आरोग्यसेवेची नवी दिशा

आरोग्य सेवांचे विकेंद्रीकरण, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि ग्रामीण आरोग्य सुविधांचे सातत्याने होणारे बळकटीकरण पाहता, गोव्याची आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम, सर्वसमावेशक आणि लोकाभिमुख होत असल्याचे स्पष्ट दिसते.

Story: संपादकीय |
31st July, 09:05 pm
आरोग्यसेवेची नवी दिशा

गोवा हे देशातील सर्वाधिक प्रगत राज्यांपैकी एक मानले जाते. पर्यटन, शिक्षण, पायाभूत सुविधा आणि प्रति व्यक्ती उत्पन्नाबरोबरच आरोग्य क्षेत्रातही गोव्याने गेल्या काही वर्षांत लक्षणीय प्रगती केली आहे. पूर्वी अत्याधुनिक उपचारांसाठी मुंबई, बंगळुरू किंवा मंगळुरू येथे धाव घ्यावी लागत असे. मात्र आज गोव्यातील प्रमुख शासकीय इस्पितळे, जिल्हा इस्पितळे, उपजिल्हा रुग्णालये, समुदाय आरोग्य केंद्रे आणि प्राथमिक आरोग्य केंद्रे यांचे जाळे अधिक सक्षम करण्यात आले आहे. विशेष म्हणजे आता सरकारचा भर केवळ राजधानी किंवा शहरांपुरता न राहता ग्रामीण भागातील नागरिकांनाही दर्जेदार वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यावर आहे. राज्य सरकारने "प्रत्येक नागरिकाला घराजवळ गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा," हे उद्दिष्ट ठेवून आरोग्य क्षेत्रात मोठी गुंतवणूक केली आहे. त्यामुळे ग्रामीण गोव्याचे आरोग्यचित्र बदलण्याची प्रक्रिया वेगाने सुरू झाली आहे. डिचोलीत नुकताच शस्त्रक्रिया विभाग आणि व्हेरिकोज व्हेन्सवरील लेझर उपचाराची सुविधा सरकारने उपलब्ध करून दिल्यामुळे डिचोली, मये मतदारसंघातील आणि परिसरातील नागरिकांना त्याचा उपयोग होणार आहे. कालापूरजवळील मातृछाया संचालित रुग्णाश्रयात गेल्यावर्षी आरोग्य खात्यातर्फे राज्यातील एकमेव 'स्पाइन इंज्युरी रिहेबिलीटेशन सेंटर' या कण्यावरील उपचार केंद्राचे उद्घाटन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले होते. त्यामुळे शक्यतो ग्रामीण भागाला वैद्यकीय सेवा देत आरोग्यसेवेला नवी दिशा देण्याचे राज्य सरकारचे धोरण स्वागतार्ह आहे. बांबोळी येथील गोवा मेडिकल कॉलेज हे राज्यातील सर्वात मोठे आणि अत्याधुनिक शासकीय रुग्णालय आहे. कार्डिओलॉजी, न्यूरोलॉजी, न्यूरोसर्जरी, कर्करोग उपचार, ट्रॉमा केअर, किडनी प्रत्यारोपण, अत्याधुनिक आयसीयू, डिजिटल निदान प्रणाली, अत्याधुनिक प्रयोगशाळा अशा अनेक सुविधा येथे उपलब्ध आहेत. अलीकडच्या काळात ऑपरेशन थिएटरचे आधुनिकीकरण, आधुनिक एमआरआय, सीटी स्कॅन, कॅथलॅब, एंडोस्कोपी, रोबोटिक उपकरणे, डिजिटल रुग्ण नोंदणी प्रणाली यामुळे उपचार अधिक जलद आणि अचूक झाले आहेत.

मडगावचे जिल्हा रुग्णालय, म्हापसा जिल्हा रुग्णालय, फोंडा उपजिल्हा रुग्णालय तसेच इतर सरकारी रुग्णालयांमध्ये पूर्वी उपलब्ध नसलेल्या अनेक सुविधा सुरू करण्यात आल्या आहेत. आधुनिक ऑपरेशन थिएटर, आयसीयू सुविधा, डायलिसिस केंद्रे, डिजिटल एक्स-रे, सोनोग्राफी, रक्तपेढी, मातृत्व व बालरोग सेवा असे विभाग इतरत्र असल्याने  रुग्णांना उपचारांसाठी जीएमसीवर अवलंबून राहण्याची गरज कमी होत आहे. गोव्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि समुदाय आरोग्य केंद्रांचे मोठ्या प्रमाणावर नूतनीकरण करण्यात आले आहे. अनेक ठिकाणी नवीन इमारती, आधुनिक उपकरणे आणि प्रशिक्षित डॉक्टर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. आज अनेक ग्रामीण आरोग्य केंद्रांमध्ये ईसीजी, मूलभूत प्रयोगशाळा तपासण्या, गर्भवती महिलांची तपासणी, लसीकरण, मधुमेह व रक्तदाब तपासणी, क्षयरोग निदान, डिजिटल आरोग्य नोंदी, दूरसंचार सुविधा उपलब्ध आहेत. यामुळे ग्रामीण नागरिकांना छोट्या उपचारांसाठी शहरात जाण्याची गरज कमी झाली आहे. ग्रामीण आरोग्य सेवेमध्ये टेलिमेडिसीन हे महत्त्वाचे पाऊल ठरत आहे. दुर्गम भागातील डॉक्टर आता जीएमसी किंवा तज्ज्ञ डॉक्टरांशी थेट संपर्क साधून रुग्णांना मार्गदर्शन मिळवून देतात. यामुळे निदान जलद होते. उपचार लवकर सुरू होतात. रुग्णाचा खर्च कमी होतो. गंभीर रुग्णांची योग्य वेळी रेफरल प्रक्रिया होते. मातृत्व आणि बाल आरोग्यावर विशेष भर दिला जात असल्याचे दिसते. ग्रामीण महिलांना सुरक्षित प्रसूती सेवा उपलब्ध करून देण्यासाठी सरकारी आरोग्य यंत्रणेने मोठे काम केले आहे.

आज ग्रामीण भागात मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार, कर्करोग यांचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्रांमधून नियमित तपासणी शिबिरे आयोजित केली जात आहेत. लवकर निदानामुळे मोठ्या आजारांवर नियंत्रण ठेवणे शक्य होत आहे. राज्यात वृद्धांची संख्या तुलनेने जास्त आहे. त्यामुळे वृद्धांच्या आरोग्यासाठी स्वतंत्र तपासणी, औषधोपचार, फिजिओथेरपी, नियमित आरोग्य तपासणी अशा सेवा वाढविण्यात आल्या आहेत. '१०८' रुग्णवाहिका सेवा ग्रामीण भागासाठी जीवनदायी ठरली आहे. अपघात, हृदयविकाराचा झटका किंवा प्रसूतीच्या वेळी रुग्णांना जलद वैद्यकीय मदत मिळते. असे असले तरी डॉक्टरांची उपलब्धता, विशेषज्ञांची कमतरता आणि काही पायाभूत प्रश्न अद्याप सोडवायचे आहेत. मात्र आरोग्य सेवांचे विकेंद्रीकरण, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि ग्रामीण आरोग्य सुविधांचे सातत्याने होणारे बळकटीकरण पाहता, गोव्याची आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम, सर्वसमावेशक आणि लोकाभिमुख होत असल्याचे स्पष्ट दिसते. "निरोगी गोवा" घडविण्याच्या व्यापक संकल्पनेच्या दिशेने टाकलेले हे महत्त्वाचे पाऊल आहे.