस्तानवर एकतर्फी विजय

महिला टी-२० विश्वचषक : स्मृतीचे अर्धशतक

Story: न्यूज डेस्क । गाेवन वार्ता |
4 hours ago
भारताचा पाकिस्तानवर एकतर्फी विजय

बर्मिंगहॅम : आयसीसी महिला टी-२० विश्वचषक २०२६ स्पर्धेत भारतीय महिला संघाने विजयी सलामी देत कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा ६४ धावांनी पराभव केला. एजबेस्टन स्टेडियमवर झालेल्या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करत २० षटकांत १७० धावांची भक्कम मजल मारली. प्रत्युत्तरात पाकिस्तानचा संपूर्ण संघ १७ षटकांत १०६ धावांत गारद झाला.
हा महिला टी-२० विश्वचषकाच्या इतिहासातील पाकिस्तानविरुद्ध भारताचा सातवा विजय ठरला. तसेच एजबेस्टन मैदानावर टी-२० क्रिकेटमध्ये पाकिस्तानवर मिळवलेला हा भारताचा चौथा विजय आहे.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेल्या भारताला सलामीवीर स्मृती मानधनाने भक्कम सुरुवात करून दिली. तिने ६८ धावांची शानदार खेळी साकारत पाकिस्तानच्या गोलंदाजांवर दबाव निर्माण केला. कर्णधार हरमनप्रीत कौरनेही संयमी फलंदाजी करत ३६ धावांचे महत्त्वपूर्ण योगदान दिले.
अखेरच्या षटकांमध्ये ऋचा घोषने आक्रमक फलंदाजीचे दर्शन घडवले. तिने अवघ्या १७ चेंडूत ३४ धावा करत २०० च्या स्ट्राईक रेटने धावा कुटल्या. तिच्या या खेळीमुळे भारताला १७० धावांचा टप्पा गाठता आला. पाकिस्तानकडून सादिया इक्बाल आणि फातिमा सना यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.
१७१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानच्या फलंदाजांना भारतीय गोलंदाजांसमोर टिकाव धरता आला नाही. सलामीवीर मुनीबा अलीने सर्वाधिक ४१ धावा केल्या. मात्र, दीप्ती शर्माच्या अचूक थ्रोवर ती धावबाद झाली आणि पाकिस्तानच्या आशांनाही मोठा धक्का बसला.
आलिया रियाझने १८ धावा केल्या, तर गुल फिरोझा आणि आयेशा झफर यांनी प्रत्येकी १२ धावांचे योगदान दिले. याशिवाय एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. पाकिस्तानचा डाव नियमित अंतराने विकेट्स गमावत १०६ धावांत आटोपला.
दीप्ती शर्माचा ‘पंच’
भारतीय गोलंदाजांनी सामन्यावर पूर्ण वर्चस्व गाजवले. अष्टपैलू दीप्ती शर्माने शानदार गोलंदाजी करत पाच विकेट्स घेत पाकिस्तानच्या फलंदाजीचा कणा मोडला. तिच्या अचूक माऱ्यासमोर पाकिस्तानी फलंदाज पूर्णपणे हतबल दिसले. दीप्तीला श्री चरणी हिने तीन विकेट्स घेत उत्तम साथ दिली. तर शेफाली वर्माने एक विकेट घेत गोलंदाजीतील योगदान नोंदवले. भारतीय गोलंदाजांच्या शिस्तबद्ध आणि आक्रमक कामगिरीमुळे पाकिस्तानला २० षटकेही खेळता आली नाहीत.
विश्वचषकातील विजयी सुरुवात
या दमदार विजयासह भारतीय महिला संघाने विश्वचषक मोहिमेची शानदार सुरुवात केली आहे. फलंदाज आणि गोलंदाज या दोन्ही विभागांत उत्कृष्ट कामगिरी करत भारताने प्रतिस्पर्धी संघांना धोक्याचा इशारा दिला आहे. विशेषतः स्मृती मानधना आणि दीप्ती शर्मा यांच्या कामगिरीने भारतीय चाहत्यांचा आत्मविश्वास उंचावला असून, आगामी सामन्यांसाठी संघाचा उत्साहही दुणावला आहे.