स्कॉ टलंडमधील ग्लासगो येथे राष्ट्रकुल स्पर्धा पार पडली. अनेक महत्त्वाचे खेळ वगळले असतानाही भारताने चांगली कामगिरी करून १३ सुवर्णपदकांसह एकूण ३९ पदके जिंकून पदकतालिकेत चौथे स्थान मिळवले. स्पर्धेच्या समारोपानंतर पुढील आयोजन भारतात करण्याची घोषणाही करण्यात आली. यापूर्वी भारतात झालेल्या या राष्ट्रकुल स्पर्धेच्या आयोजनात, पायाभूत सुविधा उभारणी आणि क्रीडा साहित्य खरेदीच्या नावाखाली हजारो कोटींचा घोटाळा झाला होता. भारताला प्रथमच २०१० मध्ये दिल्लीत राष्ट्रकुल स्पर्धा आयोजित करण्याचा मान मिळाला होता, पण त्यावेळी सर्वांत मोठा घोटाळा झाला होता, ज्यामुळे देशाची जागतिक पातळीवर बदनामी झाली होती. आता २०३० मध्ये पुन्हा भारतात राष्ट्रकुल स्पर्धा होणार असल्याने या आयोजनासाठी मोठी खबरदारी घ्यावी लागेल. सध्याच्या स्पर्धेतील कामगिरी पाहता, २०२८ च्या ऑलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडू निश्चितच उत्तम कामगिरी करतील यात शंका नाही.
मागील राष्ट्रकुल स्पर्धेत भारताला ६१ पदके मिळाली होती; त्या तुलनेत यंदाची संख्या कमी वाटत असली, तरी यंदाची राष्ट्रकुल स्पर्धा मर्यादित स्वरूपात झाल्यामुळे भारताच्या पदकांवरही त्याचा परिणाम दिसून आला. यंदाच्या स्पर्धेत अनेक पारंपरिक खेळ वगळण्यात आल्यामुळे केवळ पदकसंख्येवरून कामगिरीचे मूल्यमापन करणे योग्य ठरणार नाही. पण भारतीय खेळाडूंनी केलेली कामगिरी निश्चितच समाधानकारक आहे. या कामगिरीतून भारतीय खेळाडू बरेच काही शिकतील, अशी अपेक्षाही आहे. भारतात गेल्या काही वर्षांत 'खेलो इंडिया'सारख्या उपक्रमातून खेळावर विशेष भर दिला गेला आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारताची कामगिरी यापुढेही चांगली असेल यात शंका नाही. भारतीय खेळाडूंना प्रशिक्षणासाठी सुविधा दिल्या, चांगले प्रशिक्षक नियुक्त केले किंवा प्रसंगी देशाबाहेर प्रशिक्षणासाठी पाठवले, तर भारतीय क्रीडा क्षेत्राला सोन्याचे दिवस यायला वेळ लागणार नाही. यावेळी कुस्ती, बॅडमिंटन, हॉकी, क्रिकेट, टेबल टेनिस, स्क्वॅश यांसारखे भारताचे वर्चस्व असलेले खेळ नसल्यामुळे भारतीय खेळाडूंची मोठी निराशा झाली. कारण या खेळांमध्ये भारतीय खेळाडूंनी नेहमीच चांगली कामगिरी केलेली आहे. हे खेळ राष्ट्रकुल स्पर्धेत नसतानाही भारतीय खेळाडूंनी वेगवेगळ्या प्रकारांत मिळवलेली ३९ पदके आणि त्यातही १३ सुवर्णपदके मिळवल्यामुळे या यशाचे महत्त्व अधिक वाढते.
भारतीय बॉक्सिंग खेळाडूंनी सात सुवर्णांसह एकूण दहा पदके मिळवली. वेगवेगळ्या देशांच्या खेळाडूंशी दोन हात करून भारतीय खेळाडू बॉक्सिंगमध्ये कमाल करू शकतात, हेच यातून सिद्ध झाले आहे. ऑलिम्पिकच्या दृष्टीनेही ही बाब अत्यंत सकारात्मक आहे. अनेक युवा खेळाडूंनी पहिल्याच मोठ्या स्पर्धेत प्रभावी कामगिरी केली असून अनुभवी आणि नवोदित खेळाडूंचा समतोल भारतीय क्रीडा क्षेत्रासाठी आशादायक आहे. यावरून पुढील दशकासाठी सक्षम खेळाडूंची फळी तयार होत आहे, हे स्पष्ट दिसत आहे. कमी क्रीडा प्रकार असतानाही भारतीय खेळाडूंनी संधीचे सोने केले आहे. त्यामुळेच यंदाची राष्ट्रकुल स्पर्धा भारतीय क्रीडा क्षेत्रासाठी तुलनात्मक अभ्यास करायचा झाल्यास महत्त्वाची आहे. कारण अनेक क्रीडा प्रकारांमध्ये भारतीय खेळाडूंनी जागतिक दर्जाच्या अनेक खेळाडूंना कडवी टक्कर दिली. गुणवत्तेच्या दृष्टीनेही भारतासाठी यंदाच्या राष्ट्रकुल स्पर्धेतील एकूणच कामगिरी समाधानकारक ठरली आहे. या स्पर्धेतील यशाचा आणि अनुभवाचा फायदा याच वर्षी जपानमध्ये होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेत खेळाडू उठवतील, अशी अपेक्षा आहे. जागतिक क्रीडा स्पर्धांमध्ये चीन, जपान आणि दक्षिण कोरियासारख्या देशांतील खेळाडूंविरुद्ध भारतीय खेळाडूंना सातत्य सिद्ध करून राष्ट्रकुलातील यशाची पुनरावृत्ती करण्याची आवश्यकता आहे. त्यानंतर लॉस एंजेलीसमध्ये २०२८ मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिकमध्येही भारतीय खेळाडूंना हेच सातत्य ठेवावे लागेल. गेल्या काही वर्षांतील भारतीय खेळाडूंची प्रगती पाहता भारतीय क्रीडा क्षेत्राचे चित्र निश्चितच बदलत आहे. फक्त सहभाग नव्हे तर जागतिक दर्जाच्या खेळाडूंना नमवून पदक जिंकून देशाचे नाव उज्ज्वल करण्यासाठी खेळाडूंची धडपड जेवढी आवश्यक आहे, तेवढीच खेळाडूंचे मनोबल वाढविण्यासाठी सरकारकडून त्यांना आवश्यक त्या सुविधा देण्याचीही गरज आहे.


