काणकोणमधील बाडसरे जंगलात अडकलेल्या सोलो ट्रेकरची सुरक्षित सुटका

काणकोण येथील बाडसरे जंगलात स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला तिरंगा फडकवण्यासाठी गेलेला रोहित कुडाळकर हा सोलो ट्रेकर भूस्खलनामुळे अडकला होता; मात्र काणकोण पोलीस, वन खाते आणि अग्निशामक दलाने तातडीने मोहीम राबवून त्याला सुरक्षित बाहेर आणले.

Story: गोवन वार्ता | प्रतिनिधी |
25 mins ago
काणकोणमधील बाडसरे जंगलात अडकलेल्या सोलो ट्रेकरची सुरक्षित सुटका

पणजी : काणकोण तालुक्यातील गावडोंगरी येथील बाडसरे मंदिर परिसराच्या घनदाट जंगलात आज दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास एक सोलो ट्रेकर रस्ता चुकून आणि भूस्खलनामुळे अडकल्याची घटना घडली. मडगाव नियंत्रण कक्षाकडून काणकोण पोलिसांना दुपारी १२ वाजता यासंदर्भातील माहिती प्राप्त झाली. रोहित कुडाळकर नावाचा एक तरुण बाडसरे जंगलात अडकला असून त्याला तात्काळ मदतीची गरज असल्याचे या संदेशात नमूद करण्यात आले होते. परिसरात अचानक झालेल्या भूस्खलनामुळे तो तरुण बाहेर पडू शकत नव्हता. ही माहिती मिळताच स्थानिक पोलीस, वन खाते आणि अग्निशामक दलाचे जवान तातडीने सक्रिय झाले.



स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रध्वज फडकवण्याच्या उद्देशाने रोहित कुडाळकर हा हातात तिरंगा घेऊन काणकोण येथील बाडसरे डोंगर परिसरात एकटाच ट्रेकिंगसाठी गेला होता. १५ ऑगस्टच्या पूर्वसंध्येला डोंगराच्या शिखरावर जाऊन देशाचा तिरंगा फडकवणे हा त्याचा मुख्य हेतू होता. मात्र, जंगलात ट्रेकिंग करत असतानाच अचानक त्या भागात डोंगराचा काही भाग खचून भूस्खलन झाले. यामुळे पुढचा मार्ग बंद झाला आणि दाट झाडीत तो तरुण अडकून पडला. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून आणि आपला जीव धोक्यात असल्याचे लक्षात येताच अडकलेल्या तरुणाने प्रसंगावधान राखून स्वतः मोबाईलवरून आपत्कालीन विभागाशी संपर्क साधून घडलेल्या प्रकाराची माहिती दिली.

घटनेची माहिती मिळताच काणकोण पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी, वन खात्याचे अधिकारी आणि काणकोण अग्निशामक दलाचे जवान तातडीने गावडोंगरी येथील बाडसरे मंदिर परिसराच्या दिशेने रवाना झाले. जंगलातील खडतर वाट आणि भूस्खलनाचा धोका लक्षात घेऊन बचाव पथकाने संयुक्तपणे तातडीने शोध आणि बचाव मोहीम हाती घेतली. वेगाने राबवलेल्या या मोहिमेमुळे अडकलेल्या रोहित कुडाळकरचा शोध घेण्यात यश आले आणि त्याला जंगलातून सुरक्षितपणे बाहेर आणण्यात आले. कोणतीही जीवितहानी न होता ही मोहीम यशस्वीरीत्या फत्ते झाली. सुरक्षित सुटका झाल्यानंतर रोहित कुडाळकर याने तात्काळ प्रतिसाद देऊन प्राण वाचवल्याबद्दल गोवा पोलीस, वन खाते आणि अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांचे आभार मानले.

हेही वाचा
सर्व पहा