आम्ही सध्या गोव्यात आहोत, भेटता येईल का?" गेल्या आठवड्यात नागपूरहून मा. लक्ष्मण जोशी फोनवरून बोलत होते, काही वेळापूर्वी त्यांनी परेश प्रभू यांना असेच विचारले होते, असे त्यांनी फोनवर सांगितले. आम्ही गोंधळात पडलो. नव्वदी ओलांडलेले जोशी सर खरेच पणजीत आले आहेत का? या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला तेव्हा कळले की ते शरीराने नागपुरात आहेत, मनाने गोव्यात आहेत. वयोमानानुसार त्यांचे हे वागणे-बोलणे होते. मंगळवारी त्यांच्या निधनाची बातमी समजली आणि हे सारे आठवले.
स्व. जोशी सर प्रथम भेटले ते दै. गोमन्तकमध्ये. नवे संपादक कडक आहेत, शिस्तीचे पालन करणारे आहेत, या माहितीने मनात धास्ती घेतली होती. अशा वेळी एक शांत व्यक्ती समोर आली आणि मनमोकळेपणाने बोलू लागली. अल्पावधीतच दोन पिढ्यांमधील अंतर कधीच गळून गेले होते. एका अनुभवी मार्गदर्शकाच्या भूमिकेत ते सदैव वावरले. वयातील अंतर त्यांनी जाणू दिले नाही.
आयुष्यभराचा पत्रकारितेतील अनुभव घेऊन आलेले जोशी सर आम्हाला समृद्ध करण्यासाठी सतत काम करीत राहिले. कार्यालयात प्रथमच संगणक आले, तेव्हा संपादकीय विभागाने विरोध केला होता, आम्ही कागदावर असलेल्या बातम्यांचे संपादन करू, संगणकाला हात लावणार नाही असा पवित्रा आम्ही घेतला, तो त्यावेळी चुकीचा नव्हता. जोशी सरांनी आपल्या केबिनमध्ये एक संगणक मागवून घेतला आणि ते स्वतः एका बोटाने टाईप करू लागले. संगणकावर काम करणे ही काळाची गरज असल्याचे सांगत, काही दिवसांतच ते आपले अग्रलेख त्यावरच टाईप करू लागले... ते पाहून आमचाही विरोध मावळला.
जोशी सरांनी प्रत्येक सहकारी उपसंपादकाच्या घरी जाऊन कुटुंबांशी संपर्क साधला आणि वाढवला. वैयक्तिक सुखदुःखात ते सहभागी होत असत, त्यामुळे घरातीलच ज्येष्ठ व्यक्ती असल्याचा मान त्यांना मिळायचा. सहकारी, लेखक, वाचक यांच्याशी त्यांची जवळीक होती. गोव्यातील प्रत्येक भागात जाऊन त्यांनी गोव्यातील लोकसंस्कृती आणि राहणीमान जाणून घेतले. गोव्यावर नितांत प्रेम करणाऱ्या जोशी सरांना अखेरच्या दिवसांतही आपण गोव्यात असल्याचा भास होत असे, हे त्यांच्या फोनवरील बोलण्याने दिसून आले. गोवादूतच्या स्थापनेत आणि नंतरच्या घोडदौडीतही त्यांचा सिंहाचा वाटा होता. 'गावोगावी' या आपल्या पुस्तकात त्यांनी गोव्यातील पत्रकारिता हा आपला सुवर्णकाळ होता, असे म्हटले आहे. या पुस्तकातील तब्बल १८ पाने त्यांनी गोव्यावर लिहिली आहेत. "प्रत्येक पत्रकाराने लेखन केलेच पाहिजे," या त्यांच्या आग्रहामुळे सर्व उपसंपादकांनी सलग महिनाभर 'आठवा स्तंभ' लिहिला होता असे आठवते. परिचय वाढवण्यासाठी बाहेर जाऊन मान्यवरांच्या भेटी घेणे, त्यावर 'भेटीगाठी' असा रविवार पुरवणीत स्तंभ चालवणे, काही जणांना कार्यालयात निमंत्रित करून बातचीत करणे अशी त्यांची कार्यपद्धती होती.
केपे येथील एका कुटुंबातील सर्व जण अंध आहेत, ही बातमी वाचून तेथे धाव घेत त्यांचे झोपडीवजा घर दुरुस्ती करून त्यांना सुरक्षित निवारा निर्माण करणे, यासाठी सरकार दरबारी प्रयत्न करीत समाजाची मदत मिळवणे तसेच सालेलीतील एका गाजलेल्या प्रकरणी तेथे प्रत्यक्ष धावून जाणे ही त्यांच्या सामाजिक बांधिलकीची उदाहरणे आहेत. त्यांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, कुठेही जाताना सोबत एक तरी सहकारी न्यायचा, म्हणजे त्यालाही माहिती मिळावी. असे गुण अतिशय दुर्मिळ असतात. समाजात फूट पडेल असे लेखन करायचे नाही, शब्द जपून वापरावे, असा सल्ला त्यांनी पहिल्याच बैठकीत दिला होता, हे स्पष्टपणे आठवते.
सुस्वभावी, मायाळू तेवढ्याच निर्भिड आणि सडेतोड जोशी सरांनी आमच्यावर कसलीही सक्ती केली नाही, पण आपल्या आचरणातून धडे घालून दिले. त्यांच्याबद्दल बरेच काही सांगता येईल एवढा अमूल्य सहवास लाभला. दोन वर्षांपूर्वी ते गोव्यात येऊन गेले, त्यावेळी कुटुंबीयांना फिरायला पाठवून ते साहित्य सेवक मंडळाच्या कार्यालयात जुन्या सहकाऱ्यांना मनसोक्त भेटले. ती त्यांची अखेरची भेट ठरली.
त्यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन.
- गंगाराम केशव म्हांबरे


