पणजी: विधानसभा निवडणुका जशा जवळ येत आहेत, तसतसे विविध मतदारसंघांतील इच्छुकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात असून राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. उत्तर गोव्यातील थिवी मतदारसंघात याचे जोरदार पडसाद उमटू लागले असून, येथील जुने राजकीय प्रतिस्पर्धी किरण कांदोळकर आणि मच्छिमार खात्याचे मंत्री निळकंठ हळर्णकर हे पुन्हा एकदा आमने-सामने येणार आहेत. राजकीय रिंगणात एकमेकांविरोधात ठाकण्याची दोन्ही नेत्यांची ही चौथी वेळ असणार आहे.
किरण कांदोळकर यांनी आगामी निवडणुकीत थिवी मतदारसंघातून अपक्ष म्हणून रिंगणात उतरण्याची अधिकृत घोषणा केली आहे. विविध राजकीय पक्षांनी आपल्याशी संपर्क साधला असला, तरी कार्यकर्त्यांच्या आणि समर्थकांच्या इच्छेनुसार आपण अपक्ष उमेदवारीच दाखल करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या वेळी मंत्री निळकंठ हळर्णकर यांच्या कार्यपद्धतीवर टीका करताना कांदोळकर यांनी थिवीत कोणताही ठोस विकास झाला नसल्याचा आरोप केला. केवळ भूमीपूजन करणे किंवा श्रीफळ फोडणे म्हणजे प्रत्यक्ष विकास होत नाही, असा टोला त्यांनी लगावला.
कांदोळकर यांच्या या टीकेला प्रत्युत्तर देताना मंत्री निळकंठ हळर्णकर यांनी आपल्या कार्यकाळात रस्ते, पायाभूत सुविधा तसेच स्थानिक देवालयांची कामे मोठ्या प्रमाणावर झाल्याचा दावा केला. या सर्व विकासकामांच्या बातम्या आणि छायाचित्रे वृत्तपत्रांतून प्रसिद्ध झाली असून, आजच्या डिजिटल युगात मोबाईलच्या माध्यमातून ही कामे थेट जनतेपर्यंत पोहोचत आहेत. निवडणुकीच्या रिंगणात कोणीही प्रतिस्पर्धी असला, तरी आपल्याला कोणताही फरक पडत नाही. मुख्यमंत्र्यांच्या आशीर्वादाने आणि जनतेच्या पाठिंब्यामुळे कोणालाही घाबरण्याचे कारण नाही, असा पुनरुच्चार त्यांनी केला.
थिवी मतदारसंघाचा राजकीय इतिहास पाहता, २००७ सालापासून हळर्णकर आणि कांदोळकर यांच्यात प्रदीर्घ संघर्ष पाहायला मिळाला आहे. २००७ च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून निळकंठ हळर्णकर, २०१२ मध्ये भाजपकडून किरण कांदोळकर, तर २०१७ मध्ये काँग्रेस पक्षाकडून पुन्हा निळकंठ हळर्णकर विजयी झाले होते. २०२२ च्या निवडणुकीत किरण कांदोळकर यांच्याऐवजी त्यांच्या पत्नी कविता कांदोळकर या तृणमूल काँग्रेसकडून निवडणुकीच्या रिंगणात होत्या. या पारंपरिक संघर्षात बहुतांश वेळा निळकंठ हळर्णकर यांनीच बाजी मारल्याचे दिसून आले आहे. आता या चौथ्या थेट सामन्यात थिवीतील जनता कोणाच्या पारड्यात कौल देते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.


