गोव्यातील जलमार्गांवर अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या फेरीबोटी बंद करून त्या जागी पर्यावरणपूरक वॉटर मेट्रो संकल्पनेतील फेरीसेवा सुरू करण्यासाठी राज्य सरकारने प्रस्ताव विचारात घेतला आहे. त्यासाठी राज्यातील जलमार्गांचा अभ्यास करण्यासाठी कोची मेट्रो रेल लिमिटेड या कंपनीला कामही दिले आहे. विशेष म्हणजे केंद्र सरकारने देशातील ज्या काही मुख्य शहरांमध्ये वॉटर मेट्रो सुरू करण्यासाठी अभ्यास केला आहे, त्या पहिल्या टप्प्यातील प्रस्तावात गोव्याचा समावेशही केल्याचे केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी जाहीर केले आहे. जास्त वेळ लागणे, प्रदूषण अशा कारणांमुळे गोव्यातील फेरीबोट सेवा नेहमी वादात असते. पण गोव्यातील जलमार्गांवर अनेक वर्षांपासून प्रवाशांसाठी या फेरीबोटीच वरदानही ठरल्या आहेत. बेतीला जायचे आहे किंवा बेतीहून पणजीला पटकन पोहोचायचे आहे, तर मांडवी पुलापर्यंत न जाता फेरीबोटीने काही मिनिटांत येण्याचा पर्याय आहे. तीच स्थिती चोडण-रायबंदर, ओल्डगोवा-दिवाडी, सापेंद्र-दिवाडी, नार्वे-दिवाडी, कामुर्ली-तुये, कुंभारजुवे-गवंडाळी, वाशी-आंबई, टोंका-सारमानस, वळवई-सुर्ला, मडकई-कुठ्ठाळी, रासय-दुर्भाट, राय-शिरोडा, आडपई-रासय अशा वेगवेगळ्या मार्गांवर नदी परिवहन खात्यामार्फत फेरीसेवा निरंतरपणे सुरू आहे. जिथे रस्ते आणि पूल आहेत तिथे जशी कदंब बससेवेने गोव्याला जोडण्यापूर्वीपासूनच फेरीसेवेने गोव्याला जोडून ठेवले आहे. त्यामुळे अनेकदा स्थानिक लोकही पूल हवा ही मागणीही करण्याचे विसरून जातात. फेरीसेवाच त्यांच्या दैनंदिन जीवनातील सोबती ठरलेली आहे. फक्त स्थानिकच नव्हे तर पर्यटकही गोव्यातील फेरीसेवा अनुभवण्यासाठी येतात.
गेल्या काही वर्षांमध्ये फेरीने प्रवास करणाऱ्यांची संख्याही प्रचंड वाढलेली दिसते. एका माहितीप्रमाणे २०२४-२५ साली जलमार्गांवर प्रवास करणाऱ्यांची संख्या ३४.३३ लाख होती, तर २०२५-२६ मध्ये ती १.१७ कोटींवर पोहोचली आहे. हे आकडे पाहता जलमार्गांचा प्रवास अधिक जलद आणि सुरक्षित झाल्यास ही संख्या अनेक पटीने वाढू शकते. रस्त्यांवरील वाहतूक कोंडी, रस्त्यांवरील होणारे अपघात टाळण्यासाठी अनेकजण सुरक्षेचा मार्ग म्हणून फेरीसेवेचा लाभ घेतात. त्यामुळेच गोव्यातील जलमार्गांवरील प्रवास अधिक गतिमान आणि सुरक्षित होण्यासाठी वॉटर मेट्रो फायदेशीर ठरणार आहे. त्याचाच विचार करून गोव्याने सध्या अभ्यास अहवाल तयार करण्यासाठी कोची मेट्रोला काम दिले आहे. कोची मेट्रोला या क्षेत्राचाही अनुभव असल्यामुळे लवकर अभ्यास पूर्ण होऊन केंद्राच्या मदतीने गोव्यातील वॉटर मेट्रो म्हणजेच सुधारित फेरीसेवाही लोकांना अनुभवता येईल, असे अपेक्षित आहे. सध्या केरळमध्ये कोची मेट्रो ही सेवा देत आहे. तिथे सुरक्षित प्रवासासाठी लाखो प्रवासी वॉटर मेट्रोने रोज प्रवास करतात. केरळमध्ये सुमारे १५ मार्गांवर सध्या या वॉटर मेट्रो आहेत. गोव्यातील सध्याच्या ९ मार्गांचा अभ्यासासाठी समावेश केला आहे. इतर मार्गांवरही ही सेवा देण्याचा विचार सरकार करणार आहे. वॉटर मेट्रोच्या सेवेसाठी केंद्र सरकार गोव्याला पूर्ण मदत करणार असल्यामुळे गोव्याला त्यासाठी मोठा खर्च करण्याची आवश्यकता भासणार नाही. सध्याच्या फेरींपेक्षा सुधारित आणि पर्यावरणपूरक फेरीसेवा देण्याची ही योजना लवकर अस्तित्वात येण्याची गरज आहे. सध्या रायबंदर ते चोडण जलमार्गावर सुरू असलेल्या रो-रो फेरीसेवेमुळे वेळेची किती बचत होते, त्याचा अनुभव प्रवाशांना येतोच आहे. अशा प्रकारेच वेळेची बचत, सुरक्षित प्रवास आणि प्रदूषणमुक्त फेरीसेवा सर्वत्र आल्या तर त्याचे स्वागत व्हायला हवे. अशा चांगल्या गोष्टींचे स्वागत निश्चितच होईल, जेणेकरून भविष्यात सर्वच जलमार्गांवर वॉटर मेट्रो सुरू करण्यास मदत होईल.
गोव्यातील जलमार्गांवरील प्रवासच नव्हे तर गोव्यातील प्रवासाची व्याख्याही या प्रकल्पामुळे बदलू शकते. रस्त्यांवरील प्रवास किती असुरक्षित झाला आहे, त्याची प्रचिती रोजच्या अपघातांमुळे येते. त्यामुळे अशा प्रकारच्या प्रकल्पांमुळे प्रवास गतिमान होण्यास मदत होईल. वॉटर मेट्रोच्या प्रकल्पांमुळे गोव्यातील जलमार्गांवरील जेटींचाही विकास होईल. एकूणच या प्रकल्पामुळे राज्यातील वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल आणि सुधारणाही दिसून येतील. गोव्यातील रस्त्यांवरील वाहतुकीचा ताणही कमी होऊ शकेल. पर्यटनाच्या अंगानेही या प्रकल्पाचा फायदा गोव्याला होणार आहे. सध्या केरळमध्येच असा प्रकल्प राबवला जातो. गोव्यात तो जेवढ्या लवकर सुरू होईल, तेवढा गोव्याच्या पर्यटनालाही त्याचा फायदा होणार आहे. अंतर्गत पर्यटनालाही यामुळे चालना मिळेल. जुन्या फेरीबोटींच्या प्रवासातून मुक्तता मिळेलच, पण पर्यावरणपूरक आणि दीर्घकालीन टिकणारी वाहतूक व्यवस्थाही तयार होईल.


