मुरगावमधील दीपविहार उच्च माध्यमिक विद्यालयाची पावसाळी सहल सत्तरीतील धबधब्याच्या परिसरात गेली असता, तिथे एका विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू होतो. पावसाळ्यात आधीच धबधब्यांवर जाणे यापूर्वी अनेकदा धोकादायक ठरले आहे. हल्लीच विर्डी-दोडामार्ग परिसरात गेलेले साखळीतील विद्यार्थी नदीच्या पाण्याची पातळी वाढल्यामुळे अडकून पडले होते. सांगे तालुक्यातील मैना पी धबधब्यावर जुलै २०२३ मध्ये दोन व्यक्ती बुडून मरण पावल्या होत्या. जुलै २०२४ मध्ये पाली धबधब्यावर ८० लोक अडकून पडले होते, त्यांची सुटका अग्निशमन दल, वन खाते आणि पोलिसांनी केली होती. सप्टेंबर २०२४ मध्ये सत्तरीतील चरावणे धबधब्याच्या परिसरात सेंट झेवियर कॉलेजचे विद्यार्थी अडकले होते. अग्निशमन दलाच्या जवानांनी त्यांची सुटका केली होती. ऑक्टोबर २०२४ मध्ये सावर्डे-काजरेधाट येथील तोणीर धबधब्यावर पंकज राजपूत हा ३० वर्षीय तरुण बुडाला होता. त्यापूर्वीही तोणीर धबधब्यावर अनेकांचा बुडून मृत्यू झाला आहे.
पावसाळ्यातच नव्हे, तर इतर दिवसांतही विद्यार्थ्यांना धबधब्यांवर किंवा जंगलात घेऊन जाणे जोखमीचे असते. गोव्यातील धबधब्यांवरच बुडून मृत्यू झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. असे असतानाही विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ करत अनेक शाळा व महाविद्यालये पावसाळी सहलीच्या किंवा ट्रेकिंगच्या नावाखाली मुलांना धबधब्यांवर घेऊन जातात याचे आश्चर्य वाटते. सत्तरी तालुक्यातील सावर्डे येथील तोणीर-काजरेधाट धबधब्यावर वास्कोतील दीपविहार उच्च माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना शिक्षण संस्थेने ट्रेकिंगसाठी नेले होते. त्यावेळी एक विद्यार्थी धबधब्यावर बुडाला. विशेष म्हणजे, त्याला वाचवू शकेल अशी कोणतीही व्यवस्था नसताना विद्यार्थ्यांना अशा ठिकाणी नेण्याचा निर्णय शिक्षण संस्थेने कसा घेतला? असा प्रश्न उपस्थित होतो. पाण्याचा धोका आहेच, पण वन्य प्राण्यांचाही धोका असतो. पावसाचे दिवस असल्याने कुठल्याही क्षणी नदीच्या पाण्याची पातळी वाढण्याची, अचानक मुसळधार पाऊस पडण्याची किंवा वादळ येण्याची शक्यता असते. दोनच दिवसांपूर्वी आंबोली धबधब्यावर एका पर्यटकाला साप चावल्यामुळे त्याचा मृत्यू झाला. अशी उदाहरणे समोर असताना कुठलीच काळजी न घेता, कुठलीच सुरक्षेची व्यवस्था न करता विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालण्याचे काम या शिक्षण संस्थेने केले आहे. त्यामुळे त्यांच्यावर योग्य ती कारवाई व्हायलाच हवी. फक्त शिक्षण खातेच नव्हे तर वन खात्याच्या अधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना या गोष्टीची कल्पना होती का, त्याचीही चौकशी करण्याची गरज आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी वन खात्याकडून तोणीर धबधब्यावर घडलेल्या घटनेचा अहवाल मागवला आहे. कुठले सुरक्षिततेचे उपाय होते, त्याविषयी स्पष्टीकरण मागितले आहे. शिक्षण खात्याने दीपविहार संस्थेला कारणे दाखवा नोटीस बजावून लेखी स्पष्टीकरण द्यायला सांगितले आहे; परंतु अद्याप कुठलीच कारवाई होताना दिसत नाही. फक्त स्पष्टीकरण मागून चालणार नाही. या संपूर्ण घटनेत शिक्षक, वन खात्याचे कर्मचारी किंवा टूर ऑपरेटर यांच्याकडून काही निष्काळजीपणा झाला आहे का, याची सखोल चौकशी करून संबंधितांवर योग्य ती कारवाई व्हायला हवी. पोलिसांनी गुन्हा नोंदवून आपली जबाबदारी पार पाडली असली तरी एका विद्यार्थ्याच्या मृत्यूला जे लोक जबाबदार आहेत, त्यांच्यावर योग्य ती कारवाई व्हायला हवी. जिल्हाधिकारी, शिक्षण संचालक याबाबत योग्य कारवाई करतील अशी अपेक्षा आहे.
पावसाळ्यात सर्वांचाच जीव धोक्यात घालून धबधब्यांवर ट्रेक करण्यापेक्षा विद्यार्थ्यांना फायद्याचे ठरतील अशा कार्यक्रमांचे, परिसंवादांचे व व्याख्यानांचे आयोजन करण्यावर भर द्यायला हवा. कौशल्य विकासाला चालना मिळेल, त्यांच्या ज्ञानात भर पडेल अशा प्रकारचे उपक्रम व्हायला हवेत. त्यासाठी उद्योगांना भेटी देणे, चांगल्या यशस्वी स्टार्टअप्सना भेटी देणे, एखाद्या प्रकल्पाला भेट देणे अशा गोष्टींवर भर द्यायला हवा. निसर्गाची आवड असेलच आणि विद्यार्थ्यांना ट्रेकिंगला किंवा जंगलात नेले जात असेल, तर सुरक्षेचे सर्व उपाय योजले आहेत याची काळजी घेणे ही शिक्षकांची जबाबदारी आहे. तोणीर धबधब्यावर एका विद्यार्थ्याचा बुडून झालेला मृत्यू ही अत्यंत गंभीर बाब आहे. अशा घटना पुन्हा होणार नाहीत यासाठी सर्वांनीच अशा घटनांमधून बोध घ्यायला हवा. विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन, त्यांची सुरक्षा लक्षात घेऊन उपक्रम राबवावेत.


