सहलीतील विद्यार्थ्याच्या मृत्यूप्रकरणी दीपविहार शाळेला कारणे दाखवा नोटीस

Story: गोवन वार्ता | प्रतिनिधी |
25 mins ago
सहलीतील विद्यार्थ्याच्या मृत्यूप्रकरणी दीपविहार शाळेला कारणे दाखवा नोटीस

पणजी : सत्तरीतील सहलीदरम्यान विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू झाल्याप्रकरणी शिक्षण संचालनालयाने सडा-मुरगाव येथील दीपविहार उच्च माध्यमिक विद्यालयाच्या व्यवस्थापन समितीला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

शिक्षण संचालनालयाने दीपविहार उच्च माध्यमिक विद्यालय, सडा-मुरगावच्या सत्तरीतील सहलीदरम्यान विद्यार्थ्याच्या बुडून मृत्यूच्या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणी चार शिक्षक व दोन टूर ऑपरेटरविरुद्ध पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे.

सुमारे ३०१ विद्यार्थी आणि केवळ चार शिक्षक सहलीला गेले होते. विद्यार्थ्यांना आठ गटांत विभागण्यात आले होते. सहलीसाठी आवश्यक परवानग्या, ठिकाणाची सुरक्षितता, शिक्षकांचे पर्यवेक्षण, प्रथमोपचार व आपत्कालीन व्यवस्था याबाबत नियमांचे पालन झाले का, याची चौकशी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

शाळा व्यवस्थापन समितीला तीन कार्यदिवसांत कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असून, सहलीशी संबंधित सर्व कागदपत्रे सादर करण्यास सांगण्यात आले आहे. समाधानकारक उत्तर न मिळाल्यास गोवा शालेय शिक्षण कायदा व नियमांनुसार पुढील कारवाई करण्याचा इशारा शिक्षण संचालनालयाने दिला आहे.

हेही वाचा
सर्व पहा