भाऊसाहेबांचे मिरामार येथील समाधीस्थळाचे नूतनीकरण पुढील वर्षाच्या आत पूर्ण होणार: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

Story: गोवन वार्ता | प्रतिनिधी |
just now
भाऊसाहेबांचे मिरामार येथील समाधीस्थळाचे नूतनीकरण पुढील वर्षाच्या आत पूर्ण होणार: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

पणजी : भाऊसाहेब बांदोडकर यांच्या मिरामार येथील समाधीस्थळाचे नूतनीकरण सुरू आहे. हे काम पुढील वर्षाच्या आत पूर्ण होईल असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले. बुधवारी त्यांनी बांदोडकर यांच्या जुन्या सचिवालयाजवळील पुतळ्याला हार अर्पण करून त्यांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी मंत्री सुदिन ढवळीकर, मुख्य सचिव व्ही कांदावेलू, बांदोडकर कुटुंबीय व अन्य अधिकारी उपस्थित होते. यानंतर नवीन सचिवालय आवारातील बांदोडकर यांच्या पुतळ्याला देखील फुले वाहण्यात आली. 

मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, गोव्याचे पहिले मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर यांच्या पुण्यतिथी निमित्त आम्ही गोवा सरकारकडून त्यांना आदरांजली वाहतो. त्यांचे कार्य आमच्यासह समस्त गोमंतकीय जनतेच्या सदैव लक्षात राहील. आम्ही दरवर्षी त्यांची जयंती आणि पुण्यतिथी निमित्त त्यांच्या कार्याची आठवण ठेवतो. आम्ही विद्यार्थ्यांना देखील त्यांच्या समाधी स्थळाला भेट देण्यास सांगतो. याद्वारे बांदोडकरांचे कार्य, त्यांच्या  आठवणी गोव्यातील युवा पिढीला समजावून सांगण्याचा आमचा प्रयत्न असतो. 

मंत्री ढवळीकर म्हणाले की, भाऊसाहेब बांदोडकर यांनी गोव्यासाठी न भूतो न भविष्यती अशा पद्धतीचे कार्य केले आहे. त्यांनी मुख्यमंत्री म्हणून काम करत असताना नेहमीच संपूर्ण गोव्याच्या विकासासाठी काम केले. त्यांनी गोव्यातील प्रत्येक क्षेत्रासाठी भरीव योगदान दिले आहे. ते खऱ्या अर्थाने गोव्याचे भाग्यविधाता होते. आजच्या जनरेशन झी ने भाऊसाहेबांनी केलेले कार्याची तसेच गोव्याच्या राजकीय इतिहासाची माहिती करून घेणे आवश्यक आहे. तसेच भाऊसाहेबांच्या मगो पक्षाने केलेल्या कार्याची माहिती देखील करून घ्यावी.

हेही वाचा
सर्व पहा