परमेश्वराचे विश्वरूप पाहण्याची उत्कट इच्छा

भगवद्गीतेच्या ११ व्या अध्यायात अर्जुनाची विरक्ती ओसरून भगवंताचे मूळ विश्वरूप पाहण्याची परम उत्कंठा जागी होते. आपली अपात्रता अन् श्रीकृष्णाचे असीम औदार्य यांचा मिलाफ साधत, अर्जुनाने मांडलेला हा आर्जवी, भावपूर्ण संवाद आणि त्यातील गूढार्थ!

Story: विचारचक्र |
02nd August, 11:06 pm
परमेश्वराचे विश्वरूप पाहण्याची उत्कट इच्छा

मागील लेखांत आपण श्रीमद्भगवद्गीतेच्या ११ व्या अध्यायाच्या दुसऱ्या श्लोकाच्या विस्तृत विवेचनात विहरत होतो. तिथूनच पुढील विहार सुरू करुया.

अर्जुन म्हणतोय - म्हणून एक आणि एकच असा सर्वांचा ईश्वर तूच आहेस असा आता या (माझ्या) जिवाचा निर्धार झालेला आहे खरा. पण हे कृपासागरा, तुला काय सांगू? माझ्या मनात आणखी एक उत्कट इच्छा उपजली आहे. भीड बाळगून जर गप्प बसायचे म्हटले तर ज्याला मोकळेपणाने मी ती इच्छा सांगू शकेन असा (तुझ्याशिवाय) दुसरा कोणीही साम्प्रत अस्तित्वात नाही! हे अधोक्षजा, तुझ्याशिवाय आमचे दुसरे कोण आहे?

पाण्याचे फार उपकार होतात म्हणून जलचराने पाण्याचाच त्याग करणे (म्हणजे पाण्याविना राहणे) योग्य होईल काय? किंवा तान्ह्या बाळाने संकोचास्तव स्तनपान करणे सोडून देणे हे शक्य होईल काय? असेच जर करायचे म्हटले तर त्या जलचराला आणि तान्ह्या बाळाला स्वतःच्या प्राणांचे रक्षण करण्यासाठी दुसरे कोणते साधन आहे? म्हणून आता भीड न बाळगता आपल्याला जे आवडते ते सरळ उघडपणे बोलणे योग्य असे मला वाटते.

अर्जुनाच्या मनात असे विचार पिंगा घालत होते. तेवढ्यात श्रीकृष्णांनी मनकवडेपणाने ते जाणले आणि ते म्हणाले, अर्जुना! बोल लवकर तुला काय बोलायचंय ते.

एवमेतद्यथाssत्थ त्वमात्मानं परमेश्वर।

द्रष्टुमिच्छामि ते रूपमैश्वरं पुरुषोत्तम।।३।।

सरळ अर्थ : हे परमेश्वरा, आपण आपल्याविषयी जसे सांगत आहात ते ठीक तसेच आहे. परंतु हे पुरुषोत्तमा, आपले ज्ञान, ऐश्वर्य, शक्ती, बल व तेजयुक्त रूप प्रत्यक्ष पाहण्याची मला इच्छा आहे.

विस्तृत विवेचन : तेव्हा अर्जुन म्हणाला, की देवा तुम्ही तुमच्या विभूती (तुमची वैशिष्ट्ये) मला दाखवली आहेत. तो विभूति-विस्तार पाहून माझ्या प्रतीतीची दृष्टी तृप्त झाली आहे.

हे ऋषीकेशा, ज्याच्या संकल्पाने हे समस्त दृश्य जग आकारास येऊन नाहीसे होते आणि ज्याच्या ठायी देवा तू स्वतः आहेस असा दावा करतोस, ते तुझे, केवळ तुझे असे मूळ स्वरूप, जिथून तू बाकी सगळे आकार घेतोस; द्विभुज होतोस, देवांचे काम करण्यासाठी चतुर्भुज होतोस, क्षीरसागरात शेषशायी होतोस; मत्स्य, कूर्म, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण, बुद्ध आणि कल्की असे विविध दहा अवतार घेतोस; असा तू गारुडी हा सगळा खेळ संपल्यावर केवळ ज्या स्वरूपात राहतोस; योग्याचे समुदाय आपल्या अंतरांत शिरून ज्याचे ध्यान करतात, सगळी उपनिषदे ज्याचे गायन करतात, ज्या स्वरूपाला सनकादी मुनी प्रेमभराने मिठी मारून राहिले, असे तुझे विश्वरूप जे अगाध असल्याचे या कानांनी आम्ही ऐकतो, तेच बघण्यासाठी हे जगन्नाथा आता माझे चित्त उतावीळ झाले आहे! ते तुझे थोर असे विश्वरूप या माझ्या दृष्टीला किमान एकदा तरी गोचर होऊ दे, ही तीव्र इच्छा माझ्या मनात घर करून राहिलेली आहे.

