केपेच्या आमदारांनी नवीन कामे आणली नाहीत; जुन्याच कामांचे नारळ फोडून श्रेय घेण्याचा प्रयत्न!

केपे मतदारसंघाचे आमदार नवीन विकासकामे आणण्यात अपयशी ठरले असून, माझ्या कार्यकाळात मंजुरी मिळालेल्या जुन्या प्रकल्पांचे नारळ फोडून श्रेय लाटत असल्याचा थेट आरोप माजी उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर यांनी स्पष्टपणे केला आहे.

Story: गोवन वार्ता | प्रतिनिधी |
31 mins ago
केपेच्या आमदारांनी नवीन कामे आणली नाहीत; जुन्याच कामांचे नारळ फोडून श्रेय घेण्याचा प्रयत्न!

पणजी : केपे मतदारसंघाचे सध्याचे आमदार गेल्या साडेचार वर्षांच्या कार्यकाळात एकही नवीन विकासकाम आणण्यात पूर्णपणे अपयशी ठरले असून, माझ्या कार्यकाळात मंजुरी मिळालेली आणि टेंडर जारी झालेली कामेच पूर्ण करून किंवा त्यांचे नारळ फोडून श्रेय घेण्याचा प्रयत्न करत आहेत, असा जोरदार हल्लाबोल गोव्याचे माजी उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर यांनी केला आहे. पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी केपेच्या विद्यमान आमदारांवर हे राजकीय टीकास्त्र सोडले.

 केपे मतदारसंघातील विकासकामांवरून माजी उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर यांनी स्थानिक आमदारांच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. कवळेकर यांनी दावा केला की, सध्या केपे मतदारसंघात जी काही विकासकामे सुरू आहेत किंवा पूर्णत्वाकडे जात आहेत, ती सर्व कामे आणि त्यांच्याशी संबंधित टेंडर्स माझ्याच कार्यकाळात मंजूर झालेले होते. गेल्या साडेचार वर्षांत स्थानिक आमदारांनी केपेच्या विकासासाठी एकही नवीन मोठा प्रकल्प किंवा नवीन निधी आणलेला नाही, असा थेट सवाल त्यांनी या वेळी केला.

आपल्या दाव्याचे स्पष्टीकरण देताना त्यांनी केपे पोलीस स्थानकाच्या इमारतीचे उदाहरण दिले. केपे पोलीस स्थानकाच्या इमारतीचे ९० टक्के काम माझ्याच कार्यकाळात पूर्ण झाले होते. उर्वरित केवळ १० टक्के काम बाकी असतानाही गेल्या साडेचार वर्षांत ते पूर्ण होऊ शकले नाही आणि आज तिथे झाडेझुडपे उगवली आहेत, अशी टीका त्यांनी केली. स्थानिक आमदार नेहमी आपल्याला मुख्यमंत्री आणि सरकारमधील मंत्र्यांचा पूर्ण पाठिंबा असल्याचे सांगत असतात. जर सरकारचा आणि मुख्यमंत्र्यांचा असा पूर्ण पाठिंबा आहे, तर मग केपेसाठी नवीन प्रकल्प का आणले गेले नाहीत, असा थेट सवाल कवळेकर यांनी उपस्थित केला.

दरम्यान, केपे मतदारसंघात एसटी आरक्षणाची (ST Reservation) प्रक्रिया आणि भविष्यातील राजकीय पर्यायांबद्दल विचारले असता, आपण पक्षासाठी आणि लोकांच्या हितासाठी नेहमीच प्रामाणिकपणे काम करत आलो असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आगामी काळातील राजकीय पर्याय किंवा निवडणुकीबाबतचा अंतिम निर्णय हा पक्षाची वरिष्ठ मध्यवर्ती समिती घेईल आणि पक्षश्रेष्ठी जो आदेश देतील त्यानुसारच पुढील पावले उचलली जातील, असे बाबू कवळेकर यांनी नमूद केले.

हेही वाचा
सर्व पहा