आरजीपीचा इतिहासजमा होण्याचा मार्ग

आतापर्यंत मनोज परब, विश्वेश नाईक यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. परब समर्थक अशा पद्धतीने पक्षातून बाहेर पडले आणि आमदार बोरकर यांच्याकडे पक्षाचा संपूर्ण ताबा आला, तरच वाद टळेल अन्यथा दोन्ही गट पक्षासाठी भांडत राहिले तर आरजीपी इतिहासजमा होण्यासाठी वेळ लागणार नाही.

Story: संपादकीय |
3 hours ago
आरजीपीचा इतिहासजमा होण्याचा मार्ग

गोव्यात ज्या महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाने कित्येक वर्षे सत्ता केली त्या मगोची आज वाताहत झालेली दिसते. गेल्या काही निवडणुकांत एक-दोन आमदारांपुरतेच या पक्षाचे अस्तित्व राहिले आहे. युगोडेपा, सेव्ह गोवा, गोवा विकास पक्ष असे अनेक प्रादेशिक पक्ष वेळोवेळी गोव्याच्या राजकारणात स्थापन होऊन नाहीसेही झाले. गेल्या एका दशकात टिकून राहिला तो गोवा फॉरवर्ड पक्ष. त्यानंतर आली रिव्होल्यूशनरी गोवन्स पार्टी. दोन्ही पक्ष गोव्याच्या राजकारणात सध्या महत्त्वाची भूमिका बजावत होते. दोन्ही पक्षांकडे सध्या प्रत्येकी एक आमदार आहे. एकेकाळी गोव्यावर सत्ता केलेल्या मगोचे सध्या दोन आमदार आहेत. आताच्या घडीला काँग्रेसचीही परिस्थिती वाईट आहे. त्यांच्याकडे फक्त तीन आमदार आहेत. आम आदमी पक्षाकडे दोन आमदार आहेत. तीन अपक्ष आमदार आहेत, ज्यांनी भाजपला पाठिंबा दिला आहे. उर्वरित सगळ्या जागा भाजपकडे आहेत. गोव्यात भाजपच्या विरोधात असलेला असंतोष पाहता अशा स्थितीत राजकीय भवितव्य हे प्रादेशिक पक्षांना आणि काँग्रेसला आहे असे स्पष्ट दिसत असताना आरजीपी आणि काँग्रेसमध्येच सध्या अंतर्गत धुसफूस आहे. 

काँग्रेसमध्ये दोन गट आहेत आणि आरजीपीमध्येही. आरजीपीच्या एका गटाने तर आपल्या एकमेव आमदारालाच बेदखल केल्याचा दावा केला आहे. बोरकर यांच्या गटाने आरजीपीच्या दोन पदाधिकाऱ्यांना निलंबित केले आहे. त्यातील ही अपरिपक्वता पाहिल्यास या पक्षावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांची किव येते. ज्या आरजीपीकडून लोकांना अपेक्षा होत्या, त्या पक्षाने विश्वासघात केला आहे, अशी लोकांची भावना झाली आहे. मगोमध्ये अशाच प्रकारे अंतर्गत वाद होऊन हा पक्ष अधोगतीला आला. आज हा पक्ष जिवंत आहे, फक्त सुदिन ढवळीकर यांच्यामुळे. पण किमान त्या पक्षाने सत्ता भोगली. आरजीपीने फक्त एक आमदार निवडून आणून सध्या जे निष्कारण वाद चालवले आहेत, ते कधीच कुठल्या राजकीय पक्षाने केले नव्हते. सर्वसामान्य लोकांचे प्रश्न घेतल्यामुळे आरजीपीकडून लोकांनी बऱ्याच अपेक्षा ठेवल्या. पहिल्याच निवडणुकीत अनेक मतदारसंघांत दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आरजीपीचे उमेदवार होते. भाजप, काँग्रेसनंतर सर्वाधिक मते मिळवणाऱ्यांमध्ये आरजीपी तिसऱ्या क्रमांकावर होता. चांगले यश मिळत असतानाही पहिल्याच निवडणुकीनंतर या पक्षाची शकले उडाली. एकमेकांना भावासारखे मानणारे या पक्षाचे नेते आज एकमेकांचे कट्टर शत्रू बनले आहेत. म्हणजे समोरासमोर आले तर ते एकमेकांचा जीवही घेऊ शकतात, अशा प्रकारची त्यांची भांडणे सुरू आहेत. यात सर्वांत आधी धक्का दिला तो मनोज परबने. हा पक्ष उभा करण्यासाठी परब यांनीच पुढाकार घेतला होता, पण त्यांनीच पक्ष सोडून राजकारणातून संन्यास घेतला. त्यानंतर या पक्षातील मतभेद चव्हाट्यावर आले. मनोज परब यांच्या समर्थकांचा एक गट आणि आमदार वीरेश बोरकर यांच्या समर्थकांचा दुसरा गट, असे दोन गट या पक्षात तयार झाले. एकमेकांना लक्ष्य करून दोन्ही गटांनी पक्ष लवकरात लवकर संपवण्याचाच जणू विडा उचलला आहे. या पक्षातील वैर टोकाचे आहे. मगोमध्ये असे वाद काही वर्षांपूर्वी व्हायचे, पण नंतर त्यांच्या नेत्यांनी आपले मार्ग वेगळे केले. आता आरजीपी अशा वळणावर आहे, जिथून या पक्षाच्या अधोगतीचा प्रवास सुरू होताना दिसतो आहे. 

आमदार वीरेश बोरकर यांना पक्षाच्या मूळ समितीने म्हणजे अजय खोलकर आणि विश्वेश नाईक यांनी पक्षातून हाकलल्याचा दावा केल्यानंतर पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष या नात्याने बोरकर यांनी नाईक आणि खोलकर यांनाच निलंबित करून सार्वजनिक नोटीस जारी केली. त्यामुळे हा वाद आता निवडणूक आयोगापर्यंत जाऊ शकतो. अहंकार, एकमेकांचा द्वेष यातून सुरू झालेला आरजीपीतील वाद एका निर्णायक टप्प्यावर आहे. त्यामुळे या पक्षाचे भवितव्य काय, हे पुढील काळातील घडामोडीच सांगू शकतील. पुढे भांडणात पक्षाचे दोन गट होतील आणि पक्षाचे नाव, चिन्ह यासाठीही हा लढा सुरू होऊ शकतो. आतापर्यंत मनोज परब, विश्वेश नाईक यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. परब समर्थक अशा पद्धतीने पक्षातून बाहेर पडले आणि आमदार बोरकर यांच्याकडे पक्षाचा संपूर्ण ताबा आला, तरच वाद टळेल अन्यथा दोन्ही गट पक्षासाठी भांडत राहिले तर आरजीपी इतिहासजमा होण्यासाठी वेळ लागणार नाही.