काळाची गरज ओळखणारा नाटककार

रमाकांत पायाजींसारख्या लेखकांनी समाजातील, कुटुंबांतील अनेक वास्तव आपल्या नाटकांमधून मांडून समाजाशी जणू संवादच साधला होता. गोव्यातील नाट्यलेखकांच्या परंपरेत पायाजी हे श्रेष्ठ लेखक म्हणून पाहिले जाणारच, पण नाट्यकलेकडे वळण्यासाठी पायाजी यांच्या नाटकांनी अनेकांना आकर्षित केले आहे हे विशेष. त्यांच्या जाण्याने नाट्यक्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे.

Story: संपादकीय |
6 hours ago
काळाची गरज ओळखणारा नाटककार

उत्सवी नाटकांची परंपरा गोव्यातूनच सुरू झाली असे म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही. सोळाव्या शतकापासून गोव्यात नाटकांची परंपरा होती. त्यानंतर धारगळच्या शांतादुर्गा देवस्थानात १८१८ साली नाट्यप्रयोग झाल्याची नोंद असल्याचेही काही संशोधकांनी म्हटले आहे. अठराव्या शतकात डोंगरी येथे कृष्णंभट बांदकर यांनी लिहिलेल्या 'शुकरंभा संवाद' या नाटकाचा प्रयोग होता. त्यावेळी अण्णासाहेब किर्लोसकर गोव्यात होते. त्यांनी हा नाट्यप्रयोग पाहूनच प्रेरणा घेतल्याची नोंद आहे. यावरून गोव्याची नाट्य परंपरा किती मोठी आहे, हे लक्षात येते. पुढे गोव्यात अनेक मोठे नाट्यकलाकार आणि नाट्यलेखक तयार झाले. गावोगावी नाटकांचे प्रयोग होऊ लागले त्यामुळे नाटकात काम केलेला माणूस नाही असे एकही घर गोव्यात सापडणार नाही. आजही गोव्यात नाटकाचे प्रयोग मोठ्या प्रमाणात होतात. गोव्याला नाट्यपरंपरेचा असलेला वारसा अखंडित सुरू आहे. किंबहुना गोव्यातील अनेक नाटककारांनी महाराष्ट्रातील रंगभूमी गाजवली. मास्टर दीनानाथ मंगेशकरांपासून ते पं. प्रसाद सावकार यांच्यापर्यंत महाराष्ट्रात गोव्यातील नाट्यकलाकारांचे वर्चस्व राहिले. या यादीत अनेक नटश्रेष्ठांची नावे आहेत. आजही महाराष्ट्रातील नाट्यस्पर्धांमध्ये गोव्यातील नाटके आपला ठसा उमटवतात आणि पहिले येण्याचा अनेकदा मानही मिळवतात. कृष्णंभट बांदकर यांच्यापासून सुरू झालेला गोव्याचा नाटकांचा वारसा आजही सुरू आहे. ज्यावेळी गोव्यातील हौशी रंगभूमीची गरज होती, त्या काळात गोव्यात अनेक ज्वलंत विषयांवरील नाटके लिहून गोव्यातील नाटककारांनी नाट्यरसिकांची मने जिंकली. काही नाटके इतकी प्रसिद्ध होती की त्याचे प्रयोग गोव्यातील गावोगावी होत असत. फोन, मोबाईल, टीव्ही नसलेल्या काळात गोव्यातील नाटककारांनी अनेक नाटके लिहून ती सादर केली. गोव्यातील गावोगावी नाट्यगंगा वाहू लागली. त्या काळातील हौशी नाटककारांच्या मांदियाळीत महत्त्वाचे नाव आहे ते रमाकांत शं. पायाजी यांचे. गोव्यात एकेकाळी सामाजिक नाटकांचे पीकच आले होते. त्यावेळी गावोगावी मोठ्या प्रमाणात नाटके व्हायची. गणेश हिर्लेकर, कमलाकर बोरकर, रमाकांत पायाजी, गोकुळदास मुळवी, विठ्ठल गावडे पारवाडकर, साईदास आपटे, श्रीकृष्ण आरोसकर अशा अनेक मराठी नाटककारांची नाटके त्यावेळी गोव्यात आणि महाराष्ट्रात व्हायची.

रमाकांत पायाजी यांनी गोव्यातील नाट्यक्षेत्राला दिलेले योगदान हे विसरता येणार नाही. राज्य सरकारने त्यांना राज्य सांस्कृतिक पुरस्कार, राजभाषा संचालनालयाचा मानाचा पुरस्कार देऊन गौरवले होते. त्यांच्या निधनामुळे गोव्याच्या नाट्य लेखकांच्या यादीतील एक मौल्यवान रत्न हरपले आहे. त्यांच्या नाटकांना महाराष्ट्रातील अनेक नाट्य स्पर्धांमध्ये पारितोषिके प्राप्त झाली होती. 'वाहते गंगा त्यागाची' आणि 'उभा आंधळा मी अंधारी' या नाटकांना अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद आणि कामगार कल्याण केंद्राने गौरविले होते. 'हा पिंजरा काटेरी', 'जुगारी विळखा', 'चंबळचा डाकू', 'फुटला पाझर पाषाणाला', 'कडेलोट', 'दैवखेळ' अशा अनेक नाटकांमुळे रमाकांत पायाजी यांचे नाव गोवा आणि महाराष्ट्रभर झाले. १९७० ते १९९० पर्यंत गोवा व महाराष्ट्रात होणाऱ्या अनेक जत्रांमधून, देवस्थानांच्या उत्सवांमधून रमाकांत पायाजी यांची नाटके हमखास कुठे ना कुठे होत असत. जसे एकेकाळी रहस्यकथांसाठी गोव्याचे सुपुत्र गुरुनाथ नाईक यांनी महाराष्ट्र गाजवला तसेच रमाकांत पायाजी यांनी एकापेक्षा एक सरस नाटके लिहून आपला दबदबा निर्माण केला होता. त्यावेळी त्यांच्या काही नाटकांच्या चार आवृत्त्याही निघाल्या होत्या. विशेष म्हणजे पायाजी हे स्वतः नाटकांमध्ये काम करायचे. १९६८ ते १९९६ या काळात त्यांनी दीडशेपेक्षा जास्त भूमिका केल्या होत्या. कला अकादमी गोवा, गोवा सरकार यांचे पुरस्कार त्यांच्या नावावर आहेतच, पण गोवा आणि महाराष्ट्रातील अनेक नाट्यसंस्था व कलासंस्थांनी त्यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित केले. 

आज नाटकांचे स्वरूप बदलत आहे. काहीवेळा किळसवाणे विनोद भरूनही उत्सवी रंगभूमीवर नाटके आणली जात आहेत. मात्र रमाकांत पायाजींसारख्या लेखकांनी समाजातील, कुटुंबांतील अनेक वास्तव आपल्या नाटकांमधून मांडून समाजाशी जणू संवादच साधला होता. गोव्यातील नाट्यलेखकांच्या परंपरेत पायाजी हे श्रेष्ठ लेखक म्हणून पाहिले जाणारच, पण नाट्यकलेकडे वळण्यासाठी पायाजी यांच्या नाटकांनी अनेकांना आकर्षित केले आहे हे विशेष. त्यांच्या जाण्याने नाट्यक्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे. एका काळाची गरज ओळखून समर्थपणे नाट्यलेखन केलेल्या या नाटककाराला भावपूर्ण श्रद्धांजली.