मन्यसे यदि तच्छक्यं मया द्रष्टुमिति प्रभो।

योगेश्वर ततो मे त्वं दर्शयात्मानमव्ययम्।।४।।

सरळ अर्थ : यासाठी हे प्रभो, (उत्पत्ती, स्थिती व प्रलय तसेच अंतर्यामी रूपाने शास्ता असल्या कारणाने भगवंताचे नाव प्रभू आहे) मी ते आपले रूप पाहणे शक्य आहे असे जर आपणास वाटत असेल तर हे योगेश्वरा, आपण आपल्या अविनाशी स्वरूपाचे मला दर्शन करावे.

विस्तृत विवेचन : तरीही हे मायबापा, तुझ्या विश्वरूपास बघण्यासाठी माझ्या ठिकाणी खऱ्या अर्थाने योग्यता किंवा अधिकार आहे की नाही याचा काही विचार तरी केला आहेस का, असे मला विचारायचे जर तुझ्या मनात येत असेल, तर हे देवा, रोगी काय कधी आपला आपणच आपल्या रोगाची परीक्षा जाणतो काय? हे एक आणि दुसरे म्हणजे, मन तीव्र इच्छेच्या आधीन झाले की त्याला साहजिकच पात्रतेचे विस्मरण होते! जसे म्हणतात ना की तहानेने व्याकूळ झालेला माणूस "आता समुद्र सुद्धा मला कमी पडेल!" असे म्हणण्यापर्यंत येतो! तशी माझ्या उत्कंठेची भूल आता तितकी अनावर झाली आहे की, आता मला माझा तोल राखणे अशक्य झाले आहे.

खरे तर आईलाच आपल्या बालकाची खरी योग्यता माहीत असते. तरी आता हे जनार्दना, माझा प्रत्यक्ष अधिकार (वा अनाधिकार) कृपया आपण विचारात घ्यावा व मग मला विश्वरूप दाखविण्याची कृपा करावी.

माझ्या अंगी जर ती पात्रता नसेल तर तसे तरी हे कृपावंता मला निश्चिंतपणे सांग.

कारण बधिरासमोर सुस्वरात गाणे गाऊन त्याला काय सुख मिळणार? पाऊस जरी मुख्यत्वेकरून चातकासाठीच पडत असला तरी तो सगळ्या जगाला तृप्त करतो. पण तोच खडकावर पडून काय उपयोग? ती मेघ-वृष्टी व्यर्थच नव्हे काय? चंद्रकिरण सर्व जगाला उपलब्ध असतात. पण त्यातले अमृतकण फक्त चकोरच घेऊ शकतो. बाकीच्यांकडे ती पात्रता नसते. दिवस उजाडला की प्रकाश पडतो, पण डोळ्यांना दृष्टीच नसेल तर काय त्या प्रकाशाचा उपयोग? ते काहीही असले तरी तू मला तुझे विश्वरूप दाखवशील अशी खात्री आहे.

 हे सर्वेश्वरा, तू सगळ्या जाणत्या-अजाणत्यांसाठी नित्य नवा होतोस. तुझे औदार्य एवढे थोर आहे की ते हस्तांतरित करताना तू पात्रता-अपात्रता सुद्धा बघत नाहीस! कैवल्यासारखी जी पावन वस्तू आहे ती तू शत्रूलाही देतोस. या जगात मोक्ष हा सर्वात दुर्लभ होय, पण तोही तुझी सेवा करतो! (क्रमशः)


- मिलिंद कारखानीस, (लेखक राज्याचे निवृत्त उपवनपाल असून ते विविध विषयांवर लेखन करतात.) मो. ९४२३८८९७६३