अमेरिका, इस्रायल आणि तुर्की यांच्यातील संबंधांमध्ये 'एफ-३५' लढाऊ विमानांचा मुद्दा नव्या तणावाचे कारण ठरत आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी तुर्कीला अमेरिकेने 'एफ-३५' विमाने विकू नयेत, अशी स्पष्ट भूमिका घेतली असताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ती उघडपणे फेटाळली आहे. त्यामुळे मध्य पूर्वेतील सामरिक समीकरणांबरोबरच अमेरिका-इस्रायल संबंधांमध्येही मतभेद उघड झाले आहेत.
ट्रम्प यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, अमेरिकेची शस्त्रविक्री कोणत्याही परदेशी नेत्याच्या इच्छेनुसार ठरत नाही. अमेरिकेने कोणाला शस्त्रे विकावीत हे आम्हाला कोणी सांगू शकत नाही. तुर्की हा आमचा महत्त्वाचा आणि विश्वासू सहयोगी आहे, असे त्यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. ही भूमिका नेतन्याहू यांच्या भूमिकेच्या नेमकी विरुद्ध आहे.
नेतन्याहूंची चिंता प्रादेशिक सुरक्षेशी संबंधित आहे. त्यांचा दावा आहे की तुर्कीचे अध्यक्ष रेसेप तय्यिप एर्दोगन यांनी वारंवार इस्रायलविरोधी आक्रमक भूमिका घेतली आहे. अशा देशाला अत्याधुनिक पाचव्या पिढीची 'एफ-३५' स्टेल्थ लढाऊ विमाने मिळाल्यास मध्य पूर्वेतील शक्ती-संतुलन बदलू शकते. इस्रायलची हवाई श्रेष्ठता ही त्याच्या सुरक्षेचा कणा मानली जाते आणि त्यावर परिणाम होण्याची भीती इस्रायलला आहे.
या वादामागे जुनी पार्श्वभूमी आहे. तुर्कीने २०१९ मध्ये रशियाकडून 'एस-४००' हवाई संरक्षण प्रणाली खरेदी केल्यानंतर अमेरिकेने त्याला 'एफ-३५' कार्यक्रमातून बाहेर काढले होते. रशियन प्रणाली आणि 'एफ-३५' तंत्रज्ञान एकत्र आल्यास गोपनीय लष्करी माहिती धोक्यात येऊ शकते, असा अमेरिकेचा त्यावेळचा युक्तिवाद होता. मात्र ट्रम्प प्रशासन आता तो निर्णय बदलण्याच्या तयारीत असल्याचे संकेत देत आहे. यासोबतच 'एस-४००' प्रकरणातील काही निर्बंध हटवण्याचाही विचार सुरू आहे.
ट्रम्प यांची भूमिका केवळ संरक्षण सहकार्यापुरती मर्यादित नाही. ते तुर्कीला नाटोमधील महत्त्वाचा भागीदार मानतात. युक्रेन युद्ध, काळा समुद्र, पश्चिम आशिया आणि युरोपच्या सुरक्षेच्या दृष्टीने तुर्कीचे भौगोलिक महत्त्व अमेरिकेसाठी मोठे आहे. त्यामुळे तुर्कीशी संबंध सुधारण्याला ट्रम्प प्राधान्य देत असल्याचे दिसते.
दुसरीकडे, तुर्कीही 'एफ-३५' कार्यक्रमात पुनरागमन करण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्याचबरोबर आपल्या स्वदेशी 'काआन' लढाऊ विमानांसाठी अमेरिकन बनावटीची इंजिने मिळविण्याचाही प्रयत्न सुरू आहे. हे यशस्वी झाल्यास तुर्कीची संरक्षण क्षमता आणि स्वदेशी विमान उद्योग दोन्हीला मोठी चालना मिळू शकते.
ट्रम्प यांनी तुर्कीला दिलेला पाठिंबा आणि नेतन्याहूंच्या हरकतीकडे केलेले दुर्लक्ष हे आगामी काळात अमेरिका-इस्रायल संबंधांची नवी दिशा ठरवू शकते.
- सचिन दळवी